स्मितानुभव #97 मी आणि माझे विणकाम

प्रत्येकाला सगळं येत नाही आणि देव कुणालाही रिकाम्या हातांनी पाठवत नाही. देवानी आपल्यासाठी नक्की काय योजिले आहे ते कळायला थोडा वेळ लागतो इतकेच! गळा, मुंढा, बटणपट्टी, काजपट्टी, बाह्या सगळे तेच शिवाय शिवणकाम..........तरीही अत्यंत आवडीचे....फक्त आवड नाही तर आवडता छंद! पडलात ना विचारात? काल इतका मोठा लेख लिहिला शिवण आवडत नाही म्हणून .....आणि आज पुन्हा तेच..... ! संज्ञा जरी त्याच असल्या तरी संदर्भ वेगळा आहे आणि तो म्हणजे लोकरीचे विणकाम....!(knitting) आई आणि आत्या दोघीही उत्तम विणायच्या. त्यांच्यातील बोलणे..."अग तीन सुलट, दोन उलट असे घाल ग, किंवा दोनचा एक कर." असे कानावर पडत असे. त्यातून उत्सुकता निर्माण होत गेली. त्यांचे बघून बघून मी कधी सुया हातात घेतल्या ते आठवत नाही. पण खूप लहान वयात सुरुवात झाली. मोठ्या सुयांशी लहान हात झटापट करीत एक सुलट एक उलट विणायला धडपडत असायचे. जुन्या लोकरीचा छोटा गुंडा आई करून द्यायची. नंबरवाल्या मोठ्या सुया आणि रंगीबेरंगी लोकर ह्यांनी मात्र माझे मन जिंकले. सहावीत असताना मोजे आणि सातवीत असताना बाळाचा स्वेटर असे शालेय अभ्यासक्रमात होते. बाळाचा स्वे...