स्मितानुभव #97 मी आणि माझे विणकाम
प्रत्येकाला सगळं येत नाही आणि देव कुणालाही रिकाम्या हातांनी पाठवत नाही. देवानी आपल्यासाठी नक्की काय योजिले आहे ते कळायला थोडा वेळ लागतो इतकेच!
गळा, मुंढा, बटणपट्टी, काजपट्टी, बाह्या सगळे तेच
शिवाय शिवणकाम..........तरीही अत्यंत आवडीचे....फक्त आवड नाही तर आवडता छंद!
पडलात ना विचारात? काल इतका मोठा लेख लिहिला शिवण आवडत नाही म्हणून .....आणि आज पुन्हा तेच..... ! संज्ञा जरी त्याच असल्या तरी संदर्भ वेगळा आहे आणि तो म्हणजे लोकरीचे विणकाम....!(knitting)
आई आणि आत्या दोघीही उत्तम विणायच्या. त्यांच्यातील बोलणे..."अग तीन सुलट, दोन उलट असे घाल ग, किंवा दोनचा एक कर." असे कानावर पडत असे. त्यातून उत्सुकता निर्माण होत गेली. त्यांचे बघून बघून मी कधी सुया हातात घेतल्या ते आठवत नाही. पण खूप लहान वयात सुरुवात झाली. मोठ्या सुयांशी लहान हात झटापट करीत एक सुलट एक उलट विणायला धडपडत असायचे. जुन्या लोकरीचा छोटा गुंडा आई करून द्यायची. नंबरवाल्या मोठ्या सुया आणि रंगीबेरंगी लोकर ह्यांनी मात्र माझे मन जिंकले.
सहावीत असताना मोजे आणि सातवीत असताना बाळाचा स्वेटर असे शालेय अभ्यासक्रमात होते. बाळाचा स्वेटर न विणता मी माझ्या 3 वर्षाच्या बहिणीसाठी थोडा मोठा स्वेटर विणला. बाकी मुलींपेक्षा माझे विणकाम सुबक आणि नीटस होते. अजिबात न उसविल्याने स्वच्छ आणि सुंदर झाले होते. फिकी आंबा कलरची लोकर मी घेतली होती. पहिल्यांदाच करत होते म्हणून आईने कौतुकाने तयार बॉल घेऊन दिले होते.( हे बॉल खूप महाग पडतात.) संपूर्ण वर्गाला बाई माझे विणकाम दाखवून कौतुक करायच्या. फार भारी वाटायचे तेव्हा. कापडाशी सूत जुळले नाही पण लोकरीशी घट्ट वीण जमली.
लोकर खरेदी करण्यापासून ते विणून पूर्ण होईपर्यंत मी एका वेगळ्याच धुंदीत असते. शिवण्यापेक्षा विणण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. एक स्वेटर पूर्ण व्हायला जवळजवळ 1महिना लागतो. शिवण्यासाठी टाळाटाळ करणारी मी विणकाम मात्र मनलावून आणि जिद्दीने करायची. दुकानात रंगीबेरंगी लोकरीच्या लडी मी भान हरपून पहात बसते. कितीतरी वेळ रंग कोणता घ्यावा ह्याचा विचार करण्यात जातो. आता तर खूपच विविधता आली आहे लोकरीत!
लडी पासून गुंडा कसा करायचा ह्याचे आईने मला उत्तम प्रशिक्षण दिले आहे. गुंता होऊ न देता, लोकर ताणली जाणार नाही ह्याची दक्षता घेऊन हलक्या हाताने लोकर गुंडाळायची! कधी गुंता झाला तर कंटाळा यायचा.... मी आईला विचारायची, " तोडू का आता?" आई स्वतः येऊन बघायची आणि म्हणायची, "अग तोडायला वेळ नाही लागत,पण जोडायला खूप वेळ लागतो बरं!"
लोकरीसाठी सांगितलेला विचार आयुष्यात सुद्धा
वेळोवेळी उपयोगी पडला. संस्कार बहुदा असेच होत असावेत.
1984 साली लोणावळ्याला जाण्यासाठी इंजिन लोकल होती. जवळजवळ दोन अडीच तास लागायचे पोहचायला. हा सगळा वेळ मी वाचन नाहीतर विणकाम ह्यासाठी वापरत असे. गाडीत इतर बायकाही काही ना काही करत असायच्या त्यांच्याकडून पण नवीन विणी आणि पॅटर्न शिकायला मिळाले. समज आणि वय दोन्हीही वाढल्याने विणकामात जास्त सफाई आणि नीटनेटकेपणा आला. एकावर एक सुई घालत विणकामाची उंची जशी वाढत जाई तसतसे मन स्वतःची कलाकृती बघून खूष होत असे. विणताना एकाग्रतेची खूप आवश्यकता असते. एक टाका चुकला की उसविण्या शिवाय पर्याय नसतो.
जुळी मुले, बँकेची नोकरी, घरातील कामे ह्याची, मला विणकाम करताना कधीही अडचण झाली नाही. हे सर्व उत्तमरीत्या करून मी विणकाम करत असे. बेबी सेट तर माझा हातखंडाच !
निरनिराळ्या प्रकारच्या सुया, पुस्तके, पम्प्लेट अश्या पूरक गोष्टींचा मी खूप साठा केला होता. कधी असं होतं ना....की काही प्रसंग नसतो किंवा विकत घेऊन भेट देणे पण प्रशस्त वाटत नाही अश्या वेळी मी स्वतः केलेले स्वेटर,शाल किंवा मफलर भेट देत असे.
मुंबईला असतानाची गोष्ट.... मुंबईत नवीन गेले असताना डॉ. अपर्णाने ( नुकतीच होमिओपॅथी डॉक्टर झालेली मुलगी होती ती.) आम्हाला खूप मदत केली होती. कधीही फोन जरी केला तरी ताबडतोब औषध सांगायची. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि हाताला गुण ....खूप आवडली होती मला.
तिला स्पेशल काहीतरी द्यावे असे मला फार वाटायचे आणि तिने गुड न्युज दिली. मग एक सुंदर सेट बनविला आणि दिला. खूप आनंद झाला तिला. पण मला खूपच त्रास झाला विणताना! पाठ खूपच दुखली.... वाढत्या वयाचा परिणाम असेल!
दुखणे इतके झाले की पुन्हा सुईला हात लावायचा नाही असे ठरविले. नुसते ठरविले नाही तर जमा केलेले सगळे साहित्य, पम्प्लेट, लोकर सगळे देऊन टाकले. ह्या पुढे विणणे शक्यच नाही अशी खूण- गाठ बांधली मनाशी.
पंधरा वर्षांनंतर सामान हलविताना 9 नंबरच्या दोन सुया आणि एक जीर्ण पम्प्लेट सापडले. स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने आता मोकळा वेळ होता. धाकटी जाऊ जवळ रहायला आली होती. ती पण खूप छान विणते. तिने आश्वासन दिले की तुम्हाला त्रास होऊ लागला तर मी स्वेटर पूर्ण करेन.( अर्धवट राहिलेले अजिबात आवडत नाही.)
शुभस्य शीघ्रम .....लगेच सुया हातात घेतल्या.... जावे कडे असलेल्या स्टॉक मधील लोकर घेतली आणि सुरुवात केली. बघता बघता स्वेटर, टोपी मोजे सगळे विणून झाले. खूप समाधान वाटले.
एकदा त्रास होत नाही कळल्यावर पुन्हा सगळी जमवाजमव केली. होलसेल मार्केट मधून लोकर आणली. जावेकडून नवीन नवीन पॅटर्न शिकायला सुरवात केली. तिने आतापर्यंत शेकडो स्वेटर विणले आहेत पण स्वतःसाठी एक सुद्धा नाही.....म्हणून मी तिलाच स्वेटर विणून दिला.
लंडन मधील सहा महिने आणि दिल्लीतील चार महिने ह्या विणकामामुळे सुसह्य झाले. लंडनहून येताना तिथे ओळख झालेल्या भारतीय मुलांना स्वेटर भेट देऊन आले. त्यांचे आईवडील इतके भारावले की बस्स! "आंटी ना आपको भुलेंगे ना यह स्वेटर किसी को देंगे!" असे म्हणत प्रेमळ निरोप दिला. अजूनही आवर्जून चौकशी करतात.
आता यु ट्यूब वर विणकाम शिकविणारी खूप चॅनेल्स आहेत. ते बघून नवीन नवीन खूप प्रकार शिकले .......शिकत आहे. व्हिडीओ बघायला मिळत असल्याने वीण लवकर समजते.
शिवण काय नी विणकाम काय..... जोडण्याचीच कला.....जिचे संस्कार बालवयापासून सुरू होतात आणि जन्मभर उपयोगी पडतात.
दूर गेलेला छंद आणि आनंद दोन्ही परत आले आणि आयुष्य पुन्हा रंगीबेरंगी झाले....अगदी होलसेल मार्केटमधील लोकरीच्या भव्य दुकानासारखे!
#smitanubhav97
Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment