स्मितानुभव #96 मी आणि माझी शिवण कला
तसा माझा जन्म,...." मुलीच्या जातीला...." आणि मग पुढे मोठ्ठी यादी.... अश्या जमान्यातला ! मला जी गोष्ट आवडायची ती मी आवर्जून करायची. अगदी माझ्या आवाक्याबाहेरचे असेल तरी. पण जे आवडत नसे त्याच्या बाजूला मी फिरकायची सुद्धा नाही. ती गोष्ट न करण्यासाठी अनंत बहाणे मी शोधायची. काहीच मिळाले नाही तर " खूप अभ्यास आहे बाई," असे म्हणून पुस्तक घेऊन बसायची.
आई आणि आजी दोघीही कर्तबगार असल्याने घरातील कामे मला फारशी कधी करावी लागली नाहीत. पण आठवी नववीत गेल्यावर मात्र आईने
"मुलीच्या जातीला" चे धोरण थोडे कडक केले. बऱ्याच गोष्टी आई आजीच्या बघून शिकत गेले. काही चांगल्या जमू लागल्या तर काही कामचलाऊ, तर काही अजिबात नाही आणि 'अजिबात नाही' च्या यादीत पहिला नंबर होता,
"शिवण कामाचा "....जो अजूनही अबाधित आहे.
मला आठवते आहे तेव्हापासून आई आमचे कपडे स्वतः घरीच शिवायची. आई शिवण कुठे आणि कधी शिकली हे मी कधीच विचारले नाही. पण ती नियमित शिवत असे. दसरा दिवाळीला एखादा रेडिमेड फ्रॉक घेतला जायचा. पेटीकोट पासून ते युनिफॉर्म पर्यंत सगळे कपडे आई घरीच शिवायची.
हे लिहिताना सुद्धा शिवण यंत्रावर कपडे शिवतानाची आई समोर दिसत आहे. त्यामुळे शिवण यंत्राची ओळख लहानपणीच झाली. लहान असल्याने पाय पुरायचे नाहीत तरी तेव्हा मला ते चालवायचे असायचे. बोटांत सुई जाईल ....उद्योग करू नकोस ....असे आई वारंवार सांगायची आणि मी पुन्हा पुन्हा मशिनशी खेळायला जायची.
तिसरीत असताना शाळेत शिवण शिकवायला सुरुवात झाली. मनातून खूप आनंद झाला की आता मशीनवर शिवायला मिळणार! लवकरच भ्रमाचा भोपळा फुटला. बाईंनी सांगितले रुमाल शिवायचा आहे आणि तोही हाताने. आधी हात- शिलाई आली पाहिजे. मग काय! झाली कापडाशी झटापट सुरू! आधी दुमडून मग धावदोरा......
दुमडलेले कापड, सरळ, एकसारखा धावदोरा...... खूपच धावपळ झाली. आई आणि बाई दोघींच्या पसंतीस उतरेपर्यंत उसवून पुन्हा शिवायचे. हळूहळू करत जमले. हेम, उलटी टीप, काजबटण, हुक लूप असे एक एक करत जमू लागले. ते उत्तम कसे होईल ह्याच्या टिप्स आई द्यायची.
पण कापडाचे आणि माझे सूत विशेष जुळले नाही.
उंची वाढल्यामुळे शिलाई मशीन चालवायला जमू लागले. वाटले झालं आता आपण चांगले शिवू शकू.
सातवीत स्वतःचे युनिफॉर्मचे ब्लाऊज शिवायला होते. तेव्हा लक्षात आले की शिवण्याआधी बेतावे पण लागते आणि ती सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया पाहून शिवणे हे आपले काम नाही.....हे मनात पक्के झाले. गळा, मुंढा, बाह्या, बटण पट्टी, काज पट्टी, क्रॉस पट्टी..... बापरे सगळे डोक्यावरून जायला लागले. कसे बसे ते ब्लाऊज पूर्ण झाले.(पांढऱ्याचे काळे झाले असावे बहुदा. आता आठवत नाही.)
माझा शिवण यंत्राचा संबंध सुट्टीत यायचा. वहीच्या कागदाला, दोरा न ओवता मी भोके पाडून सुट्टीत शाळा शाळा खेळण्यासाठी पावती पुस्तके बनवायची. सुई खराब झाली म्हणून आई ओरडायची परंतु मशीन चालविण्याची माझी हौस भागायची. प्रात्यक्षिक जमत नसले तरी मशीनची सगळी माहिती मला होती. तुटलेली वादी जोडणे, बॉबीन भरणे, तेल घालणे ही सर्व कामे मी आनंदाने करत असे.
बारावी नंतर मात्र मी शिवण शिकावे ह्यासाठी आईने जोरदार प्रयत्न सुरू केले. घरासमोरच क्लास होता..... तिथे जाऊन तरी शिक ह्यासाठी दबाव टाकू लागली. आमचे बोलणे ऐकून माझी धाकटी बहीण नीता म्हणाली की मी जाऊ का क्लासला? मी तर सुटकेचाच निश्वास टाकला.
पुढे तीन वर्षे नीता माझे ड्रेस शिवत होती. जगातले हे एकमेव उदाहरण असेल की धाकटी मोठीचे कपडे शिवते आणि मोठी बिनधास्त( निर्लज्जपणे) घालते. बी कॉम ची तीन वर्षे व्यवस्थित पार पडली. परीक्षेच्या आधीच बँकेत निवड झाल्याचे समजले होते.......आता फक्त कॉल लेटरची वाट बघायची होती. परीक्षा झाली आणि आईने फर्मान काढले शिवण क्लास मध्ये नाव घालून आले आहे उद्या पासून जायचे आहे. आता कोणतीच पळवाट नव्हती. शेवटी मी क्लासची पायरी चढले.
इथेही पुन्हा तेच.....आधी हाताने शिवून मग मशीनची टीप.... आई, मावशी आणि नीता खूपच सफाईदार आणि नीट नेटके शिवायच्या,त्यामुळे मी शिवलेले मलाच आवडायचे नाही. रडतखडत दोन तीन प्रकारची झबली,टोपडी करत गाडी ब्लाऊज पर्यंत आली.
आणि बँकेचे कॉल लेटर आले.... तेही...लोणावळा शाखेसाठी....सकाळी 8 च्या लोकलने जाऊन 6च्या लोकलने परत.....आपोआपच शिवणाचा विषय बाजूला पडला.
नंतर पुन्हा मी शिवणाच्या वाटेल गेले नाही. शिवायला टाकलेले कपडे वेळेवर मिळाले नाहीत की आईच्या हट्टाची आठवण यायची ....पण ती तेव्हढ्या पुरतीच. आता तर सगळे कपडे रेडिमेड मिळतात ते पण उत्तम क्वालिटीचे त्यामुळे शिवणाचा विषय मागेच पडला.
मागच्या वर्षी सुनेने गोड बातमी दिली आणि नवजात शिशूच्या स्वागताची तयारी करू लागले. सगळे रेडिमेड मिळत असले तरी कोवळ्या जीवाला बाजारातील कपडे घालायला मन तयार होईना. बेंगलोरला आसपास कोणी शिवून द्यायला कोणी नव्हते. भाषेची अडचण होतीच. मग मी मनाशी पक्का निश्चय केला ......मीच शिवणार!
सिंगरचे मशीन विकत घेतले. आईचे मनोमन स्मरण केले. यु ट्यूबचा सहारा घेतला. नीताचा जावेचा सल्ला घेतला आणि चक्क चार पाच झबली,दुपटी, लंगोट शिवले. ( झाली यथातथाच )
आता बरोबर वर्षांनी लेकीच्या मैत्रिणीने,"आंटी मेरे बेबी केलिए दो तीन ड्रेस सीलाके डिजीए ना!" अशी प्रेमळ मागणी केली आहे आणि अर्थातच मी ती पूर्ण करणार आहे.
माझ्या आईला जे जमले नाही ते नातीने जन्माला येण्या आधीच करून घेतले.
इति शिवण कथा समाप्त!
तळटीप : सासूबाईंवर इम्प्रेशन मारण्यासाठी साखरपुड्याच्या साडीवरचे ब्लाऊज मी स्वतः शिवले होते.😜
#smitanubhav96
Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment