स्पर्श मायेचा
शांत झोपलेल्या मुक्ताकडे प्रेमाने बघत सौरभ आवाज न करता, हळूच बाहेर आला. "झोपू दे निवांत, हॉस्पिटलमधून यायला खूपच उशीर झाला होता." असे मनाशी म्हणत सौरभ स्वयंपाक घरांत आला. शांताबाईंची सकाळची कामे आवरली होती. प्रसन्न हसून त्यांनी सौरभला म्हटले, "अरे काल मुक्ताची खूप धावपळ झाली. रात्री इमर्जन्सी आल्याने उशीर झाला. आज तिला मी सांगणार आहे थोडी विश्रांती घ्यायला. फार दमून गेलीय पोर."
" आई! मी हाच विचार करत होतो, मी बोलणार इतक्यात तू बोललीस" हसत सौरभ म्हणाला. चहा घेता घेता मायलेकरांच्या गप्पा सुरु होत्या.
विनायकराव मराठे चिखली गावातील संपन्न व्यक्तिमत्व ! भरपूर शेती आणि अनेक छोटे मोठे उद्योग. अतिशय सज्जन आणि पापभिरु. सदैव मदतीस तयार. शेतातील आणि कारखान्यातील लोकांवर अतिशय प्रेम. शांताबाईंची त्यांना चांगली साथ होती. गावांतील बायका हक्काने त्यांच्याकडे मदत मागायच्या. सौरभ आणि विशाखा ही त्यांची मुले. दोघेही हुशार आणि नम्र. अगदी आईवडिलांसारखी. विशाखा सासरी सुखात होती आणि डॉक्टर झाल्यावर सौरभने गावातच हॉस्पिटल सुरू केले होते. मुक्ता अगदी सौरभला साजेशी होती. स्त्री रोगतज्ञ असलेली मुक्ता दुधात साखर विरघळावी तशी सासरी मिसळून गेली होती. संपन्नता होती पण माज नव्हता. पैसे नाहीत म्हणून कुठलाही पेशंट उपचाराविना रहात नसे. माणुसकी हाच धर्म होता. लक्ष्मी, सरस्वती आणि अन्नपूर्णा ह्याचा अनोखा मेळ मराठ्यांच्या घरी होता.
सौरभ आवरून हॉस्पिटलमध्ये जायला निघाला, इतक्यातच प्रसन्नपणे हसत मुक्ता सामोरी आली. तिचे ते सुस्नात रूप पाहून सौरभ खूष झाला.
"सौरभ, आज मी हॉस्पिटलमध्ये येत नाही. विशेष महत्त्वाची कोणतीही केस नाही आहे. काही लागले तर फोन कर. मी येईन लगेच. थोडी विश्रांती घेते आणि भोपाळच्या कॉन्फरन्सची तयारीही करते." कॉन्फरन्स झाल्यावर आजूबाजूच्या ठिकाणांना भेट द्यायचा त्यांचा विचार होता.
"मुक्ता, खूप आनंदात दिसते आहेस. आक्कासाहेबांनी दर्शन दिले का?"
"हो रे, खूप दिवसांनी काल स्वप्न पडले." मुक्ता म्हणाली.
" माझे आणि आईचे मगाशीच बोलणे झाले की आज तुला विश्रांतीची गरज आहे म्हणून. तू थांब घरी. दोन्ही कामे होतील. भोपाळला जायचे मी विसरलोच होतो. चल पळतो मी. पेशंट वाट पहात असतील." असे म्हणून सौरभ बाहेर पडला.
" मुक्ता, ब्रेकफास्ट करून, मग लाग हो कामाला." बाहेर येत शांताबाई म्हणाल्या.
" हो आई. थोडावेळ पेपरची तयारी करेन आणि मग दुपारी विश्रांती घेईन" मुक्ता म्हणाली.
वाफळत्या कॉफीचा मग घेऊन मुक्ता खोलीत आली. तशी मुक्ता नेहमीच आनंदी, हसरी असायची. पण विशेष खूष असली की तिला खिडकीतून बाहेर बघत कॉफी प्यायला फार आवडायचे. कळतंय तेव्हा पासूनची तिची ही सवय. कॉफी संपवून मुक्ताने लॅपटॉप उघडला आणि पेपरची तयारी करू लागली. ज्युनियर असूनही ऑल इंडिया कॉन्फरन्स मध्ये तिला पेपर वाचायची संधी मिळाली होती. मुक्ता जात्याच हुशार,अभ्यासू आणि सिन्सियर होती. सौरभशी लग्न झाल्याने तिच्या कर्तृत्ववाला आणखी तेज आले होते.
"सुनबाई चला जेवायला, काम काय होतच राहील."
विनायकरावांनी मुक्ताला हाक मारली.
"आले बाबा. तुम्ही सुरू करा." मुक्ता म्हणाली.
"शिवा, तू पण जेवण करून मगच जा रे शेतावर." जेवायला जाता जाता विनायकरावांनी सांगितले.
हसत खेळत जेवणं झाली. भोपाळच्या कॉन्फरसबद्दल
चर्चा झाली. विनायकरावांनी शेताच्या, कारखान्याच्या गोष्टी सांगितल्या.
"बाबा, भोपाळहून आल्यावर एक दिवस मी येईन कारखान्यात, मंथली चेकअपसाठी. आधी जरा गडबड होईल असे वाटते."
" काही हरकत नाही. तशी कुणाला गरज असेल तर त्यांना मी हॉस्पिटलमध्ये पाठवून देईन. तू तुझ्या तयारीकडे लक्ष दे."
पाठीमागचे सगळे आवरून मुक्ता बेडरूममध्ये आली. आता तासभर तरी झोप काढावी असा विचार करून बेडवर पडली. डोळे मिटताच रात्रीच्या स्वप्नाची आठवण आली आणि आक्कासाहेबांचा प्रसन्न चेहरा
डोळ्यासमोर आला.
आक्कासाहेब.... खरं तर अशी कोणतीच व्यक्ती मुक्ताच्या ओळखीची नव्हती. स्वप्नातल्या त्या स्त्रीला मुक्ताने आणि तिच्या आई दादांनी दिलेले ते नाव होते.
मुक्ता एकुलती एक मुलगी. अगदी लाडाची. हुशार आणि समजूतदार. आळंदीला इंद्रायणी काठी त्यांचे टुमदार, छोटे घर होते. दादांना भजन कीर्तनाची खूप आवड होती. नोकरी सांभाळून संध्याकाळी देवळांत कीर्तन करीत असत. मुक्ता आईबरोबर देवळांत जात असे. दादा कीर्तनातून इतिहासातील गोष्टी सुद्धा सांगायचे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे ह्यांच्या गोष्टी ऐकताना मुक्ता अगदी तल्लीन व्हायची.
मुक्ता चौथीत असतानाची गोष्ट. दादांनी कीर्तनात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची गोष्ट सांगितली. मुक्ताला ही गोष्ट खूप जवळची वाटली. आपली वाटली. लहान असल्याने तिला तसे काही आई दादांना सांगता आले नाही. पण तिच्या मनांत ती गोष्ट रुजली होती.
मुक्ताची चौथीच्या स्कॉलरशिपची परीक्षा होती. आदल्या रात्री तिला मस्तकावर हात ठेवून,"यशस्वी भव" असे म्हटल्या सारखे वाटले. डोळ्यासमोर खूप सुंदर, खानदानी, सात्त्विक चेहऱ्याची, खूप दागदागिने घातलेली, डोक्यावरून पदर घेतलेली, प्रसन्न, हसतमुख स्त्री दिसली. सकाळी उठल्यावर मुक्ताने आई दादांना ही गोष्ट सांगितली. मुक्ता सांगत होती तशी कोणीच व्यक्ती त्यांच्या ओळखीत नव्हती.
मुक्ता ही लहान असल्याने जास्त काही सांगू शकली नाही. शुभ संकेत मिळाला असे म्हणत सगळे कामाला लागले.
स्कॉलरशिपची परीक्षा झाली. सुट्टी सुरू झाली. ती घटनाही सगळे जण विसरून गेले.
बघता बघता रिझल्टचा दिवस जवळ आला. मुक्ताला पुन्हा तेच स्वप्न पडले, "यशस्वी भव". खरचं मुक्ता पहिली आली होती. नंतर हे वारंवार घडू लागले. मुक्ताने कोणतीही चांगली गोष्ट केली की तो मायेचा हात तिच्या मस्तकावर फिरत असे. मग तिघांनी मिळून त्या "स्त्री" ला आक्कासाहेब म्हणायला सुरवात केली. असे स्वप्न पडले की मुक्ता विशेष खूष असे आणि एक वेगळीच ऊर्जा तिला मिळत असे.
बघता बघता मुक्ता मोठी झाली आणि तिने मेडिकलला प्रवेश घेतला. तिच्या बुद्धीचा आवाकाच मोठा होता. नेहमीच्या अभ्यासाबरोबरच तिने आयुर्वेदाचा अभ्यास करायला सुरुवात केली. पुढची सात आठ वर्षे अभ्यासात कशी गेली ते कळलेच नाही. इंटर्नशिप पण आळंदीतच करायला मिळाली. तिच्या हाताला गुण होता, स्वर प्रेमळ आणि आश्वासक होता. आयुर्वेद आणि अँलोपॅथी ह्याचा सुरेख संगम तिच्या औषधोपचारांत होता. बघता बघता तिचे नाव पंचक्रोशीत पसरले. सौरभशी लग्न झाले आणि तिचे क्षितिज आणखी विस्तारले. चिखली आळंदी अंतर जास्त नसल्याने तिचे पेशंट सुद्धा खूष होते. दोघे मिळून समाजसेवा करत होते.
आक्कासाहेबांचा विचार करत असताना मुक्ता, मनाने बालपणापासून ते आतापर्यंतच्या क्षणापर्यंत विहार करून आली आणि एकदम तिला पेपर पूर्ण करायचा आहे ह्याची आठवण झाली. आक्कासाहेबांच्या विचाराने ती ताजीतवानी झालीच होती, पटकन तिने लॅपटॉप उघडला आणि कामाला सुरुवात केली.
कॉन्फरन्स मधील तिच्या पेपरचा विषय होता "प्रसुती शास्त्रांत आयुर्वेदाचा उपयोग!"
भोपाळची कॉन्फरस उत्तमच झाली. मुक्ताची सगळ्यांनी खूप स्तुती केली. नवीन माहिती मिळाली. जुने मित्र मैत्रिणी भेटले. सगळ्यांनी मिळून महेश्वरला जायचे ठरले. संध्याकाळ होत असतानाच त्यांनी महेश्वर मध्ये प्रवेश केला. रात्र होण्याआधी नर्मदेकाठी जाऊ असे सर्वानुमते ठरले आणि गाड्या घाटाकडे वळल्या.
घाट आणि आजूबाजूचा परिसर मुक्ताला ओळखीचा वाटू लागला.
ती तसे सौरभला म्हणताच तो म्हणाला," मुक्ता, अग तू इंद्रायणीकाठी रहात होतीस ना? म्हणून तुला असे वाटत असेल. तू असा रम्य देखावा नेहमीच पहात आल्याने तसे वाटू शकते."
"तसंच असेल" असं म्हणून मुक्ताने नर्मदेत पाय बुचकळले आणि नमस्कार केला. पाय धुवून सगळे काठावरच्या महादेवाच्या मंदिरात आले. दर्शन घेऊन मुक्ता देवळाच्या गवाक्षांत आली. तिथून नर्मदेचे पात्र आणि रम्य निसर्ग दिसत होता.
"सौरभ, मी थोडावेळ ह्या गवाक्षांत बसू का? तुम्ही सगळे या फिरून." मुक्ताचे खिडकीप्रेम माहीत असल्याने सौरभ लगेच हो म्हणाला...पण गवाक्ष शब्दांचे जरा त्याला आश्चर्य वाटले. असो म्हणून तो मित्रांबरोबर गेला. मुक्ता गवाक्षांत बसली आणि डोळे मिटून घेतले. नर्मदेच्या पाण्याची झुळझुळ तिला सुखावत होती.
"मुक्ताबाई! उठतेस ना? बघ भाट गाऊ लागले आहेत. आजोबा स्नानांसाठी नर्मदेवर गेले आहेत. त्यांच्या बरोबर देवघरात पूजेला बसणार आहेस ना?"
सावित्रीबाई आपल्या लाडक्या नातीला उठवित होत्या.
मुक्ताबाई, सरदार रास्तेच्या घरातील एकुलती एक कन्या. गेल्या तीन पिढया त्यांच्या घराण्यांत कन्यारत्न जन्मले नव्हते. त्यामुळे मुक्ताबाईंच्या जन्माने सगळे खूप आनंदात होते. मुक्ताबाई सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होती. सावित्रीबाई तर तिला एकक्षण दृष्टिआड होऊ देत नसत.
सरदारांचा कारभार खूप मोठा होता. शेती आणि महेश्वरी साड्यांचे माग होते. शे दिडशे लोकांचे ते पोशिंदें होते. पंचक्रोशीत त्यांचा आदरयुक्त धाक होता. कोणाच्याही गरजेला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.
घरांत धार्मिक वातावरण होते. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या विचारांचा पगडा होता. सरदार रोज स्वतः रुद्राभिषेक करीत असत.
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ १॥
एक ब्राह्मण ह्या श्लोकाचा अखंड जप करत असे.
हा जप केल्यामुळे गतवैभव परत येते आणि असलेले चिरकाल राहते असा विश्वास अहिल्याबाई होळकरांना होता आणि तीच परंपरा सरदार रास्ते चालवित होते.
सावित्रीबाईंची घरादारावर नजर होती. दारी आलेला कधी रिक्तहस्ते परत गेला नव्हता. त्यातून त्यांना झाडपाल्याच्या औषधांची माहिती होती. अडले नडलेले, बाया बापड्या त्यांच्याकडून औषध घेऊन जायच्या. त्यांना सुईणीची कला अवगत होती. अडलेल्या स्त्रीची सुटका करायला, रात्री बेरात्री सुद्धा त्या मदतीला धावून जायच्या. आपला हा वारसा मुक्ताबाई चालवेल असे त्या वारंवार म्हणायच्या.
अश्या वातावरणात मुक्ताबाई मोठी होत होती. रेशमी परकर पोलक्यातील मुक्ताबाई आपले नाजूक पैंजण वाजवीत वाडाभर भिरभिरत असायची. आपल्या गोड बोलण्याने सगळ्यांना आपलेसे करायची. सावित्रीबाई तिला रामायण, महाभारतातील गोष्टींबरोबर शिवाजी महाराज, आहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या गोष्टी सांगायच्या.
सगळे सुरळीत सुरू होते आणि इंग्रजांनी महेश्वरवर हल्ला केला. इंग्रजांनी स्थानिक लोकांची संपत्ति
बळकावयाला सुरुवात केली. जे कोण विरोध करत होते त्यांना मारायला ही मागे पुढे पहात नव्हते.
सरदार रास्त्यांनीही जमवाजमव सुरू केली. पूर्ण शक्तीनिशी इंग्रजांना विरोध करायचाच निर्धार त्यांनी केला होता. ह्याची कुणकुण इंग्रजांना लागली. एकाने बंड केले तर सगळेच करतील ह्या भयाने इंग्रजांनी एक भयंकर निर्णय घेतला आणि अमावस्येच्या रात्री त्यांनी सरदार रास्तेंचा वाडा पेटवून दिला.
कोणाला काही कळायच्या आतच तो ऐश्र्वर्यसंपन्न वाडा झोपलेल्या माणसासहित जळून खाक झाला.
"मुक्ता, त्या जन्मी अपूर्ण राहिलेली माझी इच्छा आणि काम तू आता करत आहेस. यशस्वी हो बाळ!" पुन्हा तोच मायेचा हात मुक्ताच्या माथ्यावरून फिरला.
"आक्कासाहेब.....आक्कासाहेब थांबा ना.." मुक्ता सावित्रीबाईंना म्हणाली.
"आता मी तुझ्याकडेच येणार आहे ग!" असे म्हणत सावित्रीबाई अदृश्य झाल्या.
"मुक्ता सावध हो." चक्कर आल्याने बाहुपाशात विसावलेल्या मुक्ताला सौरभ म्हणत होता.
इतक्यात तिची मैत्रीण डॉक्टर विभा पुढे आली आणि मुक्ताची नाडी बघू लागली. काही सेकंदातच विभाचा चेहरा हसरा झाला आणि ती म्हणाली, "डॉक्टर साहेब गुड न्यूज आहे बरं! गेल्यावर टेस्ट करूच. स्वतः स्वतःवर उपचार करायचे नाहीत बरं मुक्ताबाई. ह्या क्षणापासून.... मुक्ता.... तू माझी जबाबदारी!".
आक्कासाहेबांचे गुपित कधी एकदा सौरभला सांगते असे मुक्ताला झाले होते. आनंदातिशयाने मुक्ताने डोळे मिटले आणि पुन्हा तोच मायेचा स्पर्श जाणवला!
स्मिता बर्वे
बेंगलोर
15/05/2020
फोटो सौजन्य : रवी खोत.
Comments
Post a Comment