#व्हॅलेंटाईनडे!.... #असाही!
#स्मितानुभव
#कथास्पर्धा_2
स न वि वि फेसबुक ग्रुपवर कथा स्पर्धा होती. ह्या थीम प्रमाणे कथा पुढे न्यायची होती.
भयकथा किंवा प्रेमकथा
**********************
प्रेयसी प्रियकराला हॉलच्या बाहेर घेऊन येते...
क्लिंक क्लिंक शॅम्पेन ग्लासेस अलगद एकमेकाला टेकतात..
आत मेक्सिकन शफल च्या धुंद orchestra वर युगुलं चा चा चा किंवा जाइविंग किंवा फॉक्स ट्रॉट नृत्यात मश्गुल झाली आहेत...
अचानक प्रेयसी खूप घाबरल्यासारखी करते... त्याच क्षणी आत ऑर्केस्ट्रा ड्रमवाला सिम्बलसचा झणझणा आवाज करतो...
***********
कथापूर्तीची थीम मिळाली आणि मी सर्व आशा सोडून दिल्या. त्यातील शब्दच माहिती नव्हते आणि माहीत असलेला शब्द
#शॅम्पेन............ ती पण क्रिकेटची मॅच जिंकल्यावर उडविताना पाहिलेली!
बाकी गोष्टी मुलांना भीतभितच विचारल्या. अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी ही गोष्ट लिहिल आणि ...............
ह्या कथास्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला.
#प्रथम_क्रमांकाची_ही_माझी_कथा
#व्हॅलेंटाईनडे!.... #असाही!
व्हॅलेंटाईन डे! तन्वीने आज जाणीवपूर्वक तन्मयच्या आवडीचा आकाशी लॉंग स्कर्ट घातला होता. त्याला मॅचिंग असलेला निळ्या खड्यांचा नेकलेस तिच्या सौंदर्यात भर घालत होता. ओठांवर हलकेच लिपस्टिक फिरवत तन्वी आरश्यात डोकावली. स्वतःच्या मोहक रूपाकडे पाहून स्वतःशीच लाजली. तन्मय आता काय काय बोलेल ह्या कल्पनेनेच तिच्या गालांवर गुलाब फुलले आणि स्वतःशीच हसत ती बेडरूमच्या बाहेर आली. तन्मय ऑफिसमधून आला की आज ती दोघे "ब्ल्यू पॅराडाईज"ला जाणार होती. आज खास त्यांचीच... त्या...दोघांचीच पार्टी होती. ब्ल्यू पॅराडाईज हे दोघांचेही आवडते ठिकाण होते. विशेषतः तेथील ऑर्केस्ट्रा त्या दोघांनाही खूप आवडायचा. तन्वी तन्मयची आतुरतेने वाट पहात होती. ती विचारात मग्न असतानाच तन्मय आत आला आणि त्याने तिला मागून हलकेच मिठीत घेतले. तिच्या मानेवर ओठ टेकत तो पुटपुटला,"मार्व्हलस"
लटक्या रागाने त्याला दूर करत तन्वी म्हणली, " चल पट्कन तयार हो. गिझर ऑन आहे आणि तुझे कपडे पण काढून ठेवले आहेत." तन्मय बेडरूमकडे पळाला आणि तन्वी त्याचे रुबाबदार रूप आठवत त्याची वाट पाहू लागली. तिची तंद्री भंगली, ती चिरपरिचित अरमानी परफ्यूमच्या सुगंधाने! निळ्या सुटातील तन्मय झुकून तिला निघण्याची विनंती करत होता. त्याच्या नाटकाने खूष होऊन, गुणगुणतच तन्वी त्याच्या हातात हात गुंफत निघाली.
कारचा दरवाजा उघडत असताना तन्मय गुणगुणत होता,
"ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें कोई राज़ है इनमें गहरा
तारीफ़ करूँ क्या उसकी जिसने तुम्हें बनाया"
गाणे ऐकून तन्वीला हसू आले. तन्मयच्या बाकी सगळ्या आवडी पाश्चिमात्य होत्या, मॉडर्न होत्या. त्याला भारतीय काहीही आवडायचे नाही. पण तन्वीसाठी तो नेहमी हेच गाणे म्हणायचा. प्रेमाच्या धुंदीत रस्ता कधी संपला ते त्यांच्या लक्षांतच आले नाही. "ब्ल्यू पॅराडाईज" निळ्या रंगाच्या दिव्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाले होते. तन्वी आणि तन्मय कार मधून उतरून हात गुंफून हॉटेलकडे चालू लागले. उपस्थित सगळे ह्या " made for each other" जोडीकडे पुन्हा पुन्हा पहात होते.
हॉल मधील वातावरण एकदम गुलाबी, रोमॅन्टिक होते. मेक्सिकन शफल च्या धुंद orchestra वर युगुलं
"चा चा चा " नृत्यात मश्गुल झालेली होती. तन्वी आणि तन्मय सराईतपणे त्यांच्यात सामील झाले. दोघेही एकमेकांत हरवून गेले. डान्स करून दमल्यामुळे तन्वी ओढत तन्मयला हॉल बाहेर घेऊन आली. तिच्याकडे लक्ष न देताच तन्मयने तिला बारकडे खेचले आणि शॅम्पेनची ऑर्डर दिली.
शॅम्पेनचे नाजूक ग्लास ....
क्लिंक क्लिंक अलगद एकमेकाला टेकले, चिअर्स म्हणत, एकमेकांच्या डोळ्यांत पहात दोघांनीही सिप केले.
तन्वी," I Love you तन्मय!" असे म्हणत असतानाच तिचे लक्ष ऍडव्होकेट अविनाशकडे गेले. अविनाशला पाहून तिचा चेहरा पडला. रोमँटिक भाव जाऊन तिथे भीतीचे सावट आले आणि त्याच क्षणी आत ऑर्केस्ट्रातील ड्रमवाल्याने सिम्बलसचा झणझणा आवाज केला.......जणू धोक्याची सुचना!
पुढे काय झालं ते तन्वीच्या आकलनापलीकडले होते. तन्मय आणि अविनाशने तिला धरून खुर्चीवर बसविले. अविनाशने बॅगतून कागदपत्रे काढली. दोघेही एक शब्दही बोलले नाहीत आणि तन्वीने ही न बोलता यंत्रवत स्वाक्षरी केली. ह्या सगळ्या प्रकाराने थकून तिने टेबलावर डोके टेकले आणि डोळे मिटून घेतेले.
तन्मयने अविनाशला खुणेनेच जायला सांगितले. अविनाश गेल्यावर त्याने हलकेच तन्वीला आधार देऊन उठविले आणि गाडीकडे घेऊन आला. निःशब्दपणे त्यांचा प्रवास संपला आणि दोघे घरी आले.
तन्मयशी काहीही न बोलता तन्वी बेडरूममध्ये गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला. धाडकन स्वतःला बेडवर झोकून दिले आणि इतकावेळ थांबवून धरलेल्या अश्रूंना वाट करून दिली. वर्षभराची तिची सारी मेहनत ऐका सहीने आज संपुष्टात आली होती. थोड्यावेळाने, जरा शांत झाल्यावर, सावकाश उठून तन्वी बाथरूममध्ये गेली. डोळ्यावर पाणी मारले, फ्रेश होऊन बाहेर आली. निमूटपणे बॅग भरायला घेतली. "आज ह्या घरातला आपला शेवटचा दिवस!" तन्वी पुटपुटली.
आपल्या अलिशान बंगल्यात दादासाहेबही जागेच होते. उद्याची सकाळ कशी असणार? हीच चिंता त्यांना सतावीत होती. विचार करत असतानाच मागचा वर्षा दीड वर्षाच्या काळ त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तन्मय त्यांचा एकुलता एक मुलगा. आईविना पोर म्हणून खूप लाडाने वाढविलेला. दादासाहेबांचा धंद्याचा व्याप खूप मोठा होता. तन्मयकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी पहिल्यापासूनच त्याला होस्टेलवर ठेवले. तन्मयही खूप हुशार होता. अभ्यासांत, खेळांत सगळीकडे पहिला असायचा. सुट्टीत घरी आला तरी सतत वाचनांत गढलेला असायचा. दादासाहेबांनाही त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. ह्याचा एकत्रित परिणाम होऊन तन्मय एकलकोंडा झाला. परदेशी जाऊन परत आल्यावर तर फारच विचित्र वागू लागला होता. भारतातील काहीच त्याला आवडत नव्हते. प्रेम वगैरे सगळे झूठ आहे. आपलं वगैरे काही नसतं. असेच तो बोलत असे. एक दिवस दादासाहेबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर तन्मय म्हणला, "माझा लग्नावर विश्वास नाही. मला त्या बंधनात अडकायचे नाही."
तरुणपणी पत्नी गमावून, तिच्या आठवणीत जगणाऱ्या दादासाहेबांना, हा खूपच मोठा धक्का होता. चिरंजीवांचे मॉडर्न विचार ऐकून ते हतबुद्ध झाले. त्यांनी तन्मयला समजविण्याचा खूप प्रयत्न केला.
शेवटी एकदा कंटाळून तन्मय म्हणाला,"तुमच्यासाठी, फारतर मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करीन! एक वर्ष."
दादासाहेबांच्या मनांत तन्वीला सून करून घ्यायचे होते. तन्वी त्यांच्या मित्राच्या बहिणीची मुलगी. दिसायला सुरेख, हुशार आणि लाघवी. कुठेही गेली तरी सगळ्यांना आपलेसे करणारी. लहान थोर कोणातंही मिसळून जाणारी. सोज्वळ, सात्विक आणि मॉडर्न सुद्धा.
तन्मयच्या विचित्र अटीने सगळाच गोंधळ झाला होता. सभ्य, सुसंस्कृत तन्वीच्या आईवडिलांना विचारायचे धाडस दादासाहेबांकडे नव्हते. शेवटी त्यांनी आपला मित्र शरद, ह्याला सगळी परिस्थिती सांगितली आणि मध्यस्थी करण्याची विनंती केली. दादासाहेबांना आतून कुठून तरी विश्वास वाटत होता की हीच मुलगी तन्मयला योग्य आहे, हीच मुलगी आपल्या घराचे हरविलेले घरपण परत आणेल.
तन्वीच्या घरी सुद्धा लग्नाविषयी बोलणी सुरू होती. शरदने तन्मयचा फोटो दाखवून तन्वीला विचारले,
" बघ आवडतोय का?" रुबाबदार तन्मयचा फोटो पाहून तन्वी प्रथमदर्शनीच त्याच्या प्रेमात पडली. हळूच शरदने तन्मयची अट आपल्या भाचीच्या कानी घातली. तन्वीला काय बोलावे ते कळेना. तिचे संस्कार तिच्या आड येत होते. तिचे आईबाबा तर चक्क नाही म्हणाले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची विचित्र अट सोडली तर लाखांत एक होता तन्मय. तन्वीला पण आतून कुठेतरी वाटत होते की माझ्या प्रेमाने ह्याचे विचार बदलतील. शेवटी हो नाही, हो नाही करता करता तन्वी हे आव्हान स्वीकारले.
लगेचच शरदने दादासाहेबांना तन्वीचा होकार सांगितला आणि तन्मयशी बोलायला सांगितले. दादासाहेबांनी तन्मयला हाक मारली,
"अरे तन्मय, हा फोटो बघ तुला आवडतो आहे का?"
"दादा तुम्ही माझी अट सांगितली आहे ना?"
"हो रे बाबा, सांगितली आहे. ती तयार आहे. तू फोटो तरी बघ." दादा म्हणाले.
"अरे वा! भारतातही माझ्यासारखे विचार करणारे आहेत तर!" पाकिटातून फोटो काढत तन्मय म्हणाला.
तन्वीचा मॉडर्न वेशभूषेतील फोटो तन्मय पहातच बसला. दादासाहेबांनी त्याला भानावर आणले.
"आवडली असेल तर भेटून घ्या एकदा, लगेचच बार उडवून देऊ." मनातील आशा कायम ठेवत दादासाहेब बोलले.
दुसऱ्या क्षणी तन्मय कोरडे पणाने म्हणाला, "भेटायची काही जरुरी नाही. Any way कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. माझा होकार आहे. पण लग्न झाल्यानंतर आम्ही गावाबाहेरच्या बंगल्यात रहायला जाऊ." तन्मयला भावनिक गुंतागुंत नको होती.
व्हॅलेंटाईन डे ला कॉन्ट्रॅक्ट साईन झाले आणि तन्वी तन्मय बरोबर गावाबाहेरच्या बंगल्यात रहायला गेली.
आधी कोरडेपणानी वागणारा तन्मय हळूहळू बदलू लागला होता. तन्वीपण त्याला वेळ देत होती, त्याची स्पेस जपत होती. त्याच्या आवडी निवडी जपत होती. दोघेच रहात होते तरी वर्षभराचे सणवार तिने उत्साहाने साजरे केले. दादासाहेबांचा वाढदिवस तिने बंगल्यावरच छोटेखानी पार्टी देऊन साजरा केला.
"कार्येषु मन्त्री करणेषु दासी
भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।
धर्मानुकूला क्षमया धरित्री।।
ह्या संस्कृत सुभाषिताला प्रमाण मानून तन्वी वागत होती. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, हे काल सही करेपर्यंत तन्वी विसरलीच होती. अडव्होकेट अविनाश ला पाहून ती भानावर आली.
सकाळ होतच आली होती. तन्वीने स्वतःचे आवरले. तन्मयसाठी चिठ्ठी लिहून ठेवली. बॅग घेऊन निघण्यासाठी बेडरूमचे दार उघडायला जात असतानाच, तिला टकटक केल्याचा भास झाला. मान झटकून तिने दार उघडले तर दारांत तन्मय उभा होता.
विस्फारलेल्या डोळ्यांनी तन्वी त्याच्याकडे पहातच राहिली. निळसर रंगाचा झब्बा, त्याला मॅचिंग धोतर, टोपी आणि कपाळावर गंध लावून सुहास्य वदनाने तन्मय उभा होता.
गुढघ्यावर बसत, तिच्या हातात लाल गुलाबाचा गुच्छ देत तन्मय म्हणाला," प्रिये आयुष्यभरासाठी साथ देशील का?"
"चल, नाटकी कुठला!" असे म्हणत तन्वी त्याच्या मिठीत शिरली.
"तन्वी, अग विचार तरी काल कश्यावर सही घेतलीस म्हणून!अग वेडे आपल्या लग्नाची नोटीस होती ती, लग्न जरी पारंपरिक पद्धतीने, वाजतगाजत केले तरी रजिस्टर करावेच लागते ना? म्हटलं व्हॅलेंटाईन डे ची भेट द्यावी तुला! "
लाडाने त्याच्या छातीवर मारत म्हणली," किती दुष्ट आहेस. रात्रभर रडत होते मी!"
"मुद्दामच तुला मी डिस्टर्ब केले नाही. मला बाकीची तयारी करायची होती ना? ये बाहेर."
टेबलावर निळा शालू, दागिने आणि टप्पोऱ्या मोगऱ्याचा गजरा ठेवला होता.
"चल पट्कन तयार हो, दादा सुनेची आतुरतेने वाट पहात आहेत. तुझे आईबाबा आणि शरद मामा तिकडेच येत आहेत. त्यांना बाकी काही माहीत नाही. आपण त्यांना सुखद धक्का देऊ या! आणि तुझ्या आवडीचे मंगळसूत्र पण घेऊया."
"तोच खरा दागिना!" खूष होत तन्वी म्हणाली.
तयार होऊन ही लक्ष्मी नारायणाची जोडी आपल्या घरकुलाकडे ओढीने निघाली.
" दादा! आम्ही आलो....कायमचे इकडे रहायला!" तन्वी आणि तन्मय एकदम चिवचिवले.
वाट हरविलेले पाखरू पुन्हा घरट्यात विसावले.
स्मिता बर्वे
बेंगलोर
03/05/2020
फोटो क्रेडिट : निती कुमठेकर.
सुंदर कथा असलेला ब्लॉग. लेखिकेने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अत्यंत रोचक अशा विविध कथा शब्द रुप केल्या आहेत.
ReplyDelete