आत्मकथा बाकाची
#स्मितानुभव
#कथास्पर्धा_1
आत्मकथा बाकाची!
चकचकीत घासून पुसून मी तयार झालो आणि संमेलनाच्या स्थळाकडे लगबगीने चालू लागलो. मनांत खूप उत्सुकता होती. आज पहिल्यांदा मी संमेलनात सहभागी होणार होतो. संमेलनाची तयारी, लगबग, धडपड मी जवळून अनुभवली होती पण त्यात मला कधीच सहभागी होता आले नव्हते. मला शाळेत सोडून सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून जायचे. विचारांच्या नादात संमेलनस्थळी कधी येऊन पोहचलो ते कळलेच नाही. सगळीकडे मस्त सजावट केली होती. वेगवेगळी पोस्टर्स लावलेली होती. शिशु शाळेतील बाक, शाळा कॉलेजमधील बाक आणि सार्वजनिक ठिकाणचे बाक अशी आमची व्यवस्था केली होती. ऐटीत जाऊन मी माझ्या जागेवर बसलो. कुतूहलाने आजूबाजूला पाहू लागलो. तर काय! कित्ती प्रकारचे बाक होते....लाकडी, फायबर, लोखंडी, सिमेंट बाप रे बाप! मला आपले वाटत होते की फक्त शिशु शाळेतील बाकच बदलले आहेत. मी इकडे तिकडे बघत असतानाच अगदी वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात झाली. चॉकलेट आणि पिवळे मऊ कापड देऊन सगळ्यांचे स्वागत केले गेले. आज पहिल्यांदाच मला असे चॉकलेट मिळाले होते....नाहीतर आतापर्यंत मी सांडलेले चॉकलेटच खाल्ले होते. मी चॉकलेटचा आस्वाद घेत असतानाच माझ्या नावाची घोषणा झाली, " मनोगत व्यक्त करायला आपल्यासमोर येत आहे....शिशु शाळेतील बाक " ! मी अवाकच झालो. आता मी काय बोलणार? हळूच स्टेजवर गेलो.
माझ्या आकाराप्रमाणेच माझे अनुभव विश्वही छोटेसेच आहे. जेमतेम दोन तीन वर्षाची चिमुकली मुले माझे साथीदार असतात. त्यांच्या निरागस सहवासात माझे दोन तीन तास खूप आनंदात निघून जातात. कधी त्यांच्यात लुटुपुटीचे भांडण होते. ते लांबून बघताना खूप मज्जा येते. खाऊ खातांना ती खाली सांडतात... तीच माझी मेजवानी असते. कधी कधी दोन मुलांना एकच बाक हवा असतो. बिचाऱ्या बाई! समजूत घालता घालता दमून जातात. मग काहीतरी शक्कल लढवून एकाला दुसऱ्या बाकांवर बसवितात. मी लांबून मस्त एन्जॉय करत असतो आणि हा हट्ट जर माझ्यासाठीचा असला तर मला फारच भारी वाटते. ऍक्टिव्हिटी करताना डिंक, रंग, पाणी ह्याने आंघोळ घालतात. कधी एखादी गोंडस परी माझ्यावर डोके ठेवून हळूच डोळे मिटते आणि अलगद परीच्या राज्यात जाते. हे दृश्य दिसायला खूप लोभस असते पण आतून जीव तुटतो हो! हल्ली किती लवकर शाळेत घालतात नै! बघता बघता तीन तास संपतात आणि बच्चे कंपनी आईकडे धावत सुटते. मावशी मला लख्ख करून पुन्हा ओळीत मांडून ठेवतात. उद्याच्या किलबिलाटाची वाट पहात मीही डोळे मिटून घेतो. वर्ष संपते ....काही मुले माझी शाळा सोडून मोठ्या शाळेत जातात तेव्हा पोटांत तुटते, पण नवीन खट्याळ कोणीतरी येणार ह्या कल्पनेने पुन्हा उभारी येते. सुट्टीत मला पण रंगरंगोटी करून नवीन वर्षातील मुलांच्या स्वागतासाठी तयार करतात...पुन्हा तीच गोड किलबिल अनुभविण्यासाठी! टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी माझ्या भावविश्वातून पुन्हा संमेलनात आलो.
मी स्टेजवर असतानाच शाळा कॉलेजातील बाक टुणकन उडी मारून वर आला. अगदी अवखळ, उत्साही विद्यार्थ्यांप्रमाणे! उत्स्फूर्तपणे तो त्याची कथा सांगू लागला. मी कायम फुलपंखी दिवसांत असतो. मुले अगदी न समजण्या इतकी लहानही नसतात आणि परिपक्व ही नसतात. माझ्या मांडीवर बसून अनुभवाच्या शाळेत शिकत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी लाजरी बुजरी असणारी मुले हळूहळू सरावतात. सुरवातीला पहिल्या बाकांसाठी धडपडतात आणि मग एकेक बाक मागे जातात. असे जणू ठरुनच जाते की पुढच्या बाकांवर बसलेली हुशार आणि मागे बसलेली ढ! अगदी शिक्षक सुद्धा तशीच हाक मारतात," बॅक बेंचर्स" द्या एखादे उत्तर द्या? किंवा काय कुठे लक्ष आहे? पण हल्ली टीचर सुद्धा बदलले आहेत हं! दर महिन्याला जागा बदलतात वर्गातील मुलांची. शिक्षकांना पट्कन विद्यार्थ्याचे नाव आठवले नाहीतर माझ्या नंबरला हाक मारतात,....
"ए तू रे तू चौथ्या बाकावरचा!"
छोट्याशा रोपट्याचा वृक्ष होतोना बघायचे आणि अनुभवायचे भाग्य मला मिळते. एकाच बाकावर बसल्याने जिवाभावाचे मैत्र मिळतात. कोण कुठल्या बाकांवर बसणार, म्हणून भांडणारी मुले एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायला लागतात. मुलांचे कर्तृत्व, कौतुक बघताना माझा उर भरून येतो. ह्यापैकी काही व्रात्य मुले माझ्या छातीवर करटकने जेव्हा ओरखाडे काढतात तेव्हा खूप दुखत हो मला! माझ्या मांडीवर बसून कधी कारस्थान रचतात तेव्हा कळ येते हो छातीतून!
कुणी हुशार, प्रामाणिक, शिस्तप्रिय तर कोणी उनाड, व्रात्य, चहाडखोर .... .....ते काय म्हणतात ना उडदा माजी काळे गोरे....तसंच काहीसं!
बघता बघता मुले मोठी होतात....काल परवा पर्यंत माझ्या अंगावर चढून दंगा मस्ती करणारी मुले, हातात पदवी घेऊन बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने प्रवेश करतात. एखाद्या निवांत क्षणी बागेतल्या बाकांवर बसून शाळेतल्या आपल्या बाकाची त्यांना आठवण येत असेल का? भावनाविवश झाल्याने शाळेतील बाकाचा गळा भरून आला.... त्याला पुढे बोलता येत नाही हे पाहून सार्वजनिक ठिकाणचा बाक पट्कन स्टेजवर गेला आणि त्याची आत्मकथा सांगू लागला!
तुम्हा दोघांपेक्षा माझे अनुभव क्षेत्र खूप वेगळे आणि विस्तीर्ण आहे. मला सगळ्यांनाच आपलेसे करावे लागते. थंडी,वारा, ऊन पाऊस कोणत्याही ऋतूत आबालवृद्धांसाठी मी असतो....सुखदुःख, आनंद, आशा निराशा, भविष्याची स्वप्न, एकटेपणा.....अशा सगळ्या भावभावनांचा मी साक्षीदार असतो.
दिवसभर कष्ट करून घरी परतणारा कष्टकरी माझ्यावर विसावतो तर दारू पिऊन तर्र झालेला माझ्या मांडीवर बसायला धडपडतो.
चालून दमलेला वाटसरू मला बघून हाशहूश करत जेव्हा टेकतो ना तेव्हा मी उन्हातान्हात काढलेल्या त्रासाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
कधी प्रेमालाप कानी येतो तर कधी जोडीने बघितलेली स्वप्न दिसतात. कधी वाटाघाटी जुळतात तर कधी फिसकटतात. कधी कॉलेजचा गृप येतो आणि दंगा मस्ती करत कुणाचा तरी वाढदिवस साजरा करतात. केकच्या आणि वडापावच्या वासाने मीच तृप्त होतो.
लेकीसुनांचे कौतुकही मी ऐकतो आणि त्यांनी दिलेला त्रासही मला ऐकावा लागतो.
आजी नातवंडाच्या गुजगोष्टी रंगतात माझ्याच भोवती तर नातवंडांपाठी धावून दमलेले आजोबा टेकतात माझ्याच वरती.
तारुण्यात बघितलेली स्वप्न पूर्ण होऊन आता निवृत्तीची वाट बघणारा माझ्याच ओढीने येतो. सामाजिक दंगल होते तेव्हा माझ्यावर विसवणारी हीच माणसं माझी तोड मोड करतात. रंगरंगोटी तर सोडाच पण साधी दुरुस्ती सुद्धा कोणी करत नाहीत, उलट माझ्याकडेच उपहासाने बघतात. मी मानवाशी एकरूप होतो पण .....
थोडक्यात मानवी भावविश्वाचा मी अविभाज्य घटक आहे. मी त्यांच्या बरोबर हसतो आणि त्यांच्याबरोबरच रडतो....बरं कारे शाळेतल्या बाका....तुला सांगतो कालच काही म्हातारे बागेत आले होते आणि री युनियन बद्दल ठरवत होते...लवकरच येणार आहेत ते तुला भेटायला आणि पुन्हा एकदा स्वच्छंदीपणे बागडायला...नको झुरुस आता जुन्या आठवणीत!
शिशु शाळेचा मी छोटासा बाक ....हे आत्मकथन ऐकून आनंदाने मी माझ्या शिशु शाळेकडे निघालो......
लहानपण देगा देवा!
स्मिता बर्वे
बेंगलोर
22/04/2020
फोटो सौजन्य : निती कुमठेकर
Comments
Post a Comment