छोटीसी आशा !

#स्मितानुभव

#चित्रकाव्यपूर्ती3

छोटीसी आशा !

निघालो हाय जत्रंला, त्योचं विरंगुळा जीवाला
पोरं बाळं ल्योक सून, संग सारा कुटुंबकबिला !

हातावरचं प्वाट आमचं, फार पैका नाही खिशातं
गाडी घोडं नाही जमलं, समदे बसले सायकलरिक्षांत!

पिपाणी,ग्वाडशेव,उंचपाळणा सपान व्हतं डोळ्यांत
काकणं, मोत्यांची माळ, फुलयेणी आशा व्हती उरांत !

जिवाच्या करारानं जोरानं हाकत व्हतो सायकलरिक्षा
लेकराबाळांचे कोड पुरवू, हीच धरली व्हती मनी आशा!

इतक्यातच आक्रीत घडलं, आभाळ ढगांनी भरलं
इजा कडकडू लागल्या, धरणीला जणू कापरं भरलं !

आभाळान ठाण सोडलं, कोसळू लागल्या मोप धारा
पोरासोरानी आकांत मांडला, पायही चालेनात भराभरा!

देवी माय कोपली,भ्या वाटू लागले, करू तरी काय
हातावरचं प्वाट आमचं, कुठली जत्रा अन कसचं काय !

साधसुधं झोपडं आमचं, पाण्यानं मोडलं असणारं
माय रुसली, दैवाने साथ सोडली, दाद तरी कुठं मागणारं !

जोर हाये पायात, ताकद हाये दंडात, हाये परीक्षा
भ्या ते कश्याचे, जोवर हाय माझी सायकलरिक्षा !

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण