स्वामिनी
#काव्यपूर्ती 3
#अन बाहेर चांदणे दवात होते भिजले !
सुस्वर कानी आले, नकळत मन ओढावले
कान वेध घेऊ लागले, शोधु लागली पाऊले !
आम्रतरु तळी,कोमलकांती आळवत होती
जणू स्वर्गीचे गंधर्व अवतरले अवनीवरती !
जादुई त्या स्वरांनी मोहिनी घातली मजवरी
साद हृदयातुन आली,हीच माझी सहचारिणी!
समीप गेलो, सखे ग! म्हणुनी साद घातली
अवचित रवाने स्वामीनी माझी बावचळली !
कोण कुठला तू, ठावे मज नाही काही
असे अचानक सखे म्हणणे शोभत नाही !
सांगितले कुलशील, ओळख करून दिली
थोर म्हणतील तेच योग्य, इतकेच ती वदली!
दिवसामागून दिवस गेले रात्री मागून रात्री
सखी आता येणार नाही, झाली ही खात्री !
आठवाने मी बेचैन काहीच गोड लागेना
पौर्णिमेचा चंद्र चांदण्या तरीही भूल पडेना!
पहाट समयी तेच सुस्वर आले कानी
समोर सस्मित माझी हृदय स्वामीनी !
रुकाराने सखीच्या अश्रू गाली ओघळले
अन बाहेर चांदणे दवात होते भिजले !
स्मिता बर्वे
बेंगलोर
01/04/2020
Comments
Post a Comment