हे बंध रेशमाचे !


महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू " स न वि वि " मासिक प्रकाशित करते. गणेशोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने कथापूर्ती स्पर्धा घेण्यात आली. मी ह्या ओळींवर आधारित कथा लिहिली....

    हे बंध रेशमाचे!

पुन्हा एकदा नजर भिरभिरली. सगळी जय्यत तयारी झाली होती. जीवापलीकडील जपलेल्या नात्यांचा, अनुभवांचा कस पाहाणारा हा प्रसंग... वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी ह्रदयाची धडधड वाढू लागली..........

कथा:

हे बंध रेशमाचे !

नऊ वाजत आले होते, अधीर मनाने निशा विवेकची वाट पहात होती. डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते. आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे की चूक हेच तिला अजून समजत नव्हते.  ती आणि विवेक मिळून माईंशी आज बोलणार होते. आश्रमाकडे येणारी वाट ती आज नव्याने न्याहाळत होती.

निशाला आठवतंय तेव्हापासून ती आश्रमातच आहे. सनाथ आणि अनाथ ह्यांतील फरकच तिला माहीत नाही. इथेच शिक्षण झाले आणि  ती माईंच्या हाताखाली आश्रमाचा कारभार पाहू लागली. माईंची उत्तराधिकारी म्हणूनच तिच्याकडे सगळे बघत होते. आश्रमात राहून तिच्यात एक प्रकारचा कोरडेपणा आला होता. प्रेम,ममता,आपलेपणा ह्या सगळ्या भावना बोथट झाल्या होत्या. जे काही प्रेम वाटे ते माईंबद्दलच, त्यात सुद्धा प्रेमापेक्षा आदरच जास्त होता. 

 एक दिवस ती ऑफिसमध्ये असताना एक मोठी गाडी आश्रमासमोर येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन रुबाबदार माणूस उतरला. हे ही निशाला नवीन नव्हते. आठवड्यात एकदा तरी कोणीतरी चौकशीसाठी यायचेच. त्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड पुढे केले. त्याच्यावर एक नजर टाकून निशाने आश्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली. विचार करून सांगतो म्हणून तो गृहस्थ निघून गेला. आज पहिल्यांदाच निशाला कोणाबद्दल तरी आपलेपणा वाटला होता. हा माणूस तिला इतरांपेक्षा वेगळा वाटला. त्याच्या बोलण्यातून त्याची अगतिकता जाणवत होती. तिची नजर पुन्हा पुन्हा व्हिजिटिंग कार्डकडे जात होती. विवेक हे नाव तिच्या मनावर कोरले गेले. पुन्हा आला तर बघू असे म्हणून तिने सगळे विचार बाजूला केले आणि कामाला लागली.

दोन-चार दिवसांनी पुन्हा विवेक आला. पुन्हा  चौकशी करू लागला आणि…... परत चौथ्यांदा त्याला चौकाशीसाठी आलेला बघून निशाला राग अनावर झाला, ती फट्कन म्हणाली, "इतक्या शंका आहेत आणि इतकी काळजी आहे तर मग घरीच ठेवा ना! आश्रमाची चौकशी कशाला करता आहात? बायको सासूचे करायला तयार नाही वाटते?"

"तुम्हाला काय समजणार आईची माया! तिच्यापासून तुटण्याच्या यातना! ज्याचं जळत ना त्यालाच कळतं!" दुःखी स्वरात विवेक म्हणाला. 

त्याच्या शब्दांनी निशाच्या डोळ्यांत पाणी आले, भरल्या आवाजात ती म्हणाली, " बरोबरच आहे तुमचे, अनाथ मुलीला कशी कळणार आईची माया!" 

विवेकने चमकून निशाकडे पाहिले. तिचा दुःखी चेहरा त्याला खूप काही सांगून गेला. पुढे काही न बोलताच तो निघून गेला. गाडी थांबवून त्याने आश्रमात फोन लावला आणि निशाला सॉरी म्हणाला. तिचा मोबाईल नंबर मागितला. निशाने सुद्धा सहज दिला.  

 झालेल्या चुकीची टोचणी दोघांनाही लागली होती.

विवेक... खरं तर नावाप्रमाणेच शांत आणि संयमी होता. असे शब्द आपल्या तोंडून कसे गेले ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. 

आईवर त्याचे नितांत प्रेम होते. वडिलांच्या पश्चात तिने त्याला उत्तम रीतीने वाढविले होते. वीणाच्या येण्याने एक सुंदर चित्र पूर्ण झाले होते. घर आणि कंपनीत तिची उत्तम साथ होती. 

एका अपघाताने त्याचे सारे विश्व उध्वस्त करून टाकले होते. पत्नी वीणा आणि दोन्ही गोंडस मुले जागच्या जागी गेली होती आणि हे प्रत्यक्ष बघणाऱ्या आईला मानसिक धक्का बसला होता. तिचा प्रेमळ चेहरा निर्विकार झाला होता आणि मन शुष्क. विवेकला स्वतःला सावरून आई आणि कंपनी दोन्हीकडे लक्ष देताना दमछाक होत होती. 

आईचा आजार दिवसेंदिवस वाढत होता....काय आणि कसे करावे असे पर्याय शोधत असतानाच तो वृद्धाश्रमात गेला होता. 

दोन तीन दिवस खूप विचार करून विवेकने निशाला फोन केला. 

"निशाताई माझी खूप मोठी चूक झाली. नकळत दुखावले मी. परत एकदा माफी मागतो."

" साहेब माझे ही चुकलेच की, मी ही नको होते असे बोलायला. माफ करा. "

"निशाताई एक विनंती……. माझ्या घरी याल का? प्रत्यक्ष भेटून तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे."

" माईंना विचारून सांगते."  निशाने फोन ठेवून दिला.

वेळ ठरवून निशा विवेकच्या घरी गेली. त्याच्या आईला पाहून आपल्या आयुष्यातील कमी तिला प्रकर्षाने जाणवली. घर पाहून झाल्यावर कॉफी घेत असताना विवेकने निशासमोर एक प्रस्ताव ठेवला. तिच्या कानांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. लगेच निर्णय देणे शक्यच नव्हते, विचार करून सांगते असे म्हणून ती परत आश्रमात आली. 

दोन तीन दिवस विचार करून तिने विवेकला सांगितले की तुम्ही प्रत्यक्ष येऊन माईंशी बोला. त्यांचा होकार असेल तर माझा ही होकार असेल....कारच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. 

प्रसन्न चेहऱ्याने विवेक समोर उभा होता.

दोघेही माईंकडे गेले.

निशाने ओळख करून दिली. 

माई म्हणाल्या, " तुमची कंपनी आणि तुम्ही ह्या बद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष ओळख झाली. आज मला भेटण्याचे प्रयोजन?"

विवेकने सगळी परिस्थिती माईंना सांगितली आणि हात जोडून विनंती केली, "तुम्ही परवानगी दिलीत तर निशाला माझी धाकटी बहीण म्हणून घरी नेण्याची इच्छा आहे. मी सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करीन. राखी पौर्णिमा आमच्या घरी राखी बांधून साजरी व्हावी अशी इच्छा आहे." 

माईंना काय बोलावे ते कळेना. निशा लहान असताना तिला कुणीतरी दत्तक घ्यावे, तिला घर मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते आणि आज अचानक तिच्या नशिबाचे दरवाजे उघडले होते. 

पुन्हा एकदा नजर भिरभिरली. सगळी जय्यत तयारी झाली होती. जीवापलीकडील जपलेल्या नात्यांचा, अनुभवांचा कस पाहाणारा हा प्रसंग... वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी ह्रदयाची धडधड वाढू लागली..........

निशाकडून राखी बांधून घायला विवेक उत्सुक होता. फक्त आता आईने तिला आपले मानायला हवे होते. 

निशाने घरांत पाऊल टाकले आणि आई समोर आली. "आई " म्हणत  निशाने मिठी मारली आणि आईचा चेहरा पुन्हा वात्सल्यमय झाला.

हे अनोखे रेशमी बंध पाहून माई कृतकृत्य झाल्या.

स्मिता बर्वे.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण