#स्मितानुभव 104 माझे छोटे शिक्षक

गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन.... आपल्या अगणित गुरुजनांची आठवण झाली नाही आणि कृतज्ञाता वाटली नाही असे होतंच नाही. किंबहुना रोजच वेळोवेळी हे गुरू आपल्याला आठवत असतात आणि मार्गदर्शनही करत असतात.

आज शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या सगळ्यात छोट्या दोन शिक्षकांना वंदन करते.... माझ्या लाडक्या नाती ....कुहू ( वय 6 वर्षे ) आणि आभा ( 15 महिने ).

जुळवून घेणे म्हणजे काय? हे शिकावे ते लहान मुलांकडूनच.

कुहू सव्वा वर्षाची असताना आम्ही घर बदलले. नवीन घराशी सगळ्यात लवकर सूर जुळले ते कुहूचे! घर मोठे होते पण जुने होते. बरोबर मागोवा घेऊन एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायची. एकीकडे थोडे उंच होते, मी धडपडले पण ही पठ्ठी  भिंतीचा आधार घेऊन बरोबर यायची.

परप्रांतात रहात असल्याने भाषेचा खूप मोठा प्रश्न असतो. घरी आम्ही सगळे मराठीतच बोलत असल्याने कुहूला फक्त मराठीच समजायचे. दुसऱ्या भाषेत कोणी बोलायला लागले की ती आधी जा जा असे म्हणायची आणि थोड्यावेळाने रडायला लागायची. जरा सोशल होऊ दे म्हणून नाईलाजाने दोन वर्षांची असतानाच  शिशुशाळेत घातले अर्थात इंग्रजी माध्यमाच्या! हिला अजून धड मराठीही येत नव्हते आणि शाळेत जुळवून घेऊन भरपूर काय काय शिकली. तिला आणि तिच्या टिचरना मनापासून सलाम! आज ती सहा वर्षाची आहे. सध्या तिची तिसरी शाळा आणि दुसरे डे केअर आहे. भाषा, जागेतील बदल, शाळेतील बदल, वेगवेगळे शिक्षक, मित्र मैत्रिणी  सगळ्यांशी मस्त जुळवून घेतले आहे.

कुहू तीन वर्षांची असताना मी तिला घेऊन सहा महिने लंडनला राहिले होते. सगळे जगच वेगळे होते. तिकडे मी, स्नेहा आणि कुहू तिघीच जणी होतो. राहण्याच्या जागेपासून ते वातावरणापर्यंत सगळ्याच गोष्टी वेगळ्या, बरं हे सगळे समजण्याचे तिचे वय नव्हते. घर ही छोटे होते. खेळायला जागा नव्हती. बागेच्या बाजूला घर घेतले होते पण हवामान अतिशय अनिश्चित....आठ आठ दिवस बाहेरही पडायला व्हायचे नाही. तिथेही मजेत राहिली. तिथेच एका तमिळीयन कुटुंबाशी ओळख झाली. त्यांची मुलगी कुहू एव्हढीच होती. ती तामिळ मध्ये आणि ही मराठीत बोलायच्या आणि तासन्तास खेळायच्या.

चिमुकली आभा....चार महिने कॅनडाला आजीकडे गेली होती. तिकडे मजेत राहिलीच आणि इकडे परत आल्यावरही लगेच इकडे रुळली. जशी काही ती कुठे गेलीच नव्हती.

आभा सात महिन्यांची असताना उभी राहायला शिकली. दोन दिवस सतत प्रयत्न सुरू होता. दिवसभर झोपली नाही. सारखी उठ बस सुरु होती.दीड दोन शे वेळा तरी उठाबशा काढल्या असतील. मी झोपवून पाय चेपून द्यायचा प्रयत्न केला की पटकन उठून प्रयत्न सुरू! सातत्य आणि त्यामुळे मिळणारे यश म्हणजे काय हे तिच्या कृतीतून शिकले.

माझी काही चूक झाली किंवा चुकून काही लागले तर मी सॉरी म्हणते...." It's OK अदा " ( अदा हे कुहूने ठेवलेले माझे पेट नेम आहे.) असे म्हणून गळ्यात पडते. तिची काही चूक झाली तर चटकन सॉरी म्हणते आणि गोड हसते.....आणि आपण मोठी माणसं लवकर माफी मागत नाही आणि माफ ही करत नाही. निरागसता वाढत्या वयाबरोबर संपून जाते हेच खरे!

असाच एक वयानुरूप कमी कमी होत जाणार गुण म्हणजे व्यवस्थित पणा ! पिटुकली आभा काढलेले बूट जागेवर नेऊन ठेवते आणि आपण मोठी माणसे शु रॅक सोडून चप्पल ठेवतो.

अश्या खूप गोष्टी मी नव्याने शिकत आहे माझ्या दोन पिटुकल्या शिक्षकांकडून!

हे वाचून माझी दोघे लगेच ऑब्जेकॅशन घेतील ....आई ! आम्ही पण असेच ऍडजस्ट करत होतो. दुधावरची साय म्हणून नातींचे तेव्हढे कौतुक !

तर मुलांनो सॉरी ....एक तर इतक्या शांतपणे मी तुमचे निरीक्षण करू शकले नाही आणि दुसरे म्हणजे तेव्हा मी लिहीत नव्हते आणि पोस्ट ही  करत नव्हते.

तुम्ही ऍडजस्टमेंट केली म्हणून तुमच्या मुलांच्या बाललीला बघण्याचे भाग्य मला मिळाले.

तर.... शिक्षक दिन म्हणून आज दोन नाहीतर चार शिक्षकांना वंदन!😊😊

#smitanubhav 104
Smita Barve
Bangalore.
05/09/2019

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण