#स्मितानुभव 103 वडापाव
आज जागतिक वडा पाव दिन आहे म्हणे!😋
दिवसभर फेसबुक आणि व्हाट्सअप्पचे फोटो पाहून वडा आणि पावची जोडी व्हायच्या आधीच्या दिवसांत मन पोहचले.
भेळे प्रमाणेच बटाटावडा माझा जीव की प्राण!
आमच्या लहानपणी आई घरीच वडे करायची. आजीला तळणीचा त्रास व्हायचा त्यामुळे वर्षात एक दोनदाच बटाटेवडे केले जायचे. कुणी पाहुणे येणार असेल तर साजूक तुपातील शिरा आणि बटाटे वडे असा मेनू हमखास असायचा. कमी वेळा व्हायचे त्यामुळे अप्रूप वाटायचे. तेव्हा बाहेर खायची पद्धत नव्हती आणि इतक्या सहज मिळतही नसत. सारस बागेत गेलो तरी घरून खाऊ घेऊनच जायचो. तेव्हा सारस बागेत एक नऊवारी साडी नसलेल्या आजी बटाटेवडे विकायच्या. वडे विकून त्यांनी घर घेतले असे मोठी माणसं बोलायची. म्हणजे नक्की काय ते कळायचे ते वय नव्हते पण बटाटेवड्यामुळे त्यांचे घर झाले हे समजल्यामुळे वड्या विषयीचे प्रेम वाढले.
दिवाळीत सगळे एकत्र जमले की ताजा पदार्थ म्हणून बटाटे वड्याचीच वर्णी लागायची. पूर्वी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी reception असायचे. त्यातही बटाटेवड्याचा नंबर अग्रस्थानी असायचा. पुढे reception ची पद्धत बंद झाली आणि बटाटेवडा मिनी होऊन जेवणाच्या पंक्तीत जाऊन बसला. आकार लहान झाला तरी महत्त्व जराही कमी झाले नाही.
हॉटेलिंग तेव्हा जास्त नव्हतेच पण मावशी सुट्टीत आली की स्वीट होम समोरील "सुजाता" हॉटेलमध्ये नक्की जायचो. तिथे दिसायला सुंदर आणि चविष्ट बटाटेवडा मिळायचा. कालांतराने ते हॉटेल बंद झाले, आज ही कुमठेकर रस्त्याने जाताना आठवण येते.
अकरावीत असताना Law of Diminishing Marginal Utility शिकविताना म्हणून मॅडमनी बटाटे वड्याचे उदाहरण दिले होते. वडा उदाहरणार्थ घेतला म्हणून फार भारी वाटले पण ( वडा अत्यंत प्रिय असल्याने) law पटला नाही.
स प महाविद्यालयात कॅन्टीन नव्हते. लेडीज
रूमच्या बाहेर झाडाखाली एक काका ढोकळा आणि बटाटे वडा विकायला घेऊन यायचे. तेव्हा पॉकेटमनी मिळायला लागला असल्याने कधी कधी मी तो वडा घ्यायचे. भजी एव्हढा छोटा वडा आणि 10 पैशाला एक. खूप टेस्टी असायचा. आता हसू येते. त्याने काय पोट भरत असेल कोण जाणे.
कॉलेज संपता संपता नोकरी मिळाली आणि ती सुद्धा लोणावळ्याला. आता हवे तेव्हढे वडे कधीही खाता येणार ह्या विचाराने मला खूप आनंद झाला.
पण तसे काही झाले नाही. दोन तीन दिवस विकत घेऊन खावा असे वाटले पण एकटीने कसा खायचा असा प्रश्न पडला आणि मग रोज तेच तेच बघून खावासाच नाही वाटला.
एव्हाना पाव आणि वड्याची दोस्ती झाली होती आणि जागोजागी वडापावच्या पाट्या आणि गाड्या दिसू लागल्या. वडापाव मला कधी विषेश आवडला नाही. फक्त बटाटे वडा मला खूप आवडतो.
विठ्ठल कामत, खंडाळा घाटातील कामत, पनवेल चे राहुल हॉटेल इथला वडा खूप खास असतो. प्रत्येक ठिकाणचे काही ना काही वैशिष्ट्य! वड्या बरोबर दिली जाणारी चटणी सुद्धा वेगवेगळी आणि चविष्ट!
मी बरेच दिवस वडा सांबार खात नव्हते कारण मला वाटायचे बटाटे वड्यावर सांबर घालून देतात आणि ही कल्पनाच मला कशी तरी वाटायची.
बेंगलोर आल्यापासून वडापावचा विरह सुरू झाला. बटाटेवडा इकडे करतच नाहीत. घरीच करावा लागतो. इकडे पाव गोडसर मिळतो. त्यामुळे वडापावची लज्जत कमी होते. अलीकडेच गोली वडापाव इकडे मिळायला लागला आहे. दुधाची तहान ताकावर.
आज खरं तर इडली सांबरचा बेत होता.
चिरंजीवांनी ऑफिसमधून फोन केला की येतोच आहे वडापाव ऑर्डर करून ठेव. मी म्हटले,"अरे इडली करणार आहे."
तर म्हणाला की आज जागतिक वडापाव दिन आहे आणि तू इडली काय करतेस?
वारसा चालवतोय आणि दुसरं काय?
तळटीप : दक्षिणेत स्थायिक झाल्यापासून वडा सांबर पण आवडू लागले आहे.😂😂
#smitanubhav 103
Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment