#स्मितानुभव 102 जया जाधव

बदली झाली की पोटांत एक प्रकारचा गोळा यायचा. नवीन जागा, नवीन सहकारी आणि हो नवीन ग्राहक. जमलेली घडी सोडून नवीन ठिकाणी पुन्हा बस्तान बसवायचे ! आतापर्यंत पुण्यातील पुण्यातच बदली झाली असल्याने जुळवून घेणे फार अवघड वाटले नव्हते पण आता मुंबईला बदली झाली होती. अगदी मनापासून सांगायचे तर पक्के पुणेरी असलेल्याना मुंबईची भीतीच वाटायची आणि मला तर तिथे जाऊन काम करायचे होते. मुलांचा विचार करून मी पनवेल आणि अहो नी फोर्ट शाखा निवडली होती.

दबकतच शाखेत पाय ठेवला. आमची दाक्षिणात्य बँक असल्याने बँकेत मराठी सहकारी कमीच. पण पनवेल शाखा त्याला अपवाद होती बहुतेक सगळे मराठीच होते. हुश्य झाले. ओळख झाली आणि कामाला सुरुवात सुद्धा. दहा मिनिटांनी कॅशियर आणि ग्राहक ह्यांच्या भांडणाचा आवाज आला. जरा टरकलीच. पहिल्याच दिवशी दणका. जेवताना कॅशियर ने सांगितले की, " स्मिता तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते की तू त्या जयाशी जरा जपूनच वाग. फार भांडकुदळ आहे. अगदी डोक्यावर चढली आहे. फार शहाणी समजते स्वतःला."

खरं तर दुसऱ्याचे ऐकून माझं मत मी कधीच ठरवत नाही. पण सगळे अगदी डोळ्यासमोर घडल्याने मी सहकारी मैत्रिणीचे ऐकायचे ठरविले. जया रोज बँकेत यायची. तिच्या कंपनीचे, तिचे स्वतःचे आणि कंपनीच्या  सगळ्या स्टाफची खाती आमच्या बँकेत होती. हसतमुख असायची. मी नेहमी तिचे निरीक्षण करीत असे. एक विशिष्ट व्यक्ती सोडली तर बाकी कुणालाही जयाबद्दल काहीच तक्रार नव्हती. तरी सुद्धा तिच्याशी वागताना एक प्रकारचा अलिप्तपणा जाणवत होता.

काही कारणाने अचानक कॅशियर मैत्रिणींची बदली झाली. हळूहळू बँकेतील वातावरण पण बदलू लागले. माझी आणि जयाची स्मितहास्याची
देवाण घेवाण होऊ लागली. थोड्याच दिवसात चार दोन  वाक्यापर्यंत मजल गेली.
एके दिवशी जया मला म्हणाली," तुम्ही माझ्या मावस बहिणी सारख्या दिसता, तुम्हाला बघितले की तिची आठवण येते." मी हसून साजरे केले.
मी रुजू होऊन सहा महिने होत आले होते. नवीन वातावरणांत मी ही रुळले. असंच माझ्या लक्षांत आले की जयामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आधी येत होती तशीच येत होती आणि परत कधीच कुठेच काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता आणि होईल असे ही वाटत नव्हते. लंच टाइमच्या आधी ती यायची, आमचा डबा खाऊन होईपर्यंत तिची बाकीची कामे करून घ्यायची आणि मग पैसे वगैरे घेऊन निघून जायची.
मी माझा दृष्टीकोन बदलला आणि मला जयातील सगळ्या सकारात्मक गोष्टी दिसू लागल्या.

जया जाधव.... अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. परिस्थिती कोणतीही असो पटकन जुळवून घेण्याची हातोटी. अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू.....

बघता बघता एकमेकींना अहो जाहो करणाऱ्या आम्ही अग तुग वर आलो आणि घट्ट मैत्रिणी झालो. विशीची झाली आहे आता आमची मैत्री!
1999 ते 2019.....खूप भेटत होतो असे ही नव्हते. लंच टाइम मध्ये काय बोलणे होईल तितकेच.....बंध जुळले ते कायमचे.

2004 मध्ये परत बदली झाली, पनवेल सुटले. तेव्हा आमच्या दोघींकडेही मोबाईल नव्हते. घरचा land line नंबर मात्र आठवणीने घेतला.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर आमची मैत्री जयाने जपली आहे, आपलेपणाचे खतपाणी घालून जोपासली आहे. तिच्यात एक अजब कसब आहे समोरच्याला आपलेसे करण्याचे. माझ्यातील सगळे अवगुण तिने मान्य केले आहेत. 28 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस असतो...27 तारखेपर्यंत ते माझ्या पक्के लक्षात असते आणि 28 तारखेला रात्री जयाचा फोन आला की परत माझ्या लक्षात येते. पण तिने ह्या बद्दल कधीही नाराजी दाखविली नाही. फोनची वेळ कुठलीही असो...प्रसन्न आवाजात ,"good morning" म्हणते आपोआपच मन प्रफुल्लित होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
तिची मुले माझी भाचे कंपनी झाली तर माझी मुले तिची. फारसे न भेटताही दोन्ही कुटुंबात मैत्री झाली.
माझी बदली झाली, मुंबई सुटली. जया काम करत असलेली कंपनी बंद झाली. वीस वर्षांत खूप गोष्टी बदलल्या.
कोणतीच अपेक्षा नसलेली आमची मैत्री सदाबहार राहिली. संधी मिळाली की भेटतो. फोन तर असतोच. काल Friendship Day च्या निमित्ताने ह्या अनोख्या मैत्रीबद्दल लिहावे असे वाटले.

आज इतक्या वर्षांनी सुद्धा वाया गेलेल्या पहिल्या सहा महिन्यांची सल कायम आहे.

जया तू माझ्या मैत्रखजिन्यातील अनमोल रत्न आहेस. Love you lot dear.😊

#smitanubhav 102
Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण