*सरी वर सरी*....
*सरी वर सरी*....कार्यक्रमाला येऊ न शकलेल्या मैत्रिणींसाठी खास लेख
प्रथेप्रमाणे.... हो आता प्रथेप्रमाणेच म्हणायला पाहिजे.....मराठी मैत्रिणींचा "सरी वर सरी" हा
वर्षाऋतू विशेष कार्यक्रम 30 जूनला महाराष्ट्र मंडळात दणक्यात सादर झाला. जेमतेम वीस दिवसात उत्तम तयारी करून.... महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम!
शिर्षकापासून सगळ्या गोष्टी आकर्षक आणि नाविन्यपूर्ण होत्या. मैत्रिणींचे स्वागत केले गेले गुलाबी टीआरा देऊन! शप्पथ सांगते.....मी आजपर्यंत कधी टीआरा घातला नव्हता आणि घालीन असेही वाटले नव्हते.
हॉल मधील वातावरण तर एखाद्या समारंभासरखे चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होते. सगळे स्टॉल सजून तयार होते. सगळया मैत्रिणी आपलेपणाने एकमेकींना भेटत होत्या, ओळखी करून घेत होत्या.
स्टेज संकल्पनेनुसार सजून तयार होते. प्रत्येक मैत्रीण घेतलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत होती.
बघता बघता हॉल भरला. माहेरच्या अंगणात बागडणाऱ्या चिमण्या जणू!
नियोजित वेळेला कार्यक्रम सुरू झाला तो ग्रुपची ओळख करून देऊन. ग्रुपचा उद्देश आणि त्याची व्यापकता ह्याची थोडक्यात माहिती दिली. मग गणपतीबाप्पाचे नाव घेऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. वरुण राजाची कृपा व्हावी म्हणून भागवतातील खालील श्लोक म्हटला.
ऋष्यशृंगाय मुनये विभांडकसुतायच
नमः शांताधिपतये सद्यः सद्वृष्टिहेतवे
अर्थ: ह्यावर्षी चांगला पाऊस पडू दे म्हणून मी विभांडक ऋषींचे पुत्र जे शांतीचे स्वामी आहेत त्या ऋष्यशृंग मुनींना नमस्कार करते.
हा श्लोक रोज 11 वेळा म्हटल्याने अपेक्षित पाऊस पडतो हे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
त्याच बरोबर सृष्टी संवर्धनासाठी आणि शांततेसाठी
काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी |
देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः ||
हा श्लोक म्हटला.
अर्थ: दरवर्षी चांगला पाऊस पडू दे. पृथ्वी हिरवीगार असु दे. देशांत आनंदी आनंद असू दे. सगळेजण निर्भयपणे जगू दे.
पॉप अप उडवून कार्यक्रम सुरू झाला तो खास कार्यक्रमासाठी लिहिलेल्या कवितेने!!
काल मला ढग भेटला
न बरसताच पुढे गेला
का रे बाबा असा रुसलास
का रे इतका कोपलास
झाडे लावत नाहीत
लावली तर जगवत नाहीत
पाणी जपून वापरत नाहीत
फुकट म्हणून जिरवत नाहीत
नाही रे नाही
असे आता होणार नाही
जाग आलीय मानवाला
तयार झालाय संवर्धनाला
बघता बघता ढग काळा झाला
मनसोक्त बरसून गेला
इंद्रधनुष्याची भेट दिली
धरणीमाता प्रसन्न झाली
सरी वर सरी कोसळल्या
सरी वर सरी कोसळल्या
मराठी मैत्रिणी चिंब भिजल्या
मराठी मैत्रिणी चिंब भिजल्या
आणि मग काय विविध गुण दर्शनाच्या सरी कोसळू लागल्या.
गाणी,नृत्य,समूह नृत्य,कविता,प्रश्नोत्तरे,उखाणे एक ना दोन. अहो शाळेत कशी आपण एकसाथ कविता म्हणायचो ना तशी कविता सुद्धा म्हटली.... अर्थात ....बाल कवींची....
"श्रावण मासी हर्ष मानसी"
झुंबावर तर अवघे सभागृह नाचू लागले.
बालगोपालांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
स्वादिष्ट महाराष्टीयन जेवण, सेल्फी, विविध स्टॉल भरपूर मज्जा आली. सेल्फी स्टेशन आणि त्यासाठी बनविलेले प्रॉप्स आयोजक मैत्रिणींची कल्पकता दाखविणारे होते.
असा चिंब करणारा दिवस संपूच नये असे वाटते पण........तसे होत नाही ना? .....
नेहमी असं म्हटलं जातं की बायकाच बायकांच्या शत्रू असतात किंवा एकमेकींना पाण्यात पहातात. चटकन दुसरीचे कौतुक करीत नाहीत.....पण मराठी मैत्रिणी हा गृप ह्या सगळ्याला अपवाद आहे. बंगलोरच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मुलींनी प्रत्यक्ष न भेटताही सहकार्याने, अत्यंत कमी वेळात दर्जेदार कार्यक्रम सादर केला. बऱ्याचजणी पहिल्यांदा स्टेजवर आल्या,मनमोकळ्या वागल्या.
कर्नाटकात महाराष्ट्र साकारणे सोप्पे नाही बरे!
नवीन ....पुढच्या कार्यक्रमाचे विचार करतच निरोप घेतला.
थ्री चिअर्स .....मराठी मैत्रिणी!!!👍👍👍
Comments
Post a Comment