स्मितानुभव #101 कृतज्ञता



सर्व वाचकांना सविनय नमस्कार🙏🙏

दहावी नंतर कॉमर्स घेतल्याने मराठी भाषेचा अभ्यास 12 वी नंतर संपला. लग्न होईपर्यंत पुण्यात रहात असल्याने लिहिणे संपले असले तरी वाचन चालू होते. संपर्क भाषा मराठीच असल्याने मातृभाषेचा दुरावा विशेष जाणवला नाही.

पुणे सुटले आणि त्यात मूळची दाक्षिणात्य असलेल्या सिंडिकेट बँकेत मी रुजू झाले. कानावर सतत पडणाऱ्या कन्नड, हिंदी,आणि इंग्रजीचा परिमाण माझ्या बोली भाषेवर होऊ लागला. पुण्यात आल्यावर.... माझा टोन बदलला आहे असे आवर्जून सांगत. मुबंईमध्ये असे पर्यंत मराठीशी संपर्क तुटत चालला आहे असे वाटले नाही. मुलांना शिकविताना, गाणी ऐकवितांना, नाटके दाखविताना माझी उजळणी होत होती.... आणि ऑक्टोबर 2010 मध्ये बेंगलोर ला स्थलांतरित झालो. घरी-दारी, बँकेत, बाजारात... सगळीकडून कन्नडचा वर्षाव सुरू झाला. मधून मधून इंग्रजी आणि कधी तरी हिंदी. मराठी वृत्तपत्र नाही, मासिके नाहीत. घरांत आम्ही .....इन मिन चारजण......सगळेच जवळजवळ बारा तास बाहेर...बोलणार काय आणि कुणाशी? मला तर वाटू लागले होते की न बोलण्याने (बडबड हा माझा स्थायी भाव आहे.) माझी वाचाच जाणार.......शब्द संपत्ती संपणार.

घरच्या युवा पिढीच्या सौजन्याने  स्मार्ट फोन, फेसबुक आणि व्हाट्सएपच्या संपर्कात आले .....जणू माझ्यासाठी अलिबाबाची गुहाच उघडली.

सहज म्हणून सुरू केलेल्या लेखनाचे बघता बघता एका वर्षांत 100 भाग झाले. प्रामाणिकपणे सांगायचे तर इतके मी लिहू शकेन असे मला स्वतःला कधीही वाटले नव्हते. आपण दिलेले प्रोत्साहन हे माझ्या पुढच्या लेखासाठीचे बळ होते.

हे लिहीत असताना मी विविध विषय हाताळले. अगदी ...बालक ते पालक ......म्हणजे माझ्या बालपणापासून ते आतापर्यंत. पेन,पेरू,मोदक,शिवणकाम... अश्या विषयावर मी लिहीन ह्यांची मी सुद्धा कधी कल्पना केली नव्हती.

#स्मितानुभव 25....आदरणीय पुण्यश्लोक अहिल्याबाई ....सहज लिहिला गेला.

#स्मितानुभव 50 ....पन्नासावा काही तरी विशेष लिहावं... म्हणून डॉक्टरांवर लिहिला.

#स्मितानुभव 75... आदरणीय लालबहादूर शास्त्रींवर लिहिला.

#स्मितानुभव 100 वा काहीतरी खास लिहावा असे मनांत होते आणि अंदमानची ट्रिप झाली. सेल्युलर जेल बघून तिथेच पक्के ठरविले शंभरवा स्वातंत्र्यवीरांवरच!

ह्याचं बरोबर " न लिहिलेली पत्रे " ह्या फेसबुकवर पेज वर "चक्र" ह्या नावाने 40 पत्रांची मालिका लिहिली. गोवन वार्ता ह्या वृत्तपत्रात प्रतिक्रिया आणि विविध लेख लिहिले.

बारकाईने लिखाण वाचले तर लक्षांत येईल की प्रत्येक लेखांतून काहीतरी संदेश, संस्कार, माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रिया वाचून ते वाचकांपर्यंत पोहचते आहे ही भावना खूप सुखावह आहे. आईवडिलांचे संस्कार आचरणात आणून पुढे नेल्याचे समाधान मिळते. अजून खूप विषय डोक्यात आहेत. आपणही काही विषय सुचविले तर मी लिहायचा नक्की प्रयत्न करीन.

माझा प्रत्येक लेख वाचून, आवर्जून प्रतिक्रीया देणाऱ्या माझ्या वडिलांचे, मामाचे, काकांचे कौतुकाचे शब्द माझी उमेद वाढवितो. मानसी आणि नीता माझ्या प्रसिद्धी पूर्व समीक्षक आहेत... आणि हो कधी कधी आमचे अहो सुद्धा हे काम करतात.

वाचून प्रतिक्रिया देणाऱ्या, न देणाऱ्या, भेटल्यावर आवर्जून सांगणाऱ्या सगळ्यांची मी मनापासून ऋणी आहे.
लोभ आहेच.....वृद्धिंगत व्हावा🙏🙏🙏🙏

#smitanubhav 101
Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण