स्मितानुभव#99 पुनर्भेट

तसा माझा स्वभाव आठवणीत रमणारा! काही काही आठवणी तर मनाच्या इतक्या जवळ आहेत की वाटते की हे काल परवाच घडले आहे किंवा घडत आहे.

आम्हा नवरा बायकोची पहिली शाखा लोणावळा. उलटपक्षी मी, लोणावळ्याला रुजू झाल्याने आम्ही आज एकत्र आहोत. मी तर 2013 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि यजमान लवकरच निवृत्त होणार म्हणून दोघेही भावुक झालो आणि  अहोंच्या डोक्यात लोणावळ्याला जाण्याची  कल्पना आली. मी सुचविले की 1983/84 मधील सहकार्यांना पण बोलवूया. मग धडाधड फोन केले.
सगळ्यांना खूप उत्साह आला.

आम्ही दोघे एकदिवस आधीच बेंगलोरहून लोणावळ्याला हजर झालो. मिस्टर 12 वर्षे लोणावळा शाखेत होते. 1/3 सर्व्हिस .....तीही उमेदीच्या काळात.....त्यामुळे लोणावळ्याबद्दल स्पेशल आपुलकी.
कश्या बश्या बॅगा हॉटेलमध्ये टाकल्या आणि भर उन्हात फिरायला बाहेर पडलो. लोणावळा खरं म्हणजे हिल स्टेशन....पण हवेत एक प्रकारचा कोरडेपणा होता. खूप गरम हवा होती. मनांत विचार आला की काळाच्या ओघात माणसं पण अशी झाली असतील तर....

जवळजवळ 25 वर्षांनी, निवांतपणे आम्ही आलो होतो. आमची लोणावळा शाखा नवीन जागेत स्थलांतरित झालेली माहीत होते,आणखी काय काय बदलेले आहे ते बघायचे होते.

कर्मभूमीचे दर्शन घेऊन इतर ठिकाणी जाऊ असे ठरवून जुन्या बँकेजवळ गेलो आणि आश्चर्याने थक्क झालो. सगळीकडे हॉटेल अन्नपूर्णा असे बोर्ड लागलेले होते. 1981 साली ती छोटी खानावळ होती आणि अहो लग्न होईपर्यंत तिथे रोज जेवत होते. उत्सुकतेने आत गेलो. ह्यांना प्रेमाने जेवू घालणाऱ्या अन्नपूर्णा आजी आता नव्हत्या पण त्यांनी लावलेले रोपटे आता चांगलेच बहरलेले होते. मॅनेजरला भेटून आम्ही कोण आणि का आलोय हे सांगितल्यावर तो ही एकदम भारावून गेला आणि मालकांची उणीव भासू न देता आमचे स्वागत केले. सोलकढी, बटाटे वडा, साबुदाणा वडा आणि महाराष्ट्रीयन जेवण ह्याचा समाचार घेवून बँकेत गेलो. तिथेही सगळे वाट पहात होते. त्यांच्या स्वागताने भारवूनच आत गेलो. फक्त जागा आणि स्टाफ बदललेले होते पण आपलेपणा तोच होता.

जुने खातेदार,पिग्मी एजंट,निवृत्त सहकारी सगळे अगत्याने बोलत होते, चौकशी करत होते. "आनंदाला पारावार नसणे, आनंदाला उधाण येणे" ह्या आणि अश्या अनेक वाक्प्रचारांचा अर्थ त्यादिवशी प्रत्यक्ष अनुभवला.

दुसऱ्या दिवशी पुण्याहून काही सहकारी आले, लोणावळ्याला स्थाईक झालेले असे सगळे मिळून
पंधरा सोळा जण होतो. काळाच्या खुणा दिसत होत्या पण काळानुसार उभ्या भिंती कधी कोसळल्या ते कळलेच नाही. जणू काही मधे काही काळ गेलाच नाही असे वाटले. सगळे मिळून जेवायला गेलो. काय खाल्ले त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. जोशींनी 35 वर्षांपूर्वी चे फोटो आठवणीने आणले होते. कसा वेळ गेला समजलेच नाही. लोणावळेकर आपापल्या घरी गेले आणि आम्ही बाहेरून आलेले जुन्या खुणा शोधत लोणावळा फिरू लागलो.

सगळीकडे जाणवण्या इतकी स्वछता होती. काही बिल्डिंग नवीन झाल्या होत्या. लोणावळ्याचा मूळ चेहरा तोच होता. तितक्यात नॅशनल चिक्की, फ्रेंड्स चिक्की, कूपर चिक्की ही दुकाने आली. आधुनिकता दिसत होती पण बाकी सगळे तसेच होते, अगदी पॅकिंग आणि चव सुद्धा. काय घेऊ आणि काय नको असे झाले.
भरपूर खाऊ घेतला. फ्रेंड्स चिक्की, लसूण शेव, पालक शेव, फरसाण, चॉकलेट फज....

तिथून पुढे भांगरवाडीत गेलो. भावाशी संधान बांधून काका-काकूंना सरप्राईज दिले. अचानक झालेली भेट खूप काही देऊन जाते. वहिनीच्या हातचे जेवण, भावाने खिलविलेले आईस्क्रीम, जुन्या आठवणी,गोडूल्या भाचीची बडबड..... वेळ कसा गेला ते समजलेच नाही. मोठ्या मुश्किलीने गप्पा थांबवून श्रीरामाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो.

पुनर्भेट!

बदलीची नोकरी असल्याने सहसा परत जुन्या शाखेत जाणे होत नाही. त्यामुळे जुने सहकारी भेटणे ही जवळजवळ अशक्यच गोष्ट असते. आणि आज चक्क पंधरा जण भेटलो. प्रकाश चंदीगडहून आला होता. काय कमावले ते शब्दांत सांगणे कठीण आहे.

एक मात्र नक्की पुनर्भेट व्यक्तीची असो अथवा जागेची असो वा खाद्यपदार्थांची असो मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

#smitanubhav 99
Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण