स्मितानुभव #100 स्वातंत्र्यवीर सावरकर


मनांत काही सुप्त इच्छा असतात पण त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ही नसते. कधी योग येतो कधी नाही.

"जयोस्तुते जयोस्तुते" आणि "ने मजसी ने " ऐकत मोठे झालो. दरवेळी ही गाणी ऐकताना सावरकरांबद्दलचा आदर,भक्ती वाढत गेली. त्यांचे कार्य आणि सोसलेल्या यातना..... ते ही फक्त आणि फक्त मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी.....

मनांत खूप खूप इच्छा होती की एकदातरी प्रत्यक्ष जाऊन विनम्र अभिवादन करावे आणि मनापासून आभार मानावेत.

2016 साली लंडनला गेले असताना ब्रायटनला जाण्याची जबरदस्त इच्छा होती. ब्रायटनच्या समुद्रकिनारी बसलेले असतानाच सावरकरांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला" ही काव्यरचना केली होती.......पण नाही जमले जायला.

ह्या वर्षी पुन्हा संधी मिळाली ती ही चक्क अंदमानला जाण्याची. तिथे पोहचण्याच्या आधीपासूनच मन उचंबळून येत होते. मी आधीच अहो ना सांगितले होते की बाकी काहीही बघायला मिळाले नाही तरी चालेल पण मला सेल्युलर जेलमध्ये भरपूर वेळ द्यायचा आहे. अर्थात त्यांना ही तिथे जायचेच होते. ट्रिपचे वेळापत्रक थोडे बदलल्यामुळे पुन्हा धाकधूक वाटू लागली की इतके जवळ येऊनही इच्छा अपूर्ण राहते की काय?
तेव्हढ्यात गाईडचा फोन आला की 5 वाजता सेल्युलर जेलमध्ये जायचे आहे. अतीव आनंदाने तयार झाले. तिथे गेल्यावर कळले की आत्ता फक्त light and music शो आहे. प्रत्यक्ष कोठडीत जाता येणार नाही. मन थोडे खट्टू झाले. हे ही नसे थोडके म्हणून मंदिरात ज्या भक्तिभावाने आत जाते तशीच गेले आणि शो साठी बसले. शो उत्तमच आहे. सेल्युलर जेलचा इतिहास, कसा बांधला, का बांधला, कोण कोण बंदी होते?,ब्रिटिश किती आणि कसे अत्याचार करत होते हे लाईट आणि म्युझिकच्या माध्यमातून उत्तम दाखविले आहे. वीर सावरकरांचा उल्लेख केला आणि "जयोस्तुते" च्या दोन ओळीही वाजवल्या. पण समाधान नाही वाटले. त्यांच्या त्यागापुढे ते खूपच कमी आहे असे वाटले. हुरहूर मनांत घेऊनच बाहेर पडले. पुढील चार दिवस इतर बेटांवर जायचे होते. आता कोठडीत जायला मिळणार की नाही हे प्रश्नचिन्ह मनांत घेऊन मार्गस्थ झालो.

बघता बघता चार दिवस संपले. परत कोठडीचे विचार सुरू झाले. नव्याने ओळख झालेल्या ताईंना ( ज्या कानडी होत्या आणि बेंगलोरहून आल्या होत्या) मी म्हटले,"ट्रिप तो बहुत बढिया हो गयी, बस कल एक सेल्युलर जेल अंदरसे देखने को मिले और सावरकरजी की कोठडी देखने मिले तो बस!"
ती माझ्याकडे काय वेडी आहे अश्या विचित्र भावनेने बघत म्हणाली,"क्या? जेल?......हमने तो देख ली।" (तिने फक्त संध्याकाळचा शो पाहिला होता.) मी उतावळेपणाने विचारले की, कशी आहे कोठडी? उजेड आहे का? हवा येते का?
काय मूर्ख बाई आहे असे माझ्याकडे बघत ती म्हणाली,"कोन सावरकर? कैसी कोठडी?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. काय बोलावे ते न कळल्याने,"वह हमारे लिये भगवान हैं और कोठडी मंदिर।" असे म्हणून मी बाजूला झाले. खूप वाईट वाटले इतक्या सुशिक्षित भारतीय बाईला स्वातंत्र्यवीर सावरकर माहीत नसावेत?😢😢

संध्याकाळी गाईडला बजावले, जो बंगाली होता, की काहीही झाले तरी मला जेलमध्ये आणि कोठडीत जायचेच आहे, मग इतर काही बघायचे राहिले तरी चालेल. त्यावर तो म्हणाला," ऐसें बोल रहे हो की जेलमें जाना अच्छी और गर्व की बात हैं ?" मी काही बोलायच्या आतच अहो उत्तरले, "बाकी जेल में जाना और इस जेल में जाना इसमे बहुत फरक हैं। ये हमे मंदिर जैसा हैं।" तो गाईड गप्पच बसला. पुन्हा एकदा  वाईट वाटले.....

अखेर ती सकाळ झाली. नऊ वाजताच पोहचलो. आम्हीच पहिले होतो. शो मधून बाकी माहिती कळलीच होती. पुन्हा एकदा सगळे बघत सावरकर कोठडीत पोहचलो. वाटेत कोठडीचे मार्गदर्शक बाण आहेत, त्यामुळे सहजच पोहचलो.
आधी माथा टेकून विनम्र अभिवादन केले, मनोमन आभार मानले. फेसबुक live जायचा पण प्रयत्न  केला कारण बऱ्याच जणांना सावरकरांना वंदन करायचे होते. पण रेंज नसल्याने ते जमले नाही. खूप भरून आले होते. थोडे भानावर आल्यावर आजूबाजूला लक्ष गेले. छोटी कोठडी....शेवटच्या  मजल्यावर शेवटची...... तिला फक्त एक झरोका....हवा येण्यासाठी आणि दोन लोखंडी दरवाजे.....जबरदस्त मोठी लोखंडी कडी...एका कडीत सध्याच्या दहा कड्या होतील....समोर फाशी घर....कोठडीतून इतर काही दिसतच नव्हते....दिसत होते ते फाशीघर आणि फाशी दिलेली माणसं.....इतकी भयंकर शिक्षा....आणि कोणत्या अपराधाबद्दल तर भारतभूमीवर प्रेम केले .....स्वातंत्र्य मिळावे म्हणून  चळवळ केली.
चोर दरोडेखोरांसारखे साखळदंड बांधून सश्रम कारावास..... ज्या घाण्याला(कोलू )बैल जुंपतात तिथे सावरकर ....आणि किती वर्षे....उमेदीची तब्बल दहा वर्ष.......भविष्याबद्दल काहीही निश्चिन्ती नसताना.......कोणाशी संपर्क नाही....प्रेमाचे कोणी जवळ नाही....खायला कदान्न ....खरोखर कल्पनेच्या पलीकडेच आहे हे सगळे....
हे सगळे सोसताना त्यांनी त्यांचे मनोधैर्य कधीही खचू दिले नाही. उलट "कमला" हे महाकाव्य भिंतीवर खिळ्याने कोरले.....स्वतःची प्रतिभा सदैव जागृत ठेवली.
खाली वातानुकूलित संग्रहालय आहे. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी भयंकर उष्ण आणि दमट हवेत शिक्षा भोगली आणि त्याचे फोटो, माहिती वातानुकूलित भल्या मोठ्या हॉलमध्ये .......... विरोधाभासाची कमाल वाटली.

जेलच्या वरच्या भागातून बघितले की लक्षात येते की चहुबाजूंनी फक्त आणि फक्त समुद्र आहे. मोकळे सोडले तरी पळून जाणे शक्य नाही. केवळ मानसिक खच्चीकरण करण्यासाठी इतका सोपस्कार....

आज सगळी सुखे हात जोडून समोर उभी असताना मुलांना डिप्रेशन येते. आवाक्याबाहेरच्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून आत्महत्या करतात किंवा जीवावर उठतात. सावरकरांचे चरित्र शालेय अभ्यासक्रमात विस्तृतपणे समाविष्ट करायला हवे. त्यांचे विचार आणि धैर्य लहानपणीच बिंबविले पाहिजे. त्यांच्यातील मनोधैर्य, त्यांचे विचार सहस्त्रांशानी जरी प्रत्येकात उतरले तर भारतभुचा उज्ज्वल भविष्यकाळ दूर नाही.

ह्या तेजस्वी सूर्याला विनम्र अभिवादन....त्रिवार वंदन !🙏🙏🙏

#smitanubhav 100
Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण