एकपात्री

टेलीफोनवाला अँड सन्स

☎📱

📱बाबा! अहो बाबा! उठताना? ऐका तरी आज कोण  येणार आहे आपल्याकडे! किती दिवस आपण वाट पाहतोय ना या दिवसाची!अहो लॅन्ड लाईन बाबा! अहो कोण बोलतंय म्हणून काय विचारता?अहो मी नोकिया 3310....

☎️अरे मध्येच डेड होतो ना? काळाचा महिमा बाबा! हल्ली मला कोणी कॉल करत नाही, कंटाळून डोळा लागतो मधेच....काय म्हणत होतास?

📱टच स्क्रीन चा sms आलाय....तो आज तुमच्या सगळ्या स्मार्ट पंतवडांना घेऊन येणार आहे. आपल्या चार पिढ्यांचा इतिहास आणि आपल्या आयुष्यातील गमतीजमती ऐकायच्या आहेत त्यांना! म्हणून म्हटलं तयार व्हा. आता कधीही पोहचतील मंडळी....

📱अरे अजून कशी नाही आली मंडळी? तरी मी म्हटलं होते की निघताना कॉल कर तर म्हणाला स्मार्टला सांगतो व्हाट्सएप करायला! आता माझ्याकडे कुठे आहे व्हाट्सएप!

☎️अरे नोकिया माझ्यावरून लावून बघ ना फोन, कळेल तरी कुठपर्यंत आले आहेत ते?

📱काय डायल करू? नको हो बाबा... आता नंबर पण पाठ नाहीत आणि बघून बघून डायल करायचा कंटाळा येतो.

आजोबा....पणजोबा आम्ही आलो....

या या मुलांनो! किती मोठे आणि स्मार्ट झाला आहात तुम्ही! ....आम्ही तुमचे बाप... अगदीच छोटे दिसतो तुमच्या पुढे!

🤓 आजोबा इथे wifi नाही आहे का? आणि रेंज सुद्धा नाही.
आम्ही कसे थांबणार इथे? बोअर होऊ ना?

📱अरे काही बोअर होणार नाही तुम्ही.... आम्ही आहोत ना तुमच्याशी गप्पा मारायला? तुम्हाला ऐकायच्या आहेत ना आमच्या गोष्टी?

🤓आम्हाला काही विशेष इंटरेस्ट नाही, पण टच बाबा फारच मागे लागले म्हणून आलो इतकेच!

☎️ अरे मुलांनो,माझ्याकडे wifi नाही म्हणून तर आम्ही इतके दिवस तग धरून आहोत, नाहीतर आता तुमचे आयुष्य बघा जेमतेम दोन अडीच वर्ष! 
येतेच लगेच नेक्स्ट generation!

📱बाबा लेक्चर नका देऊ! चार्जिंग संपेल त्यांचे! चला करा सुरू! आधी तुमचा इतिहास सांगा.

☎️ इतिहास नको रे! तो ते घरी गेल्यावर.... गूगल करतील. आपण गमती जमती सांगू. त्या काही मिळणार नाहीत गुगलवर

📱आणि मिळाल्या तरी त्यात जीव नसणार,आपुलकी नसणार! तुम्ही सुरू करा.

☎️ माझा जन्म स्वातंत्र्य पूर्व काळातील!अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल माझे जन्मदाते! इंग्रजांच्या कृपेने मी भारतात आलो, पण स्थिरावयला खूप वेळ लागला. पूर्वी ज्याच्या घरी मी..... तो श्रीमंत! बाकी सगळे जायचे पोस्टात!
ट्रंक कॉल बुक करून तासन्तास वाट बघत बसायला लागायचे.....कधी लागायचा...कधी नाही

🤓 पणजोबा!....... तुमचा आवाज नीट येत नाहीय....खर खर येतीय

☎️ अगदी असंच व्हायचे रे तेव्हा सुद्धा! आणि कितीतरी वेळा क्रॉस कनेक्शन ! कोण काय बोलतंय तेच कळायचे नाही. एकीकडून नवीन पाहुणा आल्याची बातमी...... तर दुसरीकडून कोणी राम म्हटल्याची बातमी!

📱पण हे किती वर्षे असे चालू होते? आणि मी कधी आलो?

☎️थांब रे... कट नको करू! पुन्हा खर खर सुरू होईल. फार..... वाट पहावी लागली रे .....तुझ्या येण्याची..... असं बघ 95/96सालची गोष्ट.
एक महाशय पुण्याहून आंध्र मधील खेड्यात बदली होऊन गेले, बायको काळजीने म्हणाली......पोहचल्या पोहचल्या फोन करा..... शेजारी! तेव्हा सुद्धा मी घराघरात पोहचलो नव्हतो...

🤓 काय सांगताय काय पणजोबा? शेजारी काय तुम्हाला उचलून घेऊन यायचे का?

☎️ नाही रे बाबा.....माझे मालक जायचे शेजाऱ्यांना बोलवायला आणि मग  शेजारीच यायचे आमच्या घरी..... नंतर निघाले ते कॉर्डलेस का काय म्हणतात ते!  पण ते खूप उशिरा......तर काय सांगत होतो आणि हे महाशय पोचले की गावात आणि बघतात तर काय गावात STD ची सोयच नाही... 70/80 किलोमीटर दूर जाऊन फोन करावा लागला.

🤓 horribal ! आम्ही recharge सुद्धा एका टच मध्ये करतो..... बसल्या बसल्या आणि तेव्हा फोन करण्यासाठी प्रवास करायचा?

☎️ अरे ह्या काळात बाहेर असणाऱ्याला कॉन्टॅक्ट करणं खूपच अवघड होते. पेजर ....अरे नोकिया तुझा मोठा भाऊ....अल्पायुषी ठरला रे!

97/98 पासून परिस्थिती झपाट्याने बदलली बघ माझं जाळ पसरू लागलं....... मी अगदी सहज सगळ्यांना उपलब्ध होऊ लागलो ठीक ठिकाणी टेलिफोन बूथ.... एसटीडी बूथ दिसू लागले. बऱ्याच दिव्यांग लोकांचा मी उदरनिर्वाहाचा मार्ग झालो.

आणि लगेचच तू आलास नोकिया 3310..... पण तू फारच खर्चिक होतास.....सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा!

📱हो बाबा! मला आठवते आहे.... आधी विकत घ्यायला.... तेव्हा दहा हजार लागायचे....शिवाय recharge चे वेगळे....

☎️ शिवाय incoming ला पण पैसे पडायचे!

📱हो ना ! तेव्हा मला खूप राग यायचा बाबा तुमचा! आलेला फोन न घेता आधी तुम्हाला शोधायचे आणि परत कॉल करायचे!
आणि मोबाईल to मोबाईल असेल तर मिस्ड कॉल  मिस्ड कॉल खेळायचे? नुसते आपलं tring tring!

☎️ हो रे बाबा तू नवीन होतास,महाग होतास, तुझी अजून लोकांना सवय नव्हती झाली, मी जुना होतो , सवयीचा होतो. तुझ्या बाबतीत झालेल्या गमतीजमती तुला आठवतात का?

📱 हो आठवतात तर! ज्यांच्याकडे मी होतो ते सारखेच खेळायचे माझ्याशी! सारखा रिंगटोन बदलायचे! मुलं रिंगटोन बदलायची आणि बाबांना त्याचा पत्ताच नसायचा! फोन वाजला की इकडे तिकडे बघायचे .....कोणाचा फोन वाजतोय म्हणून!

मुलांनो... मला साधे लॉक सुद्धा नव्हते, गर्दीतून जाताना आपोआप कॉल लागायचा....बऱ्याचदा मुंबईच्या लोकल मध्ये असे व्हायचे! मालकाला ह्याचा पत्ताच नसायचा.....बॅलन्स किंवा चार्जिंग संपले की कॉल आपोआपच बंद व्हायचा.

☎️ बरं का रे नोकिया, बऱ्याचदा तो मला लागलेला असायचा! मी बसायचो वाजत...आणि तुझ्याकडून कट होईपर्यंत मला काही.....करता यायचे नाही....

📱हो बाबा! आता ह्या स्मार्टकडे पाहिले की कळतंय की आपण किती बाळबोध होतो. तुम्हाला तरी लॉकची सोय होती. एखादा खडूस बॉस मुद्दाम लॉक घालायचा....असो तो काळही तसाच होता.....

ह्या नंतर खूप वेगाने सुधारणा होत गेल्या. माझी चुलत, मावस भावंड आली. कोणी dual sim होते, तर कोणी फ्लिप करून उघडायचे होते, कोणाकडे कॅमेरा होता...प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.....
वेगवेगळ्या सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आल्या, orange,म्हणजे आताची व्होडाफोन airtel, idea,reliance... आणि हो mtnl आणि bsnl पण आले बरं compition मध्ये...

मी बऱ्याच जणांकडे दिसू लागलो...आणि sms चा जमाना सुरू झाला!.....कितीतरी बंध ह्या sms मुळे जोडले गेले.

आणखी एक गंमत बरं का मुलांनो....माझा प्रसार व्हावा म्हणून सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या लढवायच्या....दोन नंबर घेतले तर एकमेकांना केलेले कॉल फ्री ....किंवा व्होडाफोन to व्होडाफोन कॉल फ्री....

त्यावेळीपासून लग्न ठरले की जोडीने फोन आणि सिम घेण्याची प्रथाच सुरू झाली ....मग बसायचे तासन्तास बोलत...

एव्हाना इंटरनेट चे जाळे भारतात पसरू लागले होते आणि माझा मुलगा टच आला आणि मी हळूहळू निवृत्तीच्या मार्गाला लागलो

🚪नोकिया बाबा पण तुमच्या एव्हढे सुद्धा आयुष्य मला मिळाले नाही हो! आणि तुमच्या सारखी मजबूत तब्बेत सुद्धा! कितीवेळा पडलात पण फुटला नाहीत...जोडले की पुन्हा तुमचे काम सुरू!

तरी सुद्धा मला हाताळताना होणारी धावपळ मी खूप एन्जॉय केली. किती घाबरायचे लोक मला हात लावताना....टच करू की नको....चुकून कुठे हात लागला आणि काही डिलीट झाले तर......कितीतरी वेळा बघायला म्हणून टच करायचे आणि अवेळी कॉल लागायचा...
सेल्फीचा जमाना माझ्या पासूनच सुरू झाला...

सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा इतकी वाढली की मी landline आजोबांपेक्षाही स्वस्त झालो 2G,3Gआणि 4Gचे पर्व सुरू झाले..... आता तर काय ह्या माझ्या स्मार्ट मुलांनी कॉम्प्युटरचीच जागा घेतली आहे जणू!

🤓 मग आहोतच आम्ही ग्रेट! आम्ही ज्ञान देतो, करमणूक करतो, फोटो संदेश पाठवून कनेक्टेड रहातो, दुरावलेली नाती,माणसं आमच्यामुळेच एकत्र आली. रडणारी लहान मुले आम्ही हातात येताच खिदळायला लागतात. जेवण,कॅब,बँक सगळे एका क्लिकवर
फेसबुक आणि व्हाट्सएपमुळे तर..... दुनिया मेरे मुट्टी में 
थोडक्यात आम्ही आबालवृद्धांना सर्व्हिस देतो तीही अगदी कमी पैशात....फोन हा बोलण्यासाठी असतो हेच लोक विसरून गेलेत आमच्यामुळे!
घर,बिझनेस, मुलांच्या शाळा, अभ्यास हे सगळे आमच्यामुळेच सुरळीतपणे सुरू आहे..... आहात कुठे?

☎️ हो रे बाळांनो तुम्ही आलात आणि आयुष्य अगदी सोपं झाले. बरीच कामे घरबसल्या होऊ लागली. बिल भरण्यासाठी रांग नको की आर्थिक व्यवहारासाठी उन्हातून बँकेत जायला नको. फेसबुक आणि व्हाट्सएपमुळे तर जग कवेत आल्यासारखे वाटते.

पण मुलांनो तुमच्या मिठीची सर कोणत्याच स्माईलीत नाही. तुमच्या आवाजाची सर कोणत्याच रींग टोनला नाही. अरे कित्येक आईवडील तुमचे लास्ट सिन आणि स्टेटस बघून दिवस काढतात रे!
कितीही सेल्फी पाठविलेत तरी प्रत्यक्ष भेटण्याची उर्मी कशी कमी होणार?
निदान धूळ पुसण्यासाठीतरी तुमचा स्पर्श होऊ दे ......अशी आम्ही वाट पहात असतो रे!

बाळांनो कितीही मोठ्ठे झालात,स्मार्ट झालात तरी आपली पाळंमुळं विसरू नका!

🤓 आजोबा,पणजोबा खरंच वाटत नाही की इतके कठीण दिवस होते म्हणून! आम्ही आपले आमच्यातच दंग होतो. आमच्याच मस्तीत होतो.
खरं सांगायचं तर गर्व वाटतं होता. आता तुम्हाला भेटल्यावर मायेची ऊब कळली आम्हाला!
आता वीकएंड ची फेरी नक्की!

☎️ चला आता एक सेल्फी घेऊ या .....आजच्या दिवसाची आठवण म्हणून.

🤓 पणजोबा.....तुम्ही सुद्धा!

©स्मिता बर्वे
बेंगलोर
20/03/2019

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण