स्मितानुभव #95 #तु_भेटसी_नव्याने

स.न.वि.वि. माझा आवडता फेसबुक गृप
तिथे हा उपक्रम दिला होता👇

महिला दिनानिमित्त आपण आपल्याच जवळच्या, नात्यातल्या अथवा ओळखीच्या महिलेबद्दल लिहुया का ? यासाठी कोणतेही बंधन नाहीय. आपण आपल्या आई... बायको... बहिण... मुलगी... मावशी... तुमच्या शाळेतल्या बाई... मैत्रीण... घरातील मोलकरीण यांच्या बद्दल लिहु शकता... शब्दमर्यादा नाही... आपल्याच नेहमीच्या पाहण्यातील महिलेचे नव्याने समजलेले गुण अथवा तिचा प्रवास तुम्ही शब्दबद्ध करु शकता #तु_भेटसी_नव्याने या हॅश टॅग खाली....
चला तर मग ८ मार्च पासुन तुम्ही बरील हॅश टॅग खाली आपले लेख पोस्ट करु शकता...

ॲडमीन टीम

मी लिहिलेला लेख

#तु_भेटसी_नव्याने

स न वि वि मध्ये बऱ्याच दिवसांनी उपक्रम मिळाला आणि विचार त्या दिशेने धावू लागले. वारा येईल तशी पाठ फिरविणे हा तर मनुष्याचा स्थायी भावच आहे. त्यामुळे खूप चांगली माणसं अचानक बदलतात तर कधी अशी परिस्थिती येते की न आवडणारी माणसं कायमची मनांत घर करतात.

एकत्र कुटुंबात वाढल्याने नकळत संस्कार होत गेले. चांगले आणि वाईट हे कळण्याच्या अगोदरपासूनच पाऊले चांगल्या वाटेवर पडू लागली. दुसऱ्याचा विचार आधी करणे हे आमच्या घराचे ब्रीद होते. आपल्या माणसांसाठी काहीही करताना मग तो त्याग असू दे की उपभोग असू दे मन आपोआपच आनंदी व्हायचे. आजी आजोबांनी खूप अवघड परिस्थितीत सुद्धा आपल्या भावंडांसाठी खूप केले होते आणि त्यांची भावंडे सुद्धा त्यांना योग्य तो मान आणि प्रेम देत होती, अगदी पेरेल तेच उगवेल असे. अगदी अनोळखी माणसाला सुद्धा ते आपलंसं करून घ्यायचे.
आईवडिलांनाही तेच केले. अनेक माणसं जोडली कधी प्रेमाने, तर कधी मदतीला धावून जाऊन तर कधी अडीअडचणीला खंबीर आधार देऊन. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगले आणि तेच त्यांचे स्वतःसाठी जगणे होते.

आई शांत स्वभावाची! वाद नकोत म्हणून नमतं घेणारी! गप्प बसणारी! मलाही तशीच सवय लागली. सारखं भिऊन रहायची. लोक काय म्हणतील हाच विचार प्रथम मनांत यायचा. कधी कधी खूप राग यायचा पण सोसण्याची सवय होत गेली. कधी कधी बंडखोर स्वभाव उफाळून यायचा........ पण जाऊ दे! म्हणून मी परत नमतं घ्यायची! लहान- मोठे असा विचार न करता सॉरी म्हणायची! अजूनही म्हणते!

बँकेत नोकरी करत असल्याने हजारो लोकांशी संपर्क आला. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. काऊंटरच्या आत असल्याने वागण्या बोलण्यावर खूप बंधने होती. तरीसुद्धा चांगल्या संस्करांमुळे माणसं जोडता आली. कितीही गर्दी असली तरी व्यवस्थित सांभाळून घेणारी मी साध्या स्टाफ मीटिंगमध्ये सुद्धा बोलायला घाबरायची. निरोप समारंभात तर रडूच यायचे. हीच परिस्थिती मागच्या वर्षी पर्यंत होती. तारीख सुद्धा लक्षात आहे माझ्या..... 4 मार्च 2018. सुनेचे डोहाळे जेवण होते. येणाऱ्या नातवंडांबद्दल चार ओळी लिहिल्या होत्या.....होत्या तोडक्या मोडक्या, पण भावना खऱ्या होत्या.... वाचतांना घसा कोरडा पडला, बसूनच वाचले तरी पाय थरथरत होते...

8 मार्च 2018 ला महिलांच्या एका व्हाट्सअप ग्रुपची सदस्य झाले. त्यानंतर अशी काही माणसं भेटली, काही घटना घडल्या आणि हळूहळू मीच मला नव्याने भेटले!

वाचन खूप होतेच, त्यात लेखनाची भर पडली. फेसबुकचा प्लॅटफॉर्म मिळाला. स न वि वि सारखा गृप मिळाला. माझ्यातील लेखन कौशल्य उमगले.
एका वर्षांत 100 लेख लिहिले.

"न लिहिलेली पत्र" असे एक फेसबुक पेज आहे. तिथे चक्र ह्या नावाने 40 पत्रांची मालिका लिहिली.

गेले 35 आठवडे गोव्याच्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत प्रतिक्रिया लिहिते आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला. लिहायचा उत्साह वाढला.

फेसबुकमुळे खूप ओळखी झाल्या. त्यातूनच गणपती उत्सवात स्टेजवर लेख वाचायची आणि मासिकात लिहिण्याची संधी मिळाली. भीती कमी झाली. आत्मविश्वास वाढला.
आता भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. परवा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.... 10.30 ते 4 वाजेपर्यंत अगदी सहजतेने केले. ही सुरवात आहे ह्याची मला जाणीव आहे. खूपच सुधारणा हवी आहे हे ही मला माहीत आहे. सदैव भीतीच्या छायेत वावरणाऱ्या स्मिताला नवीन निर्भीड स्मिता नव्याने भेटली आहे.

व्हाट्सएपच्या आणखी एका ग्रुपवर डॉ. अपर्णाशी ओळख झाली. तिने दासबोध निरूपण ऑडिओ पाठवायला सुरवात केली. निरूपण ऐकता ऐकता मी राममय होत आहे. झाले आहे ते त्याच्या इच्छेने....आहे ते त्याचे आहे.... होणार आहे ते त्याच्या इच्छेनुसार! सतत चिंता करणारी स्मिता आता निर्धास्त स्मिताला नेमाने भेटते आहे.

सुहास्य वदना, सकारात्मक विचार असलेल्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्वांच्या माणिकताई पटवर्धन ह्यांच्याशी ओळख झाली. बोलता बोलता त्यांनी सांगितले घराप्रमाणे आपले मनही साफ करून टाकले पाहिजे. जुने आठवून त्रास करून घेण्याऐवजी ते तिथेच विसरून चांगल्या आठवणी घेऊन पुढे जावे. नेहमी भूतकाळात रमणारी स्मिता आता लोप पावली आहे. मनांत किल्मिश निर्माण न होऊ देणारी स्मिता आता नव्याने जगते आहे.

ह्यातील कुठलीच वाट सोपी नव्हती. पण चांगल्या विचारांनी ती सहज झाली.
म्हणतात फेसबुक, व्हाट्सएप आभासी जग आहे, असेलही .....पण ह्याच जगात स्मिताला स्मिता नव्याने भेटली!

ही सगळी माझी माणसं आहेत म्हणून कोणालाही धन्यवाद नाही म्हणणार! पण विशेष आत्मीयता
स.न.वि.वि.अडमीन आणि समूह, माझे आईवडील, कुटुंबीय, मानसी बापट, भाग्यश्री भोसेकर, माणिकताई पटवर्धन, डॉ. अपर्णा आणि सर्व वाचक!
                      🙏🙏🙏🙏

स्मिता बर्वे
बेंगलोर
#smitanubhav95

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण