स्मितानुभव #94 पुलवामा हल्ला
14 फेब्रुवारी रात्रीपासून मन फार उदास आहे.
सध्या मी टेलिव्हिजन बघणे एकदम बंद केले आहे.
त्याच त्याच रटाळ मालिका आणि भयंकर आरडाओरडा करणारी न्युज चॅनेल्स! काहीच सहन होत नाही. त्यामुळे पुलवामा येथील भ्याड हल्ल्याची बातमी मला उशिरा कळली. नक्की काय झाले ते बघावे म्हणून टी व्ही लावला.
ह्या घटनेनंतरच्या प्रतिक्रिया पाहून मन विष्ण्ण झाले. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचे भांडवल करत होते. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेत होते. झालेली घटना अनपेक्षित होती. धक्का इतका मोठा होता की न पाहिलेले शहीद भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय सतत डोळ्यासमोर येत होते.
धक्क्यातून सगळे जरा सावरले आणि अफवांचे पेव फुटले. खरे खोटे व्हिडीओ, बातम्या, मदतीसाठी केलेली आवाहने, सल्ले एक ना दोन.
सगळे इतके वाहवत जातात की आपण काय करतो आहे त्याचे भानच उरत नाही.
मिसरूड सुद्धा न फुटलेली मुले आदरणीय मोदींनी किंवा सैनिकी अधिकाऱ्यांनी काय केले पाहिजे हे मीडियाच्या माध्यमातून सांगतात. तर कोणी रेल रोको करतात. वारंवार शांतता राखण्याचे आवाहन करूनही त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते.
एक मेसेज आला की ह्या बाबतीतील कोणतेही व्हिडीओ किंवा मेसेज कोणीही सोशल मीडियावर टाकू नये. आपण सगळे ह्याबद्दल काळजी घेऊ. हे वाचून होत नाही तर एक व्हिडिओ आला.
माझा मुलगा लहान असताना नेहमी एक प्रश्न विचारायचा की इतिहास का शिकायचा? घडून गेलेल्या गोष्टी वाचून आता काय फरक पडणार आहे. मी त्याला सांगत असे की ज्यामुळे चांगले घडले आहे त्याचे अनुकरण करायचे आणि ज्या चुकीमुळे नुकसान झाले आहे ती गोष्ट टाळायची. 2008 साली अतिरेकी हल्ल्यानंतरच्या बातम्या आणि त्याचे परिणाम अतिरेकी संघटनेला घर बसल्या समजले होते. समाजात खळबळ माजविणे हा त्यांचा हेतू सहज साध्य होतो. आताही तेच सुरू होते.
एका सरकारी बँकेला फ्रॉड ठरविण्यापर्यंत लोकांची मजल गेली तर कोणी वैयक्तिक खाते नंबर देऊन सैनिकांना मदत करण्याचे आवाहन केले. प्रसंग काय आणि आपण वागतोय काय? खरंच खूप वाईट वाटते. कोणाकोणाची तोंडे बंद करणार? जगात आपल्या देशाची प्रतिमा मलीन होते हे लक्षांत येत नाही का?
ह्या भ्याड हल्ल्याची जखम जरा भरू लागली आणि अतिरेकी तळावर यशस्वी हवाई हल्ल्याची बातमी आली. शूर आणि निर्भिड सैनिक बंधूंचा पराक्रम वाचून खूप अभिमान वाटला.
तितक्यातच दोन वाईट बातम्या आल्या. एक वाघ शत्रूच्या हातात सापडला तर दुसरा काळाच्या!
परत उलट सुलट चर्चेला उधाण आले. मीडिया सुसाट सुटली. दोन्ही शूरवीरांना सलाम करावा म्हणून टी व्ही समोर बसले. वाहिन्यांमध्ये जणू स्पर्धा सुरू होती. तू आधी की मी?
एका वाहिनीवर दोन मान्यवरांशी चर्चा सुरू होती. दोघेही पोटतिडकीने सांगत होते की ही वेळ जल्लोष करण्याची नाही जास्त सावध होण्याची आहे. अभिनंदनची सुटका हा फक्त आजचा विजय आहे. अजून खूप लढाई बाकी आहे. आपण आपल्या शत्रूला 70 वर्षांपासून ओळखत आहोत. सध्या आपण फक्त एक दहशतवादी अड्डा उध्वस्त केला आहे. अजून बरेच बाकी आहेत तरी सगळ्यांनी सावध रहा. आजूबाजूला लक्ष ठेवा. संशयास्पद काही आढळले तर पोलिसांना कळवा इत्यादी. दरवेळी महत्वाच्या मुद्द्याच्यावेळी एकतर ब्रेक घेत होते किंवा घटनास्थळी जाऊ या म्हणत कॅमेरा फिरवत होते.
दुसऱ्या एका वाहिनी वर शहीद निनादची अंत्ययात्रा आणि अटारीत अभिनंदनच्या सुटकेच्या आनंदाचा जल्लोष दाखवत होते. खुद्द अभिनंदन आणि त्याचे पालक अतिशय संयमाने वागत बोलत होते आणि मीडिया सगळी गुप्त ठेवायची माहिती जग जाहीर करत होती.
तर नाशिक मध्ये शहीद निनादची पत्नी स्वतः चे दुःख बाजूला ठेवून जाहीर आवाहन करत होती की सगळयांना सीमेवर जाऊन देशसेवा करणे शक्य नाही. सियाचीनमध्ये किंवा सीमेवर कोणताही सैनिक फेसबुक आणि व्हाट्सएप बघत नाही. सोशल मिडियावर काही पोस्ट करण्यापेक्षा तुम्ही देश स्वच्छ ठेवा. सावध रहा. सैनिकांचे कुटुंबिय सुरक्षित रहातील हे पहा. शांतता राखा.
आपल्या चिमुकल्या दोन वर्षांच्या लेकीला ती सलाम करायला आणि जयहिंद म्हणायला शिकवित होती. इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा तिची देशभक्ती जागृत होती आणि इतर .....
ह्या घटनेला दोन तीन दिवस उलटले, जगरहाटी सुरू झाली आणि ह्या सगळ्या वर फालतू जोक यायला सुरुवात झाली. आक्षेप घेतला तर उत्तर येते की जस्ट फॉरवर्ड केले आहे.
खरंच इतके आपण मुर्दाड झालो आहोत का?
#smitanubhav94
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment