स्मितानुभव #93 पत्र
थोडावेळ होता म्हणून ड्रॉवर आवरायला घेतला आणि आश्चर्य म्हणजे अर्ध्या तासांत झाला पण!
नाहीतर आधी काय व्हायचे फक्त सुरुवात व्हायची आणि वेळ संपला म्हणून परत सगळ्या वस्तू ड्रॉवर मध्ये कोंबल्या जायच्या. अनेक पत्र, शुभेच्छा पत्र, आमंत्रण/ निमंत्रण पत्रिका एक ना अनेक कागद पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे ठेवलेले असायचे. ते वाचताना वेळ जायचा आणि ड्रॉवर जैसे थे!
e जमाना सुरू झाला आणि पत्रांची मेल झाली, पत्र येण्याची वाट, आल्यावर वाचण्याची उत्सुकता सगळे संपले.
फारतर पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आनंद,दुःख,कौतुक,अभिनंदन,प्रेम,विरह,विरस,
क्षेम कुशल.....बातमी कुठलीही असली तरी माध्यम एकच होतं..... ते म्हणजे पत्र!
पत्र लेखन एक कला आहे.
संध्याकाळी घरी आल्यावर हमखास विचारला जाणारा प्रश्न .... काय आज कुणाचे पत्र बित्र?
पोस्टकार्ड, आंतरदेशीय की पाकीट ह्यावरून त्यातील बातमीचा अंदाज घेतला जायचा. अलिखित नियम पण होता...ज्याच्या नावे आले असेल त्यानेच उघडायचे.....त्याचे वाचून होईपर्यंत सगळे उत्सुकतेने बघत बसायचे.
हळूहळू टेलीफोनचा वापर वाढला आणि
पत्र लेखन कमी कमी होत आता शून्यावर आले.
मला स्वतःला पत्र लिहायची फारशी वेळ लहानपणी आली नाही. 1968 ते 1972 माझे वडील नेपाळमध्ये होते. त्यांच्या पत्रांची आई आणि आजी आजोबा आतुरतेने वाट पहात असत. दादा नेपाळमधील अगदी छोट्या खेड्यात रहात असल्याने पत्र खूपच दिवसांनी यायचे. कधी कधी एकदम दोन यायची. बहुदा आंतरदेशीय असायचे. त्या एका पत्रात कधी आई आणि आजीसाठी पत्र असायचे तर कधी आजोबा आणि आई साठी तर कधी आई आणि आम्हा मुलींसाठी असायचे. ज्याच्या नावे असेल तो मध्ये फाडून ज्याचे त्याला द्यायचा. इतक्या वर्षांनी सुध्दा पत्र पाहून,
😊 खूष झालेले चेहरे माझ्या लक्षात आहेत.
मध्यंतरी कागदपत्रे आवरताना मी दादांना लिहिलेले पत्र सापडले.... बालवर्गात असताना लिहिलेले! एकतर पत्र लिहिलेलेच माझ्या लक्षात नव्हते ...... हस्ताक्षर आणि मजकूर पाहून हसून हसून मुरकुंडी वळली,"मी तीन नाचात भाग घेतला आहे. येताना दोन मोजे घेऊन या. एक मला आणि एक नीताला"
मावशीच्या पत्राची आई आणि आजी आतुरतेने वाट पहात असत.
मी आवर्जून पत्र लिहावे असे सगळे जवळपासच रहात असल्याने पत्र लिहायची वेळ विशेष आली नाही. मात्र माझी धाकटी आत्या आणि आते बहीण गुजरातमध्ये रहात असल्याने समजायला लागल्यावर मी तिला आणि ती मला असे पत्र लिहायचो. मैत्रिणीपण जवळच राहणाऱ्या! पल्लवीने गावाला गेले असताना आवर्जून पाठविलेले पत्र माझ्या संग्रही आहे.
एकाच शाखेत असल्याने प्रेमपत्र लिहायची सुद्धा संधी मिळाली नाही. मात्र त्याची कसर 'अहो' आंध्रप्रदेश मध्ये असताना भरून काढली. प्रेमपत्रापेक्षा ती रिपोर्ट वजा असायची हा भाग वेगळा!😜 ती अडीच वर्षे खूप पत्र लिहिली.
सासू सासरे परगावी रहात असत, त्यांना ही मी आवर्जून पत्र लिहीत असे. सासरे सुद्धा तातडीने पत्रोत्तर पाठवित असत.
एकदा त्यांची एक गंमत झाली. पोस्टातून आंतरदेशीय आणली की ते एका रायटिंग पॅडला लावून ठेवीत असत. धाकट्या दिराचे नुकतेच लग्न ठरले होते. त्या संदर्भात मुलीकडे पत्र पाठवायचे होते. त्यांनी पत्र लिहिले, पत्ता लिहिला आणि पोस्ट केले. दोन दिवसांनी आम्हाला पत्र लिहायला घेतले तर लिहिलेले पत्र पॅडवरच होते आणि पत्ता लिहायला गेले तर तिथे काहीच लिहिलेले नव्हते.
दोन आंतरदेशीय चिकटलेली असल्याने पत्र एकावर आणि पत्ता एकावर असे झाले आणि कोरे पत्र होणाऱ्या व्याह्यांकडे गेले होते. लगोलग नवीन पत्र दीर स्वहस्ते देऊन आला.
लग्न आणि मुंजीच्या आमंत्रण पत्रिकेबरोबर जर पत्रही आलं तर त्या समारंभाचा मान खूप वाढायचा. पत्र पत्रिका दोन्ही आले आहे गेलंच पाहिजे असा संवाद सहज कानांवर यायचा.
एकूण काय समाजात मानाचे स्थान असलेले हे पत्र हळूहळू लुप्त होत आहे. आपण आता किती सहज म्हणतो.... काही पत्र नको! व्हाट्सएप कर आणि मोकळी हो! तेवढीच कागद बचत!
पत्र म्हणजे पोस्ट हे ओघानेच आले. अव्याहतपणे सेवा देणाऱ्या डाक सेवेस मनापासून सलाम!
(ह्या बाबतीत इंग्रजांचे ही आभार मानायला पाहिजेत ना?)
#smitanubhav 93
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment