स्मितानुभव #92

माफ करा. विषय थोडा नाजूक आहे. मला स्वतःलाही कधी वाटले नव्हते की ह्या विषयावर मी काही लिहीन. माझ्या आसपास, नात्यात ओळखीत असे कधी घडले नाही.

बॉयफ्रेंड-गर्ल फ्रेंड, ब्रेकअप ही भानगड मी फक्त सिनेमा, नाटक, सिरीयल ह्यांतच पाहिली आहे आणि करमणूक म्हणून विशेष त्याकडे लक्षही दिले नाही.

रविवार पहाटेच्या घटनेने मात्र मी मुळापासून हादरून गेले. भविष्यातील बे लगाम समाजाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आज चार दिवस झाले पण प्रत्यक्ष बघितलेली ही घटना डोक्यातून काही जात नाही आहे.

शनिवारी रात्री ....उद्या सुट्टी! ह्या आनंदात गजर कॅन्सल करून मस्त झोपले. साधारण पहाटे चार साडेचारच्या सुमारास जोरजोराने दार बडविल्याच्या आवाजाने जाग आली. आधी कळेचना की आपले दार वाजत आहे की दुसऱ्याचे? जरा कानोसा घेतला तर बेल सतत-सलग वाजविल्याचा आवाज आला आणि आर्जव केलेल्या आवाजात," Please open the door! For God sake Open the door!"

उठून बघितले तर समोरच्या बिल्डिंगमध्ये हे सगळे सुरू होते. आधी वाटले घरगुती भांडण आहे. मिटेल.  जाऊन झोपले पण आवाज काही थांबेनात. मलाही झोप लागेना. परत बाल्कनीत गेले. नीट पाहिले दाराबाहेर दोन मुली उभ्या होत्या. त्याच दार आणि बेल वाजवत होत्या. एकजण फोनवर बोलत होती," it's ok, if you are with another girl.... Please open the door!"

एव्हाना बिल्डिंग मधली मंडळी, रखवालदार जमले.
सेक्रेटरी : "रेसिडेंशिल सोसायटी आहे. अवेळी असा दंगा बरोबर नाही."
मुली : "आम्हाला काय सांगता? त्याला सांगा दार      उघडायला!"
सेक्रेटरी ने विचारले," Are you married? Are you resident?"

मुली एकदम बावचळल्या. त्यांच्याकडे उत्तर नव्हते. एकीने मुलाच्या आईला फोन केला आणि तिला सांगू लागली की आम्ही दोघी गर्लफ्रेंडस् तुमच्या घराबाहेर उभ्या आहोत. तिसरी आत आहे. तुम्ही इतक्या चांगल्या आहात आणि तुमचा मुलगा बघा काय करतोय. तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून दरवाजा उघडायला सांगा.

मुली सरळ ऐकत नाहीत हे बघून पोलिसांना बोलविण्याचे ठरले. हे पण त्याच्या आईला सांगण्यात आले. काहीही झालेतरी आतून दार उघडेपर्यंत आम्ही जाणार नाही असे निर्वाणीचे सांगून फोन बंद झाला.

पोलीस आले. परत तीच प्रश्न उत्तरे झाली. पोलिसांनी स्पष्ट सांगितले की आम्ही दार उघडण्याबाबत काहीही करू शकत नाही. आधी तुम्ही तक्रार नोंदवा. तुम्ही इथून गेला नाहीत तर आम्हाला अटक करून न्यावे लागेल. हतबल होऊन मुली निघून गेल्या.

ह्या प्रसंगानंतर माझ्या मनात आलेले विचार:

1. संभाषण इंग्रजीतून सुरू होते, ह्याचा अर्थ मुली शिकण्यासाठी किंवा करियर करण्यासाठी दुसरीकडून आल्या होत्या. उच्च शिक्षित होत्या.

2.मुलाच्या आईला आपल्या दिवट्याचे प्रताप माहीत असूनही ती गप्प होती. मुलींकडे आईचा फोन नंबर होता म्हणजेच त्यांचे घरगुती संबंध होते.

3. बाहेर इतके रामायण होऊनही शेवटपर्यंत तो मुलगा बाहेर आला नाही.

4. फसलेल्या मुलींना गुन्हेगारांसारखे निघून जावे लागले. विवाहित नसल्याने त्यांच्या भावनांना, रागाला काहीही किंमत नव्हती.

मला त्या मुलांपेक्षा ह्या मूर्ख मुलींचा आणि मुलाच्या आईचा राग आला. एक स्त्री असूनही
परस्त्री चा आदर करायला तिने मुलाला शिकविले नव्हतेच, शिवाय ती त्याला पाठीशी घालत होती.

आपण नेहमी गप्पा मारतो,"स्त्री पुरुष समानता"!

कसली आली आहे समानता? निसर्गाने केलेला फरक लक्षात घेऊन स्त्रियांनीच शहाणे व्हायला नको का?  असे काही झाले की उध्वस्त होते ती स्त्री! शरीराने आणि मनानेही!

मध्यन्तरी 'मुरांबा 'आणि ' साखर खाल्लेला माणूस'
असे एक सिनेमा आणि एक नाटक बघण्यात आले. दोन्ही ठिकाणी विवाहपूर्व संबंध आणि सो कॉल्ड ड्रिंक हे ठळकपणे दाखविले आहे. नाटकात शेवटी ते सगळे खोटे होते असे दाखविले आहे.
जी आपली संस्कृती नाही ते दाखविण्याचा अट्टहास का?

जग आणि जीवन खूप सुंदर आहे. वेगवेगळी क्षेत्र मुलींना खुणावत आहेत. पालकांनी सजगपणे पाल्यांवर संस्कार करायला हवेत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातील फरक त्यांच्या मनांवर बिंबविला पाहिजे. स्त्रीचा आदर करायला शिकवायला हवे.

मुलांनो बॉयफ्रेंड/ गर्लफ्रेंड च्या नादाला न लागता आधी स्वतःला घडवा. फालतू गोष्टींत वेळ, पैसा, शक्ती वाया घालवू नका. गेलेली वेळ कधीच परत येत नाही!

#smitanubhav 92
By Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण