स्मितानुभव#91
साधारण 1968/ 69 सालची गोष्ट आहे. पुण्याची चार पाच वर्षांची एक चिमुरडी आईबरोबर प्रथमच मुंबईला गेली होती. अनिमिष डोळ्यांनी ती इकडे तिकडे पहात होती. एकीकडे आईचा हात घट्ट पकडलेला आणि तोंडाने प्रश्नावली सुरू होती. इतक्यात ती ओरडली,
"आई ती बघ................बस वर बस!"
समोरुन डबल डेकर बस चालली होती. तेव्हा काही डबल डेकर मध्ये बसण्याचा योग आला नाही, किंबहुना पुढील 16 वर्ष आला नाही. लग्न करून चिंचवडला स्थायिक झाले आणि डबल डेकर जीवनाचा अविभाज्य भाग झाली.
तेव्हा दोन प्रकारच्या डबल डेकर बस पुणे चिंचवड प्रवास करायच्या. एकात ड्रायव्हर केबिन वेगळी असायची आणि मागे बस जोडलेली असायची. ती थोडी हळू जायची. मला ती विशेष आवडायची नाही. उतरेपर्यंत मनांत सतत धास्ती असायची की बसचे दोन भाग वेगळे तर होणार नाहीत ना?
दुसरी अगदी कॉम्पॅक्ट होती. काडेपेटी एकावर एक ठेवल्यासारखी! ड्रायव्हर सहज दिसायचा. तिचा वेग जास्त होता. बस स्टॉपवर आले की मी जरा अंदाज घ्यायची की कुठली बस मिळेल. काडेपेटी सारख्या बस मध्ये वरची पुढची जागा मिळाली की मला अत्यानंद व्हायचा. स्वतःच ड्रायव्हर असल्यासारखे वाटायचे. पर्स मधून पुस्तक काढायचे आणि उंचावरून बाहेर बघत बघत वाचन सुरू. माझा उतरायचा स्टॉप पण शेवटचा होता. एकदा तिकीट घेतले की no disturbance!
ह्या नादात एकदा मी तिकीट घ्यायचीच विसरले होते आणि कंडक्टरची बोलणी खाल्ली होती. माझ्या आठवणीप्रमाणे कालांतराने दोन्ही प्रकारच्या बस PMT च्या ताफ्यातून बंद करून सिंगल डेकर सुरू झाल्या. दोन बसची गर्दी एकाचवेळी नेणारी बससेवा बंद झाल्याने खूपवेळ ताटकळत थांबल्यावर डबल डेकरची फार आठवण व्हायची.
नंतर मुंबईला शिफ्ट झालो. इथेच मी पहिल्यांदा डबल डेकर पाहिली होती. बेस्ट ची डबल डेकर सेवा फक्त फोर्ट भागात असल्याने मुंबईत राहून सुद्धा डबल डेकरची सैर करायची संधी मिळाली नाही. "निलांबरी" नावानी बेस्टची स्थलदर्शनाची सोय होती.....छप्पर नसलेली डबल डेकर पण हा योगही कधी आला नाही. कधीतरी लांबून बघायला मिळायची.
2016 मध्ये लंडनला गेले असताना पुन्हा डबल डेकरची संगत सुरू झाली. डबल डेकर बस लंडनची लाईफ लाईन आहे. मनुष्यबळ कमी असल्याने येथील बस कंडक्टरविना असतात. चढताना कार्ड स्वाईप करायचे आणि आपला स्टॉप आला की बेल करायची. छोट्या नातीला वरच्या डेक वरून बाहेरची मजा दाखविताना पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला.
भारतातील पहिली डबल डेकर ट्रेन...........
"सिंहगड एक्सप्रेस "ने लोणावळा पुणे प्रवास आठ दहा महिने केला. खरं तर मला ट्रेनचा प्रवास खूप आवडतो. पण डबल डेकर बसची मजा डबल डेकर ट्रेन मध्ये नाही आली. सिंहगड एक्सप्रेस ची आसन व्यवस्था तितकीशी सोयीची नव्हती. अगदी अलीकडेच जयपूर दिल्ली डबल डेकर एक्सप्रेसने प्रवास केला. आसन व्यवस्था एकदम झकास होती. प्रवासाचा आनंद पुरेपूर घेता आला.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे लवकरच बेंगलोर मध्ये डबल डेकर बस सुरू होणार असे वाचनात आले .......बघूया पुन्हा कधी बसायला मिळते ते.....वरचा डेक आणि पुस्तक!
#smitanubhav 91
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment