स्मितानुभव #90
रविवार! सुट्टीचा दिवस! बेंगलोर मराठी मंडळ आयोजित पतंगोत्सवला निघालो होतो.
अचानक मुलगा म्हणाला," फोटो काढ. बेंगलोर ट्रॅफिक पोलीसच्या साईटवर टाकतो. किती डेंजरस आहे हे!" समोर मोठमोठे दगड घेऊन फोटोतील ट्रक चालला होता. ट्रक मागून उघडा होता. मी त्याला गाडी जरा अंतर ठेवून चालवायला सांगितली. पूर्वानुभव!
मी चिंचवड ते चिखली असा प्रवास M80ने करत असतानाची घटना परत घडल्याचा भास झाला. आताच्या टाटा मोटर्सचे तेव्हाचे नाव टेल्को होते. त्यांच्या मर्सिडीज बेंझ प्रोजेक्टचे बांधकाम जोमात सुरू होते. खड्डे खणताना निघालेले दगड उघड्या ट्रक मधून बाहेर नेले जात असत. चिखलीहून येताना कंपनीच्या गेटच्या जरा आधी रस्ता चढाचा होता. चढ चढून आल्याने M80 ला जास्त वेग नसायचा. एकेदिवशी मी चढ चढून वर आले आणि साधरण दहा फुटांवरून असाच ट्रक जात होता. अचानक ड्रायव्हरला ब्रेक लावावे लागले आणि त्या धक्क्याने मागच्या बाजूला असलेला एक मोठ्ठा दगड गडगडून खाली आला आणि माझ्या गाडीसमोर पडला. अगदी थोड्या अंतराने मी वाचले होते. अजून पाचफुट जरी मी पुढे असते किंवा आधीचा चढ नसता तर तो दगड सरळ माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावरच पडला असता. मी अगदी थोडक्यात बचावले होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की ट्रक चालकाला ह्यांची काहीही कल्पना नव्हती. तो तसाच पुढे पुढे गेला. मी स्वतःला सावरून त्याला काही सांगेपर्यंत तो खूप पुढे निघून गेला होता.
तेव्हा ना फोटो काढायची सोय होती ना ट्राफिक पोलीसची साईट होती.🤦🤦
मोठ्या संकटातून वाचले म्हणून मनोमन देवाचे आभार मानले आणि घराच्या वाटेला लागले.
ज्या चढामुळे मी वाचले होते त्यामुळे मी एकदा गोत्यात आले होते. तेव्हा चिंचवड चिखली रस्त्यावर अगदी तुरळक वाहतूक असायची. गाडी चालविणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप कमी होती. एकेदिवशी मी ऑफिसमध्ये जात असताना माझ्या मागून एक टेम्पो हॉर्न वाजवत आला. खरं तर सगळा रस्ता मोकळाच होता. मला ओव्हरटेक करून तो सहज जाऊ शकला असता, पण मस्ती! मी बाजूला झाले आणि त्याला वाट करून दिली. ह्या पठ्याने उतारावरून जाऊन उतार संपल्या संपल्या टेम्पो अचानक थांबवला. नेमकी तेव्हाच मी तो उतार पार करत होते. धडक अगदी निश्चित होती. उतारामुळे M80 जोरात होती आणि बाजूला जायला जागा नव्हती. गाडी चालवत होते म्हणून डोळे बंद केले नाहीत इतकेच. प्रसंगावधान राखून हळूहळू ब्रेक लावायला सुरुवात केली आणि धडक होण्याआधी गाडी थांबवली. मी थांबलेली पाहून ड्रायव्हरने टेम्पो सुरू केला आणि पुढे निघून गेला. नंतर कितीतरी वेळ मी थरथरत होते.
आता रस्ता आणि चिखली दोन्ही इतके सुधारले आहे की माझे हे लिखाण कपोलकल्पित वाटेल.
#smitanubhav 90
By Smita Barve
Bangalore.
PC: Apurva Jog.
Comments
Post a Comment