लघुकथा दृष्टी


पगाराचा दिवस! मंजिरीने पर्स मधून कागद काढला. हिशोब केला. आज गेल्या तीन महिन्यांपासून ठरवलेली गोष्ट मूर्त स्वरूप घेणार होती.

" सुगंधा," आनंदाने तिने ऑफिस मध्ये स्वीपर कम प्यून म्हणून काम करणाऱ्या बाईला हाक मारली. कधीही न बोलवणाऱ्या मॅडमनी हाक मारलेली ऐकून, सुगंधा लगबगीने मंजिरीच्या टेबलाकडे गेली.
" संध्याकाळी तुला माझ्याबरोबर यायचे आहे. तुझे काम आटपले की लगेच निघू आपण. घरी जायला फार उशीर नको व्हायला. सासू वाट पहात असते ना ?" इतके बोलून मंजिरीने कामाला सुरवात केली.

सगळ्याचेच आश्चर्य वाटून सुगंधा तिच्या कामाला लागली. मनांत मॅडमचेच बोलणे घोळत होते. गेले सहा महिने ती बघत होती, की मंजिरी मॅडम फार कमी बोलायच्या. बाकी सगळा स्टाफ नुसता टपलेला असायचा की कधी सुगंधा चूक करते आणि आम्ही तिला फैलावर घेतो. नवऱ्याच्या आकस्मिक निधनानंतर सुगंधाला त्याच्या जागेवर ही नोकरी मिळाली होती. अचानक कोसळलेल्या परिस्थितीने ती बावचळून गेली होती. दोन लहान मुले आणि म्हातारी सासू ह्यांची जबाबदारी आता तिच्यावरच होती. ऑफिस तसे लहान होते. पगार पण बेतातच होता. महिन्याची दोन टोके जुळविताना नाकीनऊ येत होते. ऑफिसमधील काम पण तितकेसे जमत नव्हते. फायलिंग जमत नव्हते. इंग्रजीचे ज्ञान जेमतेमच होते आणि लिहिलेले नीटसे दिसतही नव्हते. कसेबसे काम रेटत होती. कधी बोलणी खात होती, कधी हसून माफी मागत, तर कधी गपचूप भरलेले डोळे पुसत दिवस रेटत होती.
मंजिरीच्या बोलण्याचाच विचार करता करता दिवस चटकन संपला. काम संपवून ती मंजिरीच्या टेबलाकडे आली.
" मॅडम! माझे काम झाले. निघू या का? कुठे जायचे आहे?"
मंजिरी टेबल आवरत म्हणाली,"चल, निघू या. वाटेत सांगते तुला सगळे."

जोडीने बाहेर पडणाऱ्या, ह्या दोघींकडे सगळा स्टाफ आश्चर्याने बघत होता. कोणाकडेही लक्ष न देता दोघी बाहेर पडल्या.

बरोबर चालत असताना सुगंधाच्या मनातील विचार सुरूच होते. पुन्हा काही विचारायची हिंमत तिच्यात नव्हती. सामान्य रूपाच्या, अबोल स्वभावाच्या, कुणाच्यातही न मिसळणाऱ्या मंजिरीची तिला थोडी भीतीचं वाटत होती. पाच मिनिटे चालल्यानंतर सुगंधाचा हात धरून मंजिरी एका बिल्डिंग मध्ये शिरली.
तो डोळ्यांचा दवाखाना होता. तिथली चकचकीत सजावट बघून सुगंधा मंजिरीला मागे ओढू लागली.
" मॅडम, इतक्या महागड्या डॉक्टरला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत हो. मी नाही येणार आत."
मंजिरीने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती तिला सरळ आत ओढून घेऊन गेली.

मंजिरीने डॉक्टरांना सुगंधाला नीट दिसत नसल्याचे सांगितले आणि डोळे तपासण्याची विनंती केली. नाईलाजाने सुगंधा खुर्चीवर जाऊन बसली. महिना कसा काढायचा हाच विचार तिला सतावत होता. डॉक्टर मॅडमनी सांगितले डोळे चांगले आहेत, पण नंबर आहे. चष्मा लावला की झाले, चांगले दिसू लागेल. सुगंधाचे बजेट कोसळल्यातच जमा झाले होते.

मंजिरी हसतच डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली आणि चष्म्याच्या काउंटरकडे निघाली.
पाय ओढत सुगंधा तिच्या मागे.
सुगंधाच्या हातात पावती देत मंजिरी म्हणाली,"दोन दिवसांनी मिळेल चष्मा. तू येऊन घे. आता निघ लवकर. उशीर झाला आहे."

मंजिरीची आर्थिक परिस्थिती विशेष चांगली नसल्याचे सुगंधाला माहीत होते. पोरक्या मंजिरीवर लहान भावंडांचीही जबाबदारी असल्याचेही तिच्या कानांवर आले होते. विचार करत करत दोघींनीही आपापला मार्ग पकडला.

मंजिरीला खूप समाधान वाटत होते. कधी घरी जाते आणि आपल्या भावंडाना सुगंधा बद्दल सांगते असे तिला झाले होते. गेले तीन महिने सगळ्यांनी काटकसर करून सुगंधासाठी पैसे जमविले होते.
सुगंधासाठी चष्मा करायला टाकल्याचे ऐकल्यावर तिची भावंडेही खूष झाली. तिघेही आईबाबांच्या फोटो समोर हात जोडून उभे राहिले आणि मंजिरी म्हणाली,"आई बाबा! आम्ही तुमचे श्राद्ध नाही करू शकलो, पण तुम्ही दिलेला परोपकारांचा वारसा आम्ही नक्की पुढे नेऊ."

दोन दिवसांनी चष्मा घालून सुगंधा मंजिरीच्या टेबलजवळ आली. देऊ की नको असा विचार करत तिने हळूच टपोऱ्या मोगऱ्याचा गजरा हातात घेतला," मॅडम, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. माझ्याकडून ही तुम्हाला भेट." संकोचाने तिने गजरा पुढे केला. झडप घालून मंजिरीने गजरा घेतला आणि लगेच केसांत घातला.
मंजिरीला एकदम गहिवरून आले.
ती म्हणाली,"आई वडील गेल्यानंतर आज इतक्या वर्षांनी माझ्यासाठी कुणीतरी काही आणले आहे. बरं का सुगंधा! आज पासून जेवणाच्या सुट्टीत मी तुला इंग्रजी शिकविणार आहे. मला नाही आवडत तुला कोणी टाकून बोललेलं."

चष्मा नीट करत,अनिमिष नेत्रांनी बघत सुगंधा म्हणाली,"मंजिरी! किती सुंदर आहेस तू!"

आई गेल्यापासून हे शब्दही मंजिरी प्रथमच ऐकत होती!

Comments

  1. खूपच भावली ही गोष्ट .👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण