स्मितानुभव #89 वाढदिवस
प्रत्येकाचा असा एक खास दिवस असतो....तो म्हणजे त्याचा वाढदिवस. खरंतर दिवस नेहमी सारखाच असतो, पण त्या दिवशी आपण खास कुणीतरी आहोत असे सतत वाटत असते. आणखी एक गंमत म्हणजे लहान असताना वाटते ....कधी एकदा वाढदिवस येतो आणि मोठ्ठे होतो आणि मोठे झाल्यावर अरे एक वर्ष कमी झाले की !
स्पेशल वाटते हे नक्की.
मला आठवते आहे तेव्हापासून माझा वाढदिवस साजरा झालाच आहे. कालानुरूप पद्धतीत बदल होत गेला. आई औक्षण करायची. जेवायला आवडीचे पदार्थ करायची. अगदी लहान असतांना
" माझ्या वाढदिवसाला मुळ्याची भाजी कर हा " असे मी म्हटल्याचे आई सांगत असे. तेव्हा घरातल्या घरात वाढदिवस करायची पद्धत होती.
कॉलेज मध्ये गेल्यावर अगदी जवळच्या मैत्रिणी घरी यायच्या आणि पार्टीला आईच्या हातचे चविष्ट पदार्थ आणि खास माझ्या आवडीचे बेसनाचे लाडू.
माझे वडील .....दादा वेधशाळेत नोकरीला होते. वर्ष अखेरीला वाढदिवस असल्याने राहिलेली रजा ते माझ्या वाढदिवसाला घ्यायचे आणि आम्ही संध्याकाळी सारसबागेत जायचो. माझी आते बहीण सुचित्रा गुजराथ मध्ये होती. तिचे न विसरता पत्र आणि ग्रीटिंग कार्ड यायचे.
नोकरी लागली, लग्न झाले आणि पुन्हा वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत फरक झाला. आता बँकेतील वर्ष अखेरीस महत्त्व आले आणि celebration सोयीने होऊ लागले.
माझ्या 25 व्या वाढदिवसाला मिस्टरांनी घेतलेला उखाणा अजूनही लक्षात आहे,
" क्रिकेटचे मैदान गाजवितात सनी आणि विशी
स्मिता! संपली बरं आता गध्ध्देपंचविशी "
संपर्काची साधने वाढली. घरोघरी फोन आले. Celebration जरी सवडीने असले तरी फोनवरून शुभेच्छा मिळू लागल्या. एक दिवस असलेला वाढदिवस दोनदा साजरा होऊ लागला.
आई दादा, बहीण भाऊ, दीर जाऊ, नणंद भावजी,असंख्य मित्र मैत्रिणी आठवणीने फोन करायचे, आशिर्वाद आणि शुभेच्छा द्यायचे.
बँकेत ज्या त्या शाखेच्या प्रथेनुसार साजरा व्हायचा. कधी छोटी पार्टी तर कधी नुसते चॉकलेट. विभागीय कार्यालयाकडून ग्रीटिंग कार्ड यायचे. खरचं "सातवे अस्मान पर" वाटायचे.
मोबाईल आले, फोन करायला वेळ असेल तर sms केला जाऊ लागला. चुकून विसरायला झालाचं तर "Belated" शुभेच्छा मिळू लागल्या.
आता तर आणखीनच जग छोटे झाले. स्मार्ट फोन आले. दूर गेलेले जग एका क्लिक वर आले. मैत्रीचे क्षेत्र विशाल झाले. फेसबुक आणि व्हाट्सअप्प मुळे आपले तर जवळ आलेच शिवाय नवीन भर पडली. कुणी ताई, कुणी काकू, कुणी मावशी म्हणू लागले.
आज तर शुभेच्छांचा वर्षाव झालाय.
कुणी शब्दांत, कुणी व्हिडिओ तर कुणी काव्यात भावना व्यक्त केल्यात. कुणी फोन केला तर कुणी मेसेज केला. प्रेमात नुसती न्हाऊन नाहीतर आकंठ डुंबली आहे.
थोरांचे आशिर्वाद आणि छोट्यांच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असोत ही ईश्वर चरणी प्रार्थना!
सगळ्यांना मनापासून 🙏🙏🙏
#smitanubhav 89
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment