स्मितानुभव #88 Generation Gap
आपले बालपण आणि आपल्या पालकांचे बालपण ह्यांत फारसा फरक नव्हता. त्यामुळे त्यांनी जे नियम पाळले तेच आपण पाळले. मोठ्यांच्या बोलण्यात "पुढची पिढी! अंतर असणारच " असे नेहमी यायचे. म्हणजे काय ? हे तेव्हा कळायचे नाही. मग लक्षात आले की हा विचारातील फरक आहे. आपापल्या जागी दोघेही बरोबरच असतात. वयोमानानुसार मोठ्या लोकांचे बाहेर जाणे येणे कमी होते, त्यामुळे बाहेर होणाऱ्या बदलाची जाणीव त्यांना नसते आणि ते जुनी फुटपट्टी लावून नवीन कापड मोजतात. इथूनच अंतर पडायला सुरूवात होते.
बालकाची भूमिका जेव्हा पालकांत बदलली तेव्हा जाणवले की फक्त विचारातील नाही तर आचारातील फरक म्हणजे Generation Gap.
मुले मोठी आणि मिळवती झाल्यावर ह्याचा वेळोवेळी साक्षात्कार होऊ लागला.
मुलीच्या दोन्ही हातांना लागल्यामुळे हातात काही पकडता येत नव्हते, कॉफी पिताना ती सहज म्हणाली की स्ट्रॉ असती तर बरे झाले असते. मी आणि मिस्टर बाहेर गेलो होतो, येताना शहाळे घेऊन आलो आणि शहाळेवाल्यांकडून एक स्ट्रॉ जास्तीची मागून घेतली. आमची मजल इतकीच गेली.
मुलगा बाजारातून घरी आला आणि म्हणाला,
"आई स्ट्रॉ आणल्या आहेत ग! इथे ठेवतोय." मी बाहेर आले मुलाच्या हातात स्ट्रॉचे पूर्ण पॅकेट होते. सरावाने मी म्हणाले," अरे इतक्या आणायची काय आवश्यकता होती. आम्ही एक आणली आहे."
"आई, फक्त 20 रुपयाला पॅकेट आहे. 100 स्ट्रॉ आहेत आणि मुख्य म्हणजे क्वालिटी चांगली आहे." बोलणे पचवायला जरा कठीण गेले पण मनोमन पटले ही.
वाशी जरी नवी मुंबईत असले तरी तिथे मराठी लोकसंख्या कमी होती. गोष्ट जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वीची आहे. खास महाराष्ट्रीयन पदार्थ तिथे मिळत नव्हते. दादर नाहीतर ठाण्याहुन आणायला लागायचे. अशीच एकेदिवशी पेपर मधून पत्रक आले ' गोडबोले स्टोअर्सची उत्पादने आता वाशीतही'. सहज बघायला म्हणून गेले. पदार्थ छानच होते, व्यवस्थित पॅक केलेले, आकर्षक होते. किंमत पाहून मात्र धीर झाला नाही आणि काही न घेताच मी घरी गेले. मुलांनी अर्थातच विचारले काही आणले नाहीस का? मी सांगितले की किंमत फार वाटली रे! गूळ पोळी पंचवीस रुपयाला एक! नाही आणली. हीच गोष्ट मैत्रिणींना सांगताना मुलाने ऐकले आणि म्हणाला," इतकं काय महाग महाग करते आहेस? हॉटेल मधील नान माहिती आहे का कितीला असतो ते? अग पोळीत गूळ तरी आहे. त्या नुसत्या मैद्याला 40 रुपये घेतात."
मला काय बोलावे ते कळलेच नाही. मुलाचे म्हणणे तंतोतंत खरे होते. गुळाची पोळी घरी करू शकतो म्हणून ती मला महाग वाटत होती.
वाशीत मॅक डोनाल्ड रेस्टॉरंट नवीन सुरू झाले होते, तेव्हाची गोष्ट! जवळच होते. एका शनिवारी संध्याकाळी गेलो. तेव्हा शाकाहारी लोकांसाठी विशेष काही नव्हतेच. काय होते ते खाल्ले, भरमसाठ पैसे देऊन अर्धपोटी घरी आलो. घरी येऊन सगळ्यांनी गुपचूप दुधीभोपळ्याची भाजी( मुले नेहमी नाईलाजाने खातात) पोळी खाल्ली तेव्हा बरे वाटले. काही दिवसांनी जाहिरात म्हणून मॅक डोनाल्डची डिस्काउंट कुपन रेल्वे स्टेशनवर वाटली. त्याची मुदत संपत आली होती. म्हणून मुले म्हणू लागली की परत जाऊ या. पुन्हा मॅक डोनाल्ड जायची माझी अजिबात इच्छा नव्हती.
मी मुलांना म्हटले, "अरे त्यांचे खपत नाही आहे म्हणून फ्री कुपन दिली आहेत. तू चितळ्यांनी अशी कुपन दिल्याचे ऐकले आहेस का?"
दोन्हींची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घेतले तरी चितळ्यांवरील प्रेमाने माझी त्या दिवशी सुटका झाली.
थोडे मी स्वतःला बदलले आणि थोडे मुलांना समजावून सांगितले आणि बघता बघता पिढीतले अंतर मिटले गेले.
#smitanubhav 88
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment