स्मितानुभव #87 BM
किती साधी सोपी गोष्ट आहे ना? शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होतो ज्याचा आधीच खूप बोलबाला झालेला असतो. निर्मात्यांनी, वितरकांनी अगदी कलाकारांनी सुद्धा सिनेमाची जाहिरात करताना एकही माध्यम सोडलेले नसते. प्रोमोज बघून बघून उत्सुकता निर्माण झालेली असते. तिकीट काढायचे आणि जायचे बस्स !
पण नम्म बंगळुरू ( आमच्या बेंगलोर ) मध्ये असे होत नाही हो! मराठी सिनेमा सातासमुद्रापार प्रदर्शित होतो पण बेंगलोर मध्ये नाही. माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षांपूर्वी आलेला व्हेंटिलेटर हा शेवटचा मराठी सिनेमा. बंगलोरला असंख्य मॉल आणि मल्टिप्लेक्स आहेत. पण मराठी सिनेमा लागायचा तो फक्त क्यू सिनेमा असलेल्या असेंडस मॉलमध्ये. खूप दूर असूनही आम्ही आवर्जून मराठी सिनेमा बघायला जायचो. त्या मॉलचे नूतनीकरण सुरू झाले आणि मराठी सिनेमा बंगलोरमध्ये प्रदर्शित व्हायचे बंद झाले. टीव्हीवरचे प्रोमोज् पाहून समाधान करून घ्यायचे आणि टीव्ही की ऍमेझॉन की नेटफ्लिक्स...... ह्याची वाट बघत बसायचे.
आणि 1 डिसेंबरला संध्याकाळी मेसेज आला,
'बंगळुरू मराठी घेऊन येत आहे फक्त दोन शोज
8 आणि 9 डिसेंबरला आयनॉक्स गरुडा मॉल येथे
नुकताच प्रदर्शित झालेला
"आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर "
खरं सांगायचे तर एकदा वाचून विश्वासच बसला नाही. दोन तीनदा वाचून खात्री केली आणि बुकिंग साठी बघू लागले. तीन पर्सनल नंबर होते. पैसे भरून फोन करायचा होता आणि सीट सांगायच्या होत्या. सगळेच वेगळे होते. मराठी सिनेमाच्या प्रेमापुढे फारसा विचार केला नाही. पटकन पैसे भरले, फोन केला, सीट सांगितल्या आणि वाट पहात बसलो. मग लक्षात आले की आपण आत कसे जाणार? परत फोन केला. तर त्यांनी ई मेल येईल असे सांगितले. दुसरे दिवशी सकाळी फोन आला की तुम्ही पैसे भरले आहेत तर सीट नंबरची मेल आली का? हया सगळ्यांमुळे उत्सुकता खूप ताणली गेली.
हे सगळे काय आहे ते मला जाणून घ्यायचे होतें म्हणून जरा लवकरच मॉलला पोहचले. मल्टिप्लेक्सच्या बाहेर बेंगलोर मराठीची टीम हसतमुखाने उभी होती. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मराठी सिनेमाचा शो बेंगलोर मध्ये आणण्यात ही मंडळी यशस्वी झाली होती. मंडळाचा एक सदस्य आहे, आशिष भगवते... त्यांच्या ओळखीतून त्यांनी सुबोध भावेशी डायरेक्ट संपर्क साधला आणि दोन शोज देण्याविषयी बोलणी केली आणि त्यांना बेंगलोरला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण पण दिले. शोज मिळाले पण सुबोध काही येऊ शकले नाहीत, पण त्यांनी बेंगलोरकर मराठी प्रेक्षकांसाठी व्हिडिओ पाठविला. बोलताना कळले की त्यांनी हे दोन शो आयनॉक्सच्या मालकाशी थेट संपर्क साधून विकत घेतले होते. म्हणजे संपूर्ण 440 तिकिटाचे पैसे आधीच भरले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे
" बुक माय शो" मार्फत तिकीट विक्री करता आली नाही. 440 तिकीटे विकण्याचे शिवधनुष्य पेलले ते बेंगलोर मराठीच्या मुलांनी. कपिल इंगळे आणि अमित देशपांडे ह्यांचे फोन नंबर दिले होते. तेज किंवा फोन पे ने पैसे घेतले. फोन वर सीट नंबर कन्फर्म केले आणि तशी मेल केली. कुणाचे एक तिकीट तर कुणाचे गृप बुकिंग, कुणाचा शनिवारचा शो तर कुणाचा रविवारचा.... कुठे ही गडबड नाही, सीट नंबरचा गोंधळ नाही.
वर मसालेदार पॉपकॉर्नची भेट!
एकदम कड्डक काम! खूप आवडले.
सिनेमा संपल्यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी ही टीम पुन्हा उभी होती. सिनेमा तर छानच आहे. कलाकारांनी आणि दिग्दर्शकानी घेतलेली मेहनत मनाला भावली. टीमचे समाधानी चेहरे बघून सिनेमाला आल्याचे सार्थक झाले असे वाटले.
ह्या मुलांचे कौतुक करायला शब्द नाहीत. मराठी माणसाने ठरविले तर तो जगाच्या पाठीवर कुठे ही असला तरी काहीही करू शकतो ह्याचा परत एकदा प्रत्यय आला. माय मराठीचा उज्ज्वल भविष्यकाळच थिएटर मध्ये दिसत होता.
#smitanubhav 87
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment