स्मितानुभव #86 तेजस
आजच्या दिवशी........... बरोबर 22 वर्षा पूर्वी आमच्या "तेजस" चा जन्म झाला. तेव्हा आम्हाला कल्पनाच नव्हती की बघता बघता तो इतका मोठा होईल! कुठलेही नवीन पाऊल उचलताना, टाकताना जीवाची घालमेल होतेच. काय होईल, कसे होईल, आपल्याला झेपेल की नाही ...त्यातून मध्यम वर्गीय..... पुढे जाण्यास हातभार लावण्याऐवजी अडथळेच अनेक!
सगळ्यांवर मात करून माझ्या आईवडिलांनी माझ्या बहिणींच्या साथीने पुण्यातील पहिला फक्त महिलांसाठी असलेला जिम सुरू केला ....
" तेजस फिटनेस पॉईंट"
माझ्या आजोबांना खूप वाटायचे की काहीतरी आपला उद्योग असावा. कौटुंबिक जबाबदारीमुळे आणि त्यांच्या अचानक आलेल्या अपंगत्वामुळे ते त्यांच्याकडून राहून गेले.
तो काळच असा होता की आधी कुटुंब, पै पाहुणा आणि मग स्वतःच्या इच्छा,आकांक्षा,स्वप्न वगैरे.
त्यामुळे प्रयत्न करूनही नोकरीत असे पर्यंत माझे वडील काही करू शकले नाहीत. निवृत्ती नंतर मात्र त्यांच्या सुप्त इच्छेने उसळी मारली आणि काहीतरी स्वतःचे सुरू करू या ह्या कल्पनेने मूळ धरले.
जागा स्वतःची असल्याने कुठे हा प्रश्न नव्हता आणि काय ला विविध पर्याय उपलब्ध होते. वेगळे आणि नाविन्यपूर्ण करावे असा विचार सुरू असताना जिम सुरू करावे ही कल्पना पुढे आली.
माझ्या धाकट्या दोघी बहिणी खेळाडू ! दोघींनीही
B.Ed ( Phy) केलेले. आईदादांनी दूरदृष्टीने विचार केला की दोघींना उद्योग मिळेल आणि त्यांच्या ज्ञानाचा विकास होईल आणि इतरांना उपयोग सुद्धा.
मुलींनीचं चालवायचे ठरल्यावर,
" फक्त महिलांसाठी ......महिलांनी चालविलेला"
एकदा ठरल्यावर जोरदार तयारी सुरू झाली. वेगवेगळ्या मान्यता मिळविणे, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेचे कर्ज, जागेत बदल, साहित्याची खरेदी, व्यवसायिक दृष्टीने अभ्यास ....एक ना दोन.
आणि तो दिवस उजाडला 6 डिसेंबर 1996.
झोकात उद्घाटन झाले. समाजातील विविध स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीत "तेजस फिटनेस पॉईंट" सुरू झाले. बघता बघता मेंबर्सची संख्या वाढू लागली. जिम बाळसे धरू लागला.
अनेक अडचणी आल्या, अडथळे आले. पडत, धडपडत, ठेचकाळत आणि त्यातून धडे घेत आज बावीस वर्षे दिमाखात जिम चालू आहे.
माझ्या बहिणी वैयक्तिक लक्ष देत असल्याने सदस्यांसाठी जिम फक्त जिम न रहाता एक विरंगुळ्याचे, विसाव्याचे ठिकाण झाले. स्त्रियांना मनमोकळे वागायला आणि बोलायला जागा मिळाली. योगाभ्यास आणि प्राणायामामुळे छोटे मोठे आजार दूर होऊ लागले तर खूप दिवस गोड बातमीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला तो आनंद मिळू लागला.
जिममुळे भरपूर माणसे जोडली गेली.
एखादा व्यवसाय सुरू करून तो यशस्वीपणे चालू ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. स्वकष्टाने बीज रुजवून त्याचा अनेकांना विसावा देणारा वृक्ष जोपासणे हे सोपे नाही. माझे वडील प्रभाकर बेहेरे, बहीण नीता ढमढेरे आणि सायली ठोसर यांच्या कर्तृत्वाला मी दाद देते.
माझी आई सौ. शुभदा बेहेरे हिचा जिम उभारणीत सक्रिय आणि सिंहाचा वाटा होता. ती स्वतः रिंगटेनिस खेळायची. योगासनांचाही तिचा अभ्यास होता. आजचे यश हे तिच्या पुण्याईचेच फळ आहे. आमच्या दुर्दैवाने आज हे यश बघायला ती नाही. तिचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत.
पुण्याबाहेरच जास्त वास्तव्य झाल्याने प्रत्यक्ष मी ह्यात कधी भाग घेऊ शकले नाही पण माझ्या शुभेच्छा कायम बरोबर होत्या आहेत आणि राहतील. 😊
#smitanubhav 86
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment