स्मितानुभव #85 विठाबाई
काल परवाच एका वकिलांनी लिहिलेली पोस्ट वाचण्यात आली. त्यांनी लिहिले होते की घराबद्दलचे दावे कोर्टात आलेले मला अजिबात आवडत नाहीत. फार वाईट वाटते. कौटुंबिक गोष्टी.........सगळ्यांनी समोरासमोर बसून,सामोपचाराने सोडवाव्यात, त्यासाठी न्यायाधीशांची काय जरुरी आहे? अशिलांना तर काही मिळतच नाही, वकिलांची घरे मात्र चालतात.
एका वकिलाने हे लिहिलेले वाचून आश्चर्य तर वाटलेच पण डोळ्यासमोर आली ती आमची विठाबाई !
नावाप्रमाणेच सात्विक. 1968/69 पासून ती आमच्याकडे यायची. चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि खणाची चोळी. विधवा होती म्हणून कपाळावर कुंकवाच्या जागी बुक्का लावायची. ती बुक्का लावते म्हणून तिचे नाव विठाबाई आहे असे मला तेव्हा वाटायचे. आंघोळ करून प्रसन्न चेहऱ्याने यायची. आधी देवाला नमस्कार, मग माझ्या आजी आजोबांना नमस्कार. मग कामाला लागायची. आमच्याघरी धुणंभांडी करायची. आमचे करून दुसऱ्या घरी जायची. तिकडे काम जास्त असायचे. संध्याकाळी परत दुपारच्या भांड्याना. तेव्हा मात्र निवांत असायची. माझ्या आजीशी,आईशी बोलत बसायची. काल काय आणले, काय केले त्याची माहिती द्यायची. हातावरचं पोट. रोज लागणाऱ्या वस्तू विकत घ्यायची आणि स्वतःचे आणि मुलाचे पोट भरायची. वाईच पीठ घेतलं, तेल घेतलं, च्या पावडर घेतली असे बरंच काही. आम्हाला पण तिचे बोलणे ऐकून गंमत वाटायची. आजी सुद्धा न कंटाळता रोज ऐकायची.
पगारातले पैसे माझ्या आईकडे ठेवायला द्यायची. लागतील तसे मागून घ्यायची. इतकी भाबडी होती की तिने दिलेल्या नोटाच तिला परत द्याव्या लागायच्या. तिच्या चोळ्या आई शिवून द्यायची. सलग एका खणाची चोळी तिला चालायची नाही. दोन तीन खण आणून तुकडे जोडूनच शिवावी लागे. आम्ही तिला समजवायला गेलो की म्हणायची " तसली फ्याशान मी न्हाय करत."
अतिशय प्रामाणिक आणि मानी असलेली विठाबाई खरं तर सदाशिव पेठेतील मोठ्या वाड्याची मालकीण होती. सवतीने वाड्याचा ताबा घेतला आणि विठाबाईला तिच्या मुलासकट बाहेर काढले. सवतीला मुलबाळ काही नव्हतेच पण तिने विठाबाईच्या सुनेला आणि नातवाला जवळ ठेवून घेतले होते. विठाबाई मुलाबरोबर गोठ्यातील छोट्या भाड्याच्या खोलीत रहात होती. आम्ही पण खूप वेळा तिच्या घरी जात असू. तरणाताठा मुलगा आईच्या जीवावर बसून खात होता. कधी कधी विठाबाई चिडायची, जेवायला द्यायची नाही पण शेवटी आईच ती!
विठाबाईने वाड्याचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात केस केली होती. तारखेला जायचे असले की ती कामाला सुट्टी घेत असे. पैसे वाचवून वकिलाची फी देत असे. " तारीख पे तारीख" तिच्या बाबतीत अगदी खरे होते.
वयोमानाने पुढे तिला काम होईना. कामाला दुसरी बाई ठेवली, तरी आमचे ऋणानुबंध संपले नाहीत. नेहमीप्रमाणे ती सकाळी येई. होईल ते काम करी. दुपारी दोन घास जेवून सहाच्या सुमारास घरी जात असे. आमच्या घरच्या कार्यात जोखमीच्या गोष्टी आणि कार्यालयातील खोली सांभाळण्याचे काम मनापासून तिने केले. ताई! तुझ्या बाळाला मीच न्हाऊ माखू घालणार अशी प्रेमळ ताकीद तिने आम्हाला दिली होती. प्रत्यक्षात पिटुकली जुळी मुले पाहून घाबरली. मला म्हातारीला जमणार नाही म्हणाली, पण आईने तिला धीर दिला की तू बसून तेल लावून दे बाकीचे मी करीन. तेल लावताना म्हणायची,
" मोठं मोठं व्हा आनी माझं नाव काढा. "
पुढे 1990/92 मध्ये ती गेली. माझ्या माहितीप्रमाणे शेवटपर्यंत तिला वाड्याचा ताबा काही मिळाला नाही.
वकील साहेबांची पोस्ट मी काही पूर्ण वाचली नाही, त्याआधीच मी विठाबाईच्या आठवणीत हरवून गेले.
#smitanubhav 85
By Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment