स्मितानुभव #84 सर्कस


संध्याकाळी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले. मागून कर्णा लावलेली रिक्षा आली. आतील माणूस कानडीतून काहीतरी बोलत होता. असेल काहीतरी म्हणून मी लक्ष दिले नाही. रिक्षा मला ओलांडून पुढे गेली तेव्हा मला त्यावर लावलेले पत्रक दिसले आणि......

काही गोष्टी वार्षिक असतात.........जसे की सत्यनारायण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, वार्षिक परीक्षा, जत्रा ह्याच्या जोडीला असायची ती म्हणजे सर्कस !

पुण्यात दरवर्षी सणस मैदानांवर कोणती ना कोणतीतरी सर्कस यायचीच. जेमिनी,जम्बो,अपोलो,द ग्रेट रॉयल........
नाव कुठलेही असले तरी त्याची भव्यता तेव्हढीच असायची. सर्कस येण्याच्या आधीच रिक्षाला कर्णे लावून जाहिरात केली जायची.
भला मोठा तंबू,आजूबाजूला राहायचे छोटे तंबू आणि प्राण्यां-पक्ष्यांचे पिंजरे,हत्ती खाना. रस्त्यावरून जातांना उत्सुकतेने डोकावून बघताना पण खूप मज्जा यायची. तंबू बांधून झाला की फ्लड लाईट सुरू व्हायचा. तेव्हा गूगल मॅप्स नव्हते ना? लाईटमुळे कळायचे सर्कस कुठे आहे ते.
सर्कस एकदा आली की तीन चार महिने तरी असायचीच. एक दिवस ठरवून, सगळ्यांनी मिळून सर्कसला जायचे.
सर्कसचा तंबू भव्यदिव्य असायचा. तीन, सहा आणि नऊ.....दिवसाला तीन शो. सहाच्या शो ला जास्त मजा यायची. तेव्हा ड्रेस सर्कलच्या खुर्च्या कमी आणि बाल्कनीच्या रांगा जास्त असायच्या. तंबू खचाखच भरलेला असायचा. लहानपणी बहुतेक सगळ्या सर्कस बाल्कनीतूनच बघितल्या आहेत. खांब मध्ये येणार नाही अशी उंचावरची जागा पकडून बसायचे. बरोबर भावंडे, मैत्रिणी, आईवडील असे बरेच जण असायचे. मोठ्या माणसांनी भरपूर खायचे पदार्थ बरोबर आणलेले असायचे. तीन तासांचा पिकनिक जणू!
हा वारसा मुलांना,भाचरांना सर्कसला नेऊन मी पुढे चालवला. फरक इतकाच झाला बाल्कनीतून खुर्चीवर आले. बाकी सगळे तसेच राहीले.
स्थानापन्न झाल्यावर निरीक्षण सुरू व्हायचे. काय नवीन आहे? मृत्यू गोल आहे की नाही? जोकर किती असतील? प्राणी कोणते कोणते असतील?झुल्यावर नवीन काय असेल? जोकर किती असतील? ते नवीन काय मजा करतील? असे अनेक विचार आणि चर्चा चालू असे.

आणि एक एक करून बँड मधील कलाकार शिडी चढून आपापली जागा घ्यायचे आणि सर्कस स्पेशल धून सुरू व्हायची.

" दिल थाम कर बैठीए आ रहे है......"

ड्रमवर विशिष्ट बीट वाजला की मोठ्ठा पडदा उघडून कलाकार बाहेर यायचे आणि शो सुरू व्हायचा!

सर्कस म्हणजे Live performance. चुकीला माफी नाही. सगळ्या गोष्टी परफेक्टच पाहिजेत. क्षुल्लक चूक सुद्धा प्राणावर बेतू शकते. साधारण तीन चार वर्षांच्या बालकांपासून ते चाळीस पन्नास वर्षेपर्यंतचे शंभर दीडशे कलाकार असत. प्राणी पक्षी वेगळेच. सगळीकडे संपन्नता जाणवायची. त्यांचे पोषाख आणि रबरासारखे लवचिक शरीर पाहून थक्क व्हायला होत असे. आता मला हे सगळे Management Guru वाटतात. ऑटोमॅटिक मशीनला लाजवेल अशी Time Management सर्कस मध्ये आढळते. मध्ये अजिबात वेळ न घालविता नियोजित खेळ एकामागून एक सादर व्हायचे.
हे सगळे आठवले.
दूरदर्शनवर दाखविली गेलेली, शाहरुख खान- रेणुका शहाणे असलेली सर्कस मालिका, मेरा नाम जोकर हा सिनेमा आठवला आणि मी खंड पडलेल्या वार्षिक कार्यक्रमाला नातीला घेऊन  जायचे ठरविले.

शो च्या वेळ पासून सगळेच बदललेले! झोकात ड्रेस सर्कलचे तिकीट काढले. नातीला माझ्या आठवणी सांगत आत गेले आणि.... मन उदास झाले. डोकं सुन्न झाले. सर्कसचे वैभव लयास गेलेले आढळले. ड्रेस सर्कलच्या खुर्च्या वाढल्या होत्या पण प्रेक्षक कमी झाले होते. जेमतेम 50/ 60 प्रेक्षक होते.

कलाकारांत लहान मुले तर नव्हतीच पण मोठी माणसे पण खूप कमी होते. वाघ सिंह तरी नसतातच पण हत्ती आणि उंट सुद्धा कुपोषित वाटत होते. विदूषकाच्या चेहऱ्यावरील विषण्ण भाव मेकअपने सुद्धा लपत नव्हते. खेळ सगळे होते. कौशल्यही तेच होते. पण सगळीकडे रिक्तपणा भासत होता.

"जीना यहाँ मरना यहाँ । इसके सिवा जाना कहाँ"

असे प्रत्येकजण देहबोलीतून सांगत होता,विचारत होता.

नक्की हा कशाचा परिणाम? उदासीनता  पालकांची की मुलांची की सर्कस मालक आणि कलाकारांची?

मी नाती बरोबर सर्कसचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत होते. बाल्कनीची मज्जा ड्रेस सर्कलच्या खुर्चीवर बसून सुद्धा नाही आली. 😭😭

सर्कस ही संस्था ऱ्हास तर पावणार नाही ना?

#smitanubhav 84
By Smita Barve
Bangalore.

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण