स्मितानुभव #83 किल्ला


दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात. साफसफाई, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, रोषणाई, फटाके हे सगळीकडेच असते.
पुण्यातील मुलांना आणखी एक गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे किल्ला! ( इतर ठिकाणी करतात की नाही ते मला माहीत नाही.)

मी मुळातच हूड, अभ्यासापेक्षा इतर गोष्टींत जास्त लक्ष. त्यामुळे सहामाही परीक्षा सुरू असतांनाच माझे दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन सुरू व्हायचे. त्यात किल्ल्याला अग्रक्रम.

माझ्या सुदैवाने माझे बालपण भल्या मोठ्या बंगल्यात गेले. मी आणि माझी धाकटी बहीण दरवर्षी वेगवेगळ्या जागी किल्ला करायचो. अगदी लहान असताना आई करायची आणि आम्ही बघायचो. हळूहळू आम्ही करायला लागलो. दगड, विटांचे तुकडे, माती बघता बघता किल्ला उभा रहायचा. सिंहासन, बुरुज ,पायऱ्या आकार घ्यायच्या. आजूबाजूला शेत, त्यात नागमोडी रस्ता,विहीर. विहिरीत पाणी रहावे म्हणून प्रयत्नांची शिकस्त करायचो. काहीच जमले नाही की भातुकलीतील लहान भांडे ठेवायचे. दरवर्षी ठरवायचे की पुढच्यावर्षी चांगली युक्ती काढू.
किल्ला झाला की त्यावर पेरणी व्हायची हळीव आणि मोहरी. झोपेतून उठले की धाव किल्ल्याकडे....शेत उगवले का ते बघायला!

फटाक्यांबरोबर खरेदी व्हायची ती किल्ल्यावर ठेवण्यासाठीच्या मातीच्या बाहुल्यांची. आधीच्या वर्षीची खेळणी जपून ठेवलेली असतं. ती बघून, नसलेली नवीन आणायची.
शिवाजी महाराज, मावळे, उभा सैनिक, दबून बसलेला सैनिक,गवळण, बैल जोडी, वाघ,शेळी,
एक ना दोन...

चार पाच दिवसांत हळीव,मोहरी उगवायचे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी किल्ला हिरवागार दिसायचा.
मातीच्या बाहुल्यांनी किल्ला सजायचा. महाराज सिंहासनावर आरूढ व्हायचे, मावळे अदबीने उभे राहायचे, भगवा झेंडा फडकू लागायचा, शेतातून गवळण रस्त्यावर यायची. कोणी विहिरीवर जायचे.

शप्पथ! हे सगळे बघून स्वतःच शिवाजीराजे असल्यासारखे वाटायचे. गाव वसविल्याचा आनंद मिळायचा. न विसरता किल्ल्यावर पणती लावायची. पाणी मारायचे. कुठे भेग पडली असेल तर ती तातडीने बुजवायची. दरवर्षी वेगळे नाव द्यायचे किल्ल्याला! बाहुल्या सकाळी मांडायच्या रात्री आठवणीने उचलून घरांत आणायच्या, चोराने नेऊ नयेत म्हणून!
मातीची चित्रे ..........कोण चोरणार?
पण ती आमची इस्टेट असायची.

ज्यांच्या घरी जागा नसायची ते कागदाचा किंवा लाकडाचा किल्ला करायचे आणि तो सजवायचे. किल्ला कशाचा आहे ह्याने काही फरक पडायचा नाही. तोच निर्भेळ आनंद असायचा. पूर्वी मोठे वाडे होते. वाड्याचा म्हणून भला मोठा किल्ला केला जायचा. तिथे मोठी मुलंमुली असल्याने वाड्यातील किल्ले जास्त कल्पक आणि देखणे असायचे. किल्ला बघायला मैत्रिणींकडे तर जात असूच त्याबरोबरच प्रेक्षणीय किल्ले बघायला पण जात असू.

"या या या! येथे प्रेक्षणीय किल्ला आहे!"

असे वाड्याबाहेर मुले ओरडत असतं. आई दादांही आवर्जून किल्ले बघायला घेऊन जात. सलाईनची नळी वापरून केलेले कारंजे अजून लक्षात आहे. आहे त्या गोष्टी वापरून देखावे केलेले असायचे.

किल्ला करायचा आनंद मी धाकट्या भावंडाना आणि मुलांना शिकविताना बरीच वर्षे अनुभवला आहे. चिखलात खेळायची आणि अंग माखून घ्यायची मजा काही औरचं!

बघता बघता दिवाळीची सुट्टी संपत यायची. एव्हाना शेतानेपण मान टाकलेली असायची. किल्ला पण मोडकळीला आलेला असायचा. बाहुल्या नीट उचलून खोक्यात भरून ठेवायच्या पुढल्या वर्षीसाठी!

आज लक्षात येत आहे बाहुल्यांबरोबर आठवणी सुद्धा...... खजिन्या सारख्या!

#smitanubhav 83
Smita Barve Bangalore.

फोटो गुगलच्या सौजन्याने 😊

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण