स्मितानुभव#81 भोंडला

भोंडला महाराष्ट्रात नवरात्रात खेळला जाणारा एक खेळ. कुठे त्याला हादगा म्हणतात तर कुठे भुलाबाई किंवा गुलाबाई! नावे वेगवेगळी असली तरी मूळ कल्पना सारखीच आहे. काही ठिकाणी भोंडला हस्त नक्षत्रात पण करतात.

हत्तीचे चित्र मध्ये ठेवून, त्या भोवती फेर धरून गाणी म्हणायची. कुठलीही नाही बरका! ती पण विशिष्ट आहेत. त्याला खूप अर्थ आहे अश्यातला भाग नाही, पण खूप मज्जा येते. शेवटी खिरापत म्हणजे काही तरी खाऊ वाटायचा. तो पण जमलेल्या मुलींनी ओळखायचा. ह्या साठी पण विशिष्ट गाणी आहेत.

पूर्वी पूर्ण नऊ दिवस  भोंडला करत असत. दररोज एक गाणे आणि एक खिरापत वाढवायची. म्हणजे शेवटच्या दिवशी नऊ गाणी आणि नऊ खिरापती!
हत्ती हे समृद्धीचे प्रतिक  म्हणून त्याचे चित्र मध्ये ठेवतात. हल्ली सगळे दिवस जमत नाही म्हणून एखाद्या दिवशी करतात.

माझी आई खूप उत्साहाने माझा भोंडला करायची.
मी मोठी झाले तरी मला दोन धाकट्या बहिणी आहेत, त्यामुळे बरेच वर्ष हा आनंद मला मिळाला. आई दरवर्षी भोंडला करायचीच! तिचा उत्साह इतका जबरदस्त होता की एखादी खिरापत आम्हालाही माहीत नसायची. भोंडल्याचे आणखी एक वैशिष्ट्य त्याचे आमंत्रण वगैरे काही नाही. नुसते कळले की हिच्याकडे भोंडला आहे की सगळ्या मैत्रिणी हजर. मान पान काही नाही. निखळ करमणूक! शेवटी सगळ्या मिळून म्हणायच्या," खिरापतीला काय ग?" तेव्हा खूप भारी वाटायचे. आपण खूप महत्त्वाचे आहोत असे वाटायचे.

आता सगळ्यांना वाटेल नवरात्र संपून इतके दिवस झाले, दिवाळी तोंडावर आली आणि आज हा लेख का? तर मंडळी काल मी आणि मानसीने आमच्या तरुण, उत्साही मैत्रिणींच्या सहकाऱ्याने इथे बेंगलोर मध्ये भोंडल्याचे आयोजन केले होते. जवळजवळ 75 जणी जमल्या होत्या. घराबाहेर नाही राज्याबाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्ववाचा ठसा उमटविणाऱ्या!

खरं तर भोंडला संध्याकाळी करतात, पण आम्ही दिवसभर कार्यक्रम ठेवले होते. खूप जणींना भोंडला म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हते तरी उत्साहाने आल्या होत्या. परप्रांतात राहून असा कार्यक्रम करणे तोही इतक्या मोठया प्रमाणात खूपच आव्हानात्मक होते, एक वेगळा अनुभव होता.

भोंडल्याचा फेर तर धरलाच, त्याबरोबर झिम्मा, फुगड्या, तिखट मीठ मसाला, आईच पत्र हरवले,तळ्यात मळ्यात असे लहानपणी खेळलेले खेळ खेळलो. सीमा आणि मधुराने खूप विचार करून वेगवेगळे खेळ घेतले. हजर प्रत्येकजण माहेरच्या अंगणात बागडून आली.
इतका मोठा कार्यक्रम म्हटल्यावर आर्थिक गोष्टी आल्याच! तो भार समर्थपणे पेलला मुग्धा आणि श्रुतीने! हॉलची सजावट केली स्नेहा आणि अपूर्वा ने! जेवण होते पाव भाजी आणि पुलाव! त्याची जबाबदारी घेतली होती स्नेहलने! प्रांजली,सोनाली आणि प्राचीने कमी तिथे आम्ही म्हणत सगळ्याच गोष्टीत मदत केली.

"आड बाई आडोनी आडाचे पाणी काढोणी
आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला"
 
सर्प म्हणे मी एकुला।। दारी आंबा पिकुला ।।
दारी आंब्याची कोय ग।। खिरापतीला काय ग ।।

अस पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी कानांवर आलं !

खिरापत होती...खोबऱ्याची वडी, खारीक, पालक चकली, केळ्याचे वेफर्स आणि फ्रायम्स!

खरचं काल बेंगलोर मध्ये महाराष्ट्र? नाही हो माहेर साकार झालं!

#smitanubhav 81

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण