स्मितानुभव #80 भ्रामक कल्पना
काळ आहे माझ्या लहानपणीचा! 45 वर्षांपूर्वीचा!
घरी फ्रीज नव्हता. पक्वान्न सणावारी किलो किलोने बनविले जायचे आणि डावाडावाने वाढले जायचे. वजन वाढले का? ह्याचा विचार न करता ओरपले जायचे. एक दोन दिवसांत संपून जायचे. श्रीखंड बासुंदी माझ्या फार आवडीची. संपले की मला रडू यायचे. तेव्हा बाजारातपण सहज मिळत नसे. आई समजूत घालायची की पुढच्या वेळी जास्त करू. मग मी आईला म्हणायची,"मी मोठी झाले की रोज बासुंदी करणार आणि सणावारी आमटी!"
जुन्या पेशवेपार्क मध्ये दारातून आत गेल्या गेल्या एक हॉटेल होते आणि त्याच्या बाजूला छोटे दुकान होते. त्या दुकानाच्या बाहेर GOLD SPOT च्या बाटल्याचे क्रेट ठेवलेले असत. मला त्या नारिंगी रंगाच्या पेयाची जबरदस्त मोहिनी होती. फार म्हणजे फारच कमी वेळा ते प्यायला मिळायचे. एक म्हणजे बाहेर काही खायची तेव्हा पद्धत नव्हती आणि त्यात सोडा असल्याने लहान मुलांना देत नसत. न मिळाल्याने असेल त्याबद्दलचे माझे आकर्षण टिकून होते. कॉलेज मध्ये गेल्यावर पॉकेटमनी मिळू लागला, पण त्याचा हिशोब आईवडिलांना द्यावा लागे आणि आईवडिलांच्या मना विरुद्ध काही करण्याचा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे ते आकर्षण लग्न झाल्यावरही टिकून होते.
लग्नानंतर लगेचच मला 15 दिवसांसाठी बेळगांवला ट्रेंनिग साठी जावे लागले. माझ्यासाठी ही लॉटरीच होती. पंधरा दिवस हॉटेल मध्ये खायचे प्यायचे! विचारणारे कुणी नाही आणि कुणाला सांगायचे पण नाही. मग काय पहिल्याच दिवशी सकाळ संध्याकाळ GOLD SPOT! दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा, आणि दुपारनंतर पोटातून आवाज यायला लागले, थंडी भरून आली, गोल्ड स्पॉटची सगळी हौस फिटली. अजून सुद्धा सॉफ्ट ड्रिंकच्या वाटेला जात नाही.
बटाट्याचे वेफर्स म्हणजे माझा जीव की प्राण! कितीही आणले तरी ते संपणारच ना? संपले की खूप वाईट वाटायचे, मग मी आईला सांगायची की मी मोठ्ठी झाले ना आणि मला पगार मिळाला ना की खोलीभर वेफर्स आणणार आणि एकटी खाणार! कितीदा तरी मला 'खोलीभर वेफर्स आणि एकटी खाणारी मी 'अशी स्वप्न पडली आहेत.
खोलीभर वेफर्स आणता येतात पण खाता येत नाहीत हे तेव्हा समजायचे नाही.
पंधरा सोळा वर्षाची झाल्यावर आई घरातील कामे करायला सांगायची. पण मला जाम कंटाळा यायचा. काही कारणे काढून मी टाळायला बघायची. आई म्हणायची," इथे ठीक आहे. सासरी काय करशील? कितीही शिकले, नोकरी केली तरी बाईला घरात लक्ष द्यावेच लागते. सगळी कामे यावी लागतात." ह्यावर मी म्हणायची मी सगळ्या कामांना बाई ठेवीन. आईने सांगितले की तसे केलेस तरी तुला येत असेल तरच तू करून घेशील ना? लक्ष तर तुलाच ठेवावे लागेल. बाई आली नाही तर तुला उभे रहावे लागेल. आईचे म्हणणे तंतोतंत खरे होते. 33 वर्षातील वैवाहिक आयुष्यातकमीत कमी15 वर्षे ह्या ना त्या कारणाने सगळी कामे मी घरीच करत होते.
माझ्या भ्रामक कल्पना!भ्रमातच राहिल्या 😜😜!
#smitanubhav80
Comments
Post a Comment