स्मितानुभव #79 #जरा_ विसावू_ ह्या_वळणांवर#

"स न वि वि" ग्रुपच्या तिसऱ्या उपक्रमात लिहिलेला लेख....

#जरा_ विसावू_ ह्या_वळणांवर#

खरं म्हणजे ही माझ्या आयुष्याची टॅग लाईन आहे.  ह्या वर कधी लिहायची वेळ येईल असे वाटलेच नव्हते. घर, संसार, कुटुंब, ऑफिस ....कधी ना कधी वाद होतात, मतभेद होतात... दोनजण एकत्र आले की हे ओघानेच आले. दरवेळी क्षणभर विसावून ....झाले गेले विसरून.... पुढे... पुढे चालतच राहीले. चालता चालता  वय 48 झाले, नोकरीत पण 28 वर्षे पूर्ण झाली आणि लेकीने गोड बातमी दिली की मी आजी होणार आहे.....ह्या वळणांवर विसावा घ्यायचे ठरविले.

बालपण मजेतच गेले. तशी अभ्यासात खूप नसले तरी हुशार होते. कश्यासाठीच फार कष्ट घ्यावे लागायचे नाहीत. बी कॉम पूर्ण होण्याआधीच 1984 मध्ये बँकेत नोकरी लागली. साडे एकोणिसाव्या वर्षीच मी मिळवती होते. घरात मोकळे वातावरण होते. भावंडात मीच मोठी. पहिली मिळवती मुलगी होते. माझ्या हट्टाखातर वडिलांनी नोकरी करायला परवानगी दिली आणि तीच आयुष्याचे महत्वाचे वळण ठरली. सहकारी सतिशची सहचारिणी झाले. शून्यापासून सुरवात केली. स्वतःच्या बंगल्यातून एकदम चाळीत राहायला आले. पाण्याचा ग्लास पण कधी न भरलेली मी बाहेरून पाणी भरू लागले. मनात एकच होते हेही दिवस जातील.
21व्या वर्षी 27 एप्रिल 1986 रोजी जुळ्या मुलांची... तेही आठव्या महिन्यांत ....आई झाले. एक मुलगा एक मुलगी.  आधी माहीत ही नव्हते ! जेमतेम तीन पाऊंड ची होती दोघे! आईने धीर दिला," घाबरू नकोस, ज्याने दिले आहे तोच शक्ती देईल. आम्ही आहोतच पाठीशी!" हौसेने सुरू केलेली नोकरी अत्यावश्यक झाली.
आईचे बोल देवाने खरे केले. खूप अडचणी आल्या पण सगळ्यातून पार झालो. premature babies असल्याने सतत आजारपण. सुदैवाने चांगले शेजारी, चांगले डॉक्टर, चांगली शाळा आणि चांगले शिक्षक मिळत गेले. मुले सद्गुणी निघाली. आज अभिमानाने सांगू शकते की ती उत्तम माणूस आणि सुजाण नागरिक आहेत.
मिस्टरांना पाठिंबा आणि मुलांचे संगोपन ह्यामुळे माझे करियर थोडे मागे पडले. पण त्याची खंत नाही. ईश्वराने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद दिली. 1997 ते 1999 हा काळ खूपच वाईट गेला. मार्च 1999 मध्ये आजी आणि नोव्हेंबरमध्ये आई आम्हाला सोडून गेल्या.मुलांच्या संगोपनात दोघींचाही सिंहाचा वाटा होता. ह्या काळात कुटुंबातील प्रत्येक घरावर काहींना काही संकट येत होते. एकातून बाहेर पडे पर्यंत दुसरे दत्त पुढे उभे असे. आईच्या शिकवणीमुळे आणि वडिलांच्या खंबीर आधारामुळे हळूहळू सावरले. बँकेतील नोकरीमुळे खूप ठिकाणी बदली झाली. वेगवेगळे प्रदेश आणि माणसं बघता आली.
मुलांनी पाठींबा दिला म्हणून 2006 मध्ये प्रमोशन घेतले. हे नवीन वळण पण खूप आनंददायी ठरले. "Job Satisfaction" चा खरा अर्थ उमगला. ही माझी खारघर नवी मुंबई शाखा ....सकाळी 8 ते रात्री 8 अशी होती. मी सकाळी सात ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर असायची. असे सलग तीन वर्षे केले....आणि पुन्हा एकदा बदली झाली बेंगलोरला

हे वळण घरातील सगळ्यांसाठीच महत्त्वाचे ठरले. खरं तर माझी  बेंगलोरला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण लेकीचे लग्नाचे वय झाले होते. वेगळ्या प्रदेशात राहून लग्न कसे जुळविणार असे मला वाटतं होते. म्हणतात ना " ईश्वराच्या मर्जी शिवाय छोटे पान सुद्धा हलत नाही." अगदी तसेच झाले. ऑक्टोबर 2010 ला बेंगलोरला आलो. जानेवारी 2011 मध्ये लेकीचं लग्न ठरले आणि मे मध्ये झाले सुद्धा. तिला खूप चांगली माणसं मिळाली. 3 वर्ष आम्ही खालीवर रहात होतो. लेकीचे सुख मी रोज अनुभवत होते. फार थोडया लोकांना हे भाग्य लाभत असेल.
इकडे बँकेत पण अजून एक प्रमोशन झाले. मॅनेजर म्हणून. खूप एन्जॉय केली मी माझी नोकरी. जबाबदारी पण खूप वाढली. जुळी मुले असल्याचा आता फायदा झाला होता, दोघे एकदम सेटल झाली आणि मी फ्री. 12 तास मी काम करत होते. ओढाताण होत होती पण बाकी काही व्याप नव्हता. खरं तर इतकी बिझी झाले होते की घरात सामान सुद्धा आणलेले नसायचे. पण तिघेच होतो ,चालत होते... आणि लेकीने गोड बातमी दिली ....आणि नकळत थोडे टेन्शन आले की आता मी हे कसे करणार? तिचे बाळंतपण आणि नंतर बाळाचे संगोपन...मुलगी नोकरी करत होतीच शिवाय तिच्या सासूबाई पण नोकरी करत होत्या.

मला माझी मुले लहान असतानाचे दिवस आठवले, मुले लहान असताना झालेले हाल आणि कुतरओढ आठवू लागली......आणि स्वतः स्वतःला दिलेले वचन आठवले " काहीही झाले तरी मी माझ्या नातवंडांचे हाल होऊ देणार नाही. माझे झालेले हाल मी माझ्या लेकीचे आणि सुनेचे होऊ देणार नाही." बस निर्णय घेतला की VRS घ्यायची. साधक बाधक चर्चा झाली. वरिष्ठांचा सल्ला घेतला आणि अजून बारा वर्षे शिल्लक असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी एकटी घरी राहिले तर बाकी सगळे आरामात आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकणार होते. 31 मार्च 2013 हा माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस होता.
आणखी एका आनंदाच्या वळणावर उभी राहिले. आधी वाटले की इतक्या धावपळीच्या आणि सतत व्यस्त आयुष्याची सवय आहे घरी कसे होणार आपले?  आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्याची सवय असल्याने काहीच अवघड गेले नाही. नातीच्या बाळलीला जवळून बघता आल्या. मुलांच्या बाबतीत जे जे हरवले होते ते ते नातीमुळे गवसले. 2014 मध्ये मुलांचेही लग्न झाले. साजिरी सून घरी आली. सुखाने आणखी एक वळण घेतले.

2015 मध्ये मुलीला ऑन साईट जाण्याची संधी आली. तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिले.......
"गो अहेड" म्हटले. तिच्या बरोबर सहा महिने लंडनमध्ये राहून आले. नात आता 5 वर्षांची झाली. लेक सुखाचा संसार करते आहे. घेतलेली जबाबदारी यशस्वी पार पडल्याचे समाधान आहे.
आता मुलालाही मुलगी झाली आहे. नव्या परीचे कौतुक करण्यात परत मग्न झाले आहे.

आता पूर्ण वेळ घरी असल्याने राहिलेले छंद, विणकाम, लेखन ,वाचन आणि थोडे थोडे किचन सगळेच एन्जॉय करते आहे. Whatsapp आणि फेसबुकमुळे राहिलेली सगळी कसर भरून निघाली आहे.

खूप अवघड परिस्थिती सुरू झालेली ही वाटचाल आता सुख समृद्धीने विसावली आहे. ऐहिक सुखे तर आहेतच पण त्याहूनही खूप जास्त आहे आत्मिक समाधान आणि शांती!

#smitanubhav 79

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण