स्मितानुभव #78 मला_आवडलेली_ती_किंवा_तो...
"स न वि वि" ग्रुपच्या दुसऱ्या उपक्रमात लिहिलेला लेख....
#मला_आवडलेली_ती_किंवा_तो...
खरं तर मला सिनेमाचा अजिबातच शौक नाही. मला कधीही कुठलाही सिनेमा आवर्जून पहावा असे अजूनही वाटत नाही. पण नैसर्गिक अभिनयाची मला भुरळ पडते. त्यामुळे मला सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, वंदना गुप्ते आणि नवीन पिढीतील मुक्ता बर्वे खूप आवडतात.
बाळाचे बाप ब्रह्मचारी, चौकट राजा,आणि अगदी अलीकडचा इंग्लिश विंग्लिश....हे सुलभा देशपांड्यांचे माझे आवडते चित्रपट. भूमिका फार मोठी नसली तरी अभिनयाने आणि संवादामुळे त्यांची भूमिका असलेले चित्रपट परत परत पहावासे वाटतात. "नंदू बाळ मोठा होणार असेल तर, आयुष्यभर मी त्याच्या लाथा खायला तयार आहे" हा चौकट राजा मधील त्यांच्या आवाजातील संवाद काळजाला भिडतो.
नावा प्रमाणेच सुलभ अभिनय आणि संवाद फेक.
नीना कुलकर्णी ही एक नटखट, अवखळ भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकाही समर्थपणे करणारी अभिनेत्री. 'सवत माझी लाडकी ' खट्याळ बायको रंगविणारी नीना 'उत्तरायण' मध्ये गंभीर भूमिका निभावते. तर 'आई' चित्रपटात आधी सौम्य
आईची आणि नंतर कर्तव्य कठोर आईची भूमिका सहजतेने करते. Born Actress वाटते मला ती.
सात्विक चेहरा लाभलेली अभिनेत्री म्हणजे सुहास जोशी. नाव सार्थ करणारी. तू तिथे मी, सातच्या आत घरात, आणि अनेक टेलिव्हिजन मालिकेतून त्यांनी काम केले आहे. घरातील आई कशी असते ना ? तसा त्यांचा अभिनय. प्रसंगी कठोर तर कधी प्रेमळ तर कधी एकदम हळवी. अस्मिता चित्रचा
" तू तिथे मी " हा सुहास जोशींचा चित्रपट माझ्या खास आवडीचा. उषाची भूमिका त्यांनी किती सुंदर आणि सहज साकारली आहे. उतार वयातील लाजण्याचा अभिनय तर लाजबाब ! विरहाने व्याकुळ झालेली उषा तर काळजालाच घरे पाडते. कुठलाही रोल त्यांना सहज करता येतो. कधीही ह्या सिनेमाची आठवण जरी आली तरी सुहासताईंचे सात्विक आणि गोड रूप डोळ्यासमोर येते.
वंदना गुप्तेची नाटके मला फार आवडतात. मी त्यांची खूप नाटके पहिल्या दुसऱ्या रांगेत बसून बघितली आहेत. अक्षरशः चेहऱ्यावरची रेष अन् रेष अभिनय करत असते. त्यांचा खट्याळ आणि बिनधास्त स्वभाव त्यांच्या अभिनयात उमटतो. असं बिनधास्त आपल्याला स्टेजवर वावरता येईल का? असे मला नेहमी वाटते.
मुक्ता बर्वे पण अशीच बिनधास्त! सगळ्या माध्यमातून लीलया वावरणारी! चित्रपट,नाटक आणि दूरदर्शन मालिका ....सगळीकडे नावा प्रमाणेच मुक्त संचार. मुंबई- पुणे-मुंबई ( दोन्ही भाग),जोगवा, डबल सीट, सारेच चित्रपट पुन्हा पुन्हा पहावे वाटतात. कोडमंत्र नाटकाची ती निर्माती आहे आणि त्यात तिचा सक्षम रोल सुद्धा आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि रुद्रम ह्या टी व्ही मालिका तर वर्षानुवर्षे लक्षात राहतील त्या तिच्या अभिनयामुळेच!
बॉलिवूडचा विचार आला की माझ्या समोर दोनच व्यक्ती येतात one and only The great अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्रची लाडकी लेक माधुरी दिक्षित.
अमिताभ अभिनयाचे बादशहाच आहेत आणि बॉलिवूडचे 'डॉन'. मला ते माणूस म्हणून खूप मोठे वाटतात. त्यांचा अभ्यास, बोलणे, समोरच्याला आदराने वागविणे सगळे शिकण्यासारखे आहे. त्यांची व्यवसायाप्रती असलेली कमिटमेंटच त्यांच्याबद्दलचा आदर वाढविते. त्यांचा आवाज आणि त्यांची भाषा हिंदी किंवा इंग्रजी ऐकत रहाव्यात असे वाटते. त्यांचे सगळेच चित्रपट चांगले आहेत. माझा आवडता चित्रपट आहे बागबान आहे.
माधुरीच्या माधुर्याची तारीफ कोणत्या शब्दांत करणार? बस्स आठवते ते तिचे दिलखुलास हास्य आणि मनमोहक अदा! मग ते असो...एक दो तीन, धक धक करने लगा, दिदी तेरा देवर दिवाना,
डोला रे डोला रे डोला किंवा....किती मोठ्ठी यादी!
माधुरी तेरा जवाब नहीं।
।।तारीफ करू क्या उसकी। जिसने इन्हे बनाया।।
#smitanubhav78
Comments
Post a Comment