स्मितानुभव #77#मी_शाळा_आणि_उपद्व्याप

फेसबुकवर "स न वि वि " हा खूप सुंदर गृप आहे. त्यांनी विविध उपक्रम घेतले होते. ह्या लेखाला मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 4218 मेंबर आहेत ह्या ग्रुपचे!

#मी_शाळा_आणि_उपद्व्याप

विषय मिळाला आणि वाटलं अरे आपण काय लिहिणार? आपण तर काहीच उपद्व्याप केले नाहीत शाळेत! सर्रकन ती सोनेरी नऊ वर्ष डोळ्यासमोर आली....नऊ वर्ष?....चावलीत ना जीभ मंडळी ?...मी पण चावली जीभ आणि तुटका दात लागला ना जिभेला....

मंडळी माझ्या नकळत माझ्या शाळेतील उपद्व्यापांना सुरवात झाली. शिशु वर्गातून सरळ मी दुसरीत पुण्याच्या भावे प्राथमिक शाळेत गेले. डिसेंबर मधील जन्म असल्याने वर्ष वाचविण्यासाठी शिशु शाळेतच पहिलीची परीक्षा घेतली आणि दुसरीच्या वर्गात घातले. ह्या शाळेनी मला आयुष्यभराची शिदोरी दिली आहे. आयुष्यातील सगळ्या चांगल्या गोष्टींचा पाया या शाळेत घातला गेला. आत्मीयतेने शिकविणारे शिक्षक... आजही आठवण आली की आदराने मान खाली झुकते. मध्यंतरी एक सुविचार वाचण्यात आला,

*धन्य ती माझी मराठी शाळा🏡 🙏*
*जीने मला इंग्लिश 🏫शाळेची फी भरायच्या लायक बनविले.*... तंतोतंत खरं आहे हे.

दुसरीत मला अभ्यंकर बाई होत्या. मला गालावर काहीतरी पुरळ उठले होते. डॉक्टरांच्या औषधानेही कमी होत नव्हते. बाईंनी आईला कच्चा शेंगदाणा उगाळून लावायला सांगितला आणि दोन तीन दिवसातच गाल बरा झाला.
ह्या माझ्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांचे सुंदर हस्ताक्षर...त्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचे अक्षर सुरेख व्हायचे, म्हणजे शिक्षक तसे ते करून घ्यायचे.
मारुति स्तोत्र, रामरक्षा आणि गीतेचा 15 वा अध्याय आजही मुखोद्गत आहे.
पाचवी ते दहावी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कुल मध्ये. शाळेत बाहेरील परीक्षेची तयारी करून घेत असत.पाचवीत हिंदीच्या "बालबोधिनी " परीक्षेचा तास शाळा सुटल्यावर असायचा. एक दिवस त्या क्लासच्या प्रभा जोशीबाई म्हणाल्या की जा बघून या की किती वाजले आहेत ते. शाळेच्या मध्यभागी भिंतीवर मोठे घड्याळ लावलेले होते. पोटात कावळे कोकलत असल्याने घरी जायची घाई असायचीच, शिवाय बाईना पण पहिल्यांदा सांगू ह्या विचाराने मी मोडके बाक रचून ठेवले होते त्यावर चढले....आणि काही कळायच्या आत बाक घसरले आणि मी तोंडावर आपटले. घड्याळ तर दिसले नाहीच शिवाय दातही तुटला
कायमचा....तोच टोचतो जीभ चावली की ! 😜

ह्या व्यतिरिक्त विशेष काही उपद्व्याप नाही केले. पण खेळ,नाटक,नाट्यछटा, वर्गप्रमुख, कुलप्रमुख अश्या सगळ्या गोष्टीत पुढाकार घेतला. मनापासून भाग घेतला. हस्त लिखित काढले होते. वर्गप्रमुख म्हणून सगळ्या मुलींची नावं असलेली यादी करावी लागायची आणि प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना द्यावी लागायची. त्यामुळे पूर्ण कॅटलॉग पाठ असायचा अगदी वडिलांच्या नावा सकट! खरं सांगायचं तर शक्य ते सगळे करून बघितले. कधी यश मिळाले तर कधी नाही, पण घडत नक्की होते.
नेतृत्व, सभाधीटपणा, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची क्षमता... ह्या साऱ्याचा करियर मध्ये खूप उपयोग झाला. शाळेत पेरलेली बीजे आज वृक्ष होऊन सावली देत आहेत.
"मैत्रिणी" हा अमूल्य ठेवा ही शालामातेचीच देणगी आहे... हो की नाही?

#smitanubhav 77

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण