स्मितानुभव #76 चाफा
काही काही गोष्टी मनाच्या खूप जवळच्या असतात. काही निमित्त होते आणि सगळ्या आठवणी जाग्या होतात. स्वतःच्याही न कळत मन भूतकाळात रमते.
तसेच काल झाले. अष्टाक्षरी करण्यासाठी विषय मिळाला "चाफा" .......कविता सुचण्याआधीच मन पुण्याच्या घरातील गच्चीत गेले.
चाफ्याची दोन झाडे, पानामागून डोकावणारी सोनचाफ्याची फुले, फ्रॉक मधील मी आणि माझी धाकटी बहीण.... आई दादांबरोबर फुले काढण्यासाठी केलेली पळापळ सगळे सगळे डोळ्यासमोर आले.
शेजारी शेजारी दोन झाडे होती, आजोबांनी लावलेली. दोन्ही झाडात खूप फरक होता. एक विस्तिर्ण पसरले होते तर एक सरळ उंच वाढले होते. त्यामानाने उंच झाडाला फुले कमी यायची, त्या फुलांचा रंग केशरी पिवळा आणि आकार खूप छान असायचा. विस्तीर्ण झाडाला भरपूर पिवळी फुले यायची. श्रावणात चाफा बहरलेला असायचा. 500/500 फुले निघायची. घरी कोणी आले की म्हणायचे " काय सुंदर वास आहे चाफ्याचा." ह्या फुलांमुळे शाळेतही खूप भाव खायला मिळायचा. बाईंना द्यायची. शाळेत श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकू असायचे. परडी भरून फुले घेऊन जायची. आम्ही फुले विकत सुद्धा देत असू. आसपासचे लोक सांगून जायचे, "उद्या सत्यनारायण आहे. फुले ठेवा आमच्यासाठी!"
डॉ. नातू... आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्यासाठी फुले राखून ठेवलेली असत.
इतके करून सुद्धा फुले उरायची. ती फुले आई काचेच्या बाटलीत भरून प्रिझर्व करायची. ज्यांना आवड असेल त्याला भेट द्यायची. 1998 च्या आधी प्रिझर्व केलेली एक बाटली अजूनही माझ्या बहिणीकडे आहे. अनंत आठवणी आहेत चाफ्याबद्दल!
चाफ्याच्या बिया द्राक्षाच्या घडासारख्या असतात. हिरव्या आवरणात शेंदरी रंगाच्या बिया. लहानपणी भाजी भाजी खेळतानाची ती मुख्य भाजी असायची. हा खेळ रंगायचा हो सुद्धा चाफ्याच्या झाडाखाली ...सावलीत.
लग्न झाल्यावर हा वारसा धाकट्या बहीण भावांनी चालविला. आता झाड खूप उंच गेले आहे. काढू शकतो तेव्हढी फुले काढतो... बाकीची सुकून जातात...😢😢😢 इलाज नाही.
इतके सगळे डोक्यात घोळत असल्यावर कविता कुठली सुचायला? सकाळी विषय मिळाला होता आणि माझी कविता झाली रात्री....पण सुचली.
बघा आवडते आहे का?
चाफा
रुसलीस का सखे ग
रोजच उशीर होई
घरी परतताना ग
बाजार बंदच होई
ठावे आशा फार नाही
खुलती कळी मोहवी
खूष होशी कशानेही
रातराणी ही भुलवी
सखे संपली प्रतीक्षा
विचार करून झाला
ओंजळ भरून चाफा
तुझं साठी मी आणला
सोन फुले पाहून ही
मनोमनी हरखून
स्मित हास्य ही फुलले
गेलो सहज भुलून
गंध मोहक चाफ्याचा
माहेरची आठवण
आठवती मातापिता
माय करी साठवण
#smitanubhav76
Comments
Post a Comment