स्मितानुभव #74 स न वि वि लेख
बेंगलोर महाराष्ट्र मंडळातर्फे "स न वि वि" हे मासिक प्रकाशित होते. सप्टेंबर 2018 च्या गणेशोत्सव विशेषांकात मला लेख लिहिण्याची संधी मिळाली. तोच हा लेख....
गणपती उत्सव माझ्या दृष्टीकोनातून
चातुर्मास सुरु झाला की वेगवेगळ्या सणांची मालिकाच सुरु होते. मला शाळेत शिकलेली प्रतिज्ञा आठवू लागते. “ माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.”
खरंच! किती विचारपूर्वक, नैसर्गिक ,सामाजिक,भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी रूढी ,परंपरा,आणि सण ह्याची आखणी केली आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. पावसाळा असल्याने शेतीची कामेही फारशी नसतात. आबालवृद्ध ह्या उत्सवात सहभागी होऊ शकतात. होणारी पूजा, त्याला लागणारे साहित्य, इतकेच काय अर्पण करायचा नैवैद्य ह्या सगळ्याचा बारकाईने विचार केलेला आहे. सगळ्या परंपरेतून शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ जपण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. गणेश उत्सव हा ह्या मालिकेतील सर्वोच्च सण !
बहुतेक सण हे एक दिवसाचे आहेत, त्यामुळे बराचसा वेळ पूजा-अर्चा, नेवैद्य ,तीर्थप्रसाद ह्यातच जातो. सात्विक आनंद आणि समाधान मिळते पण मनोरंजन होत नाही. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनांत कितीही मनात असले तरी हे सगळे सण उरकले जातात किंवा टाळले जातात.
गणेशोत्सवाचे वैभवच वेगळे. एकतर दहा अकरा दिवस बाप्पांचा मुक्काम असतो. सगळे साग्रसंगीत करता येते. कामधंद्यानिमित्ताने बाहेरगावी असलेले चाकरमानी आवर्जून गावी जातात. शिवाय ह्या उत्सवात धार्मिक गोष्टीं बरोबरच विविध गुणांना प्रोत्साहन दिले जाते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करून ह्या उत्सवाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे.
विविध सरकारी योजनेतून गृहनिर्माण उद्योगाला जास्तीतजास्त चालना दिली जाते. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ह्या एका उद्योगांवर इतर अनेक छोटे उद्योग अवलंबून असतात. मोठया व्यवसायाला चालना मिळाली की आपोआपच छोटे छोटे उद्योग पण विकसित होतात. हे अर्थशास्त्राचे मर्म आपल्या
पूर्वजांनी जाणले होते आणि त्याची अंमलबजावणीही केली होती. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव.
गणपतीची मूर्ती, सजावट, पूजेसाठी केवडा, कमळ, दुर्वा, फुले, विड्याची पाने, सुपारी, कापसाची वस्त्रे. नैवेद्यासाठी पंचामृत, नारळ,गूळ,फळे,पंचखाद्य. महानेवैद्यासाठी उकडीचे मोदक. ह्या सगळ्याचा बारकाईने विचार केला तर असे लक्षात येते की समाजातील सर्व घटकांनाच ह्यातून लाभ होतो. आर्थिक उलाढाल होऊन अर्थकारण सक्षम राहते. कुंभार,माळी, व्यापारी,सुतार,लोहार,गवळी आणि ब्राह्मण सगळ्यांवर वेगवेगळी जबाबदारी ! आपोआपच सगळ्यांचा सक्रिय सहभाग! कमळ, केवड्यासारख्या दुर्मिळ गोष्टी ना सुद्धा पूजेत स्थान आहे. किती सूक्ष्म विचार आहे सगळ्या मागे.
गणपतीला बुद्धीची देवता मानतात. त्याला आवडतात मोदक. गूळ आणि खोबरे हे बुद्धिवर्धक आहे. त्यावर घातले जाणारे तूप स्निग्धता निर्माण करते. आवरण तांदुळाचे असते जे पचायला हलके आणि सहज उपलब्ध होणारे आहे. नेवैद्य दाखवायचा म्हटले की गृहिणी सुद्धा मनापासून साग्रसंगीत स्वयंपाक करते. सगळ्या रसांचा भोजनात समावेश होईल ह्याकडे लक्ष देते. चौरस आहारामुळेच तर कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते ना?
नेवैद्या नंतर घंटानाद आणि झांजांच्या गजरात आरती म्हटली जाते. घंटानादामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. टाळ्या वाजविल्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. आधुनिक संशोधनानुसार सुद्धा टाळ्या वाजविल्यामुळे तणाव कमी होतो असे सिद्ध झाले आहे. हल्ली तर रोजच्या व्यायामाचा तो एक भाग झाला आहे.
गणपती चौसष्ट कलात निपुण आहे. त्यामुळे सेवा म्हणून रांगोळी,संगीत,नाट्य, अशा अनेक कला पेश केल्या जातात. एक से एक दिग्गज कलाकार हे गणेशोत्सवामुळे आपल्याला मिळाले आहेत. जेव्हा सार्वजनिक गणपतीची सुरवात झाली नव्हती तेव्हा सुद्धा एकमेकांकडे आरतीला जात. सेवा म्हणून एखादे पद, अभंग गात असतं.
ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्याचे ठरविले आणि त्याला मूर्त स्वरूप दिले. एकत्र समाजात खूप ताकद असते हे ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले आणि ते यशस्वी झाले ही. साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे गणेशोत्सवातील कार्यक्रम अजून माझ्या स्मरणात आहेत. वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे, श्रेष्ठ गायक, वादक, नकलाकार,जादूगार ह्यांचे कार्यक्रम, ह्यामुळे समाजाची सकारात्मक घडण होत होती. हळूहळू गणपती समोर देखावे करण्यास सुरुवात झाली. आणखी थोड्या वर्षांनी चालते बोलते देखावे करण्यास सुरवात झाली. टिळकांना अपेक्षित बदल घडत होता. समाजाची एकी वाढत होती. नवनवीन कलाकार उदयास येत होते. दहा अकरा दिवस कसे संपायचे ते समजायचे सुद्धा नाही. बघता बघता विसर्जनाचा दिवस यायचा. गणपती येतात ते वाजत गाजत आणि परततात तेही वाजत गाजत. ढोल,ताशा, लेझीम शिस्तबद्ध पथके. मनोहारी दृष्य. जवळपास विहिरीत,नदीत विसर्जन बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप आणि पुढच्या वर्षी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण. अगदी पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत गणेशोत्सव हा मनाला भावणारा, वर्षभराची ऊर्जा देणारा होता....
हळूहळू देखाव्याची जागा विद्युत रोषणाई ने घेतली. भक्तीगीतांवर नाचणारे पिटुकले दिवे पाहताना मन आनंदात तरंगत असे. कधी आणि कशी अधोगती होत गेली ते समजलेच नाही.
आज डिस्को आणि डीजे मुळे तर नको तो उत्सव अशी वेळ आली आहे. धांगडधिंगा आणि कर्णकर्कश आवाजाने उच्छाद मांडला आहे. भक्तीभाव जाऊन त्याची जागा व्यवहाराने घेतली आहे. दारू सिगरेट सारख्या निषिध्द गोष्टी सर्रास दिसतात. पूर्वी दिलेली वर्गणी ही सत्कारणी लागेल ह्याची खात्री होती. आता तिचा विनियोग कसा होईल ह्या भीतीने द्यायची इच्छा नसते पण द्यावी लागते कारण पूर्वी खुशीचा असलेला मामला आता जबरदस्तीचा झाला आहे.
मोठे मोठे मांडव घालतात, रस्त्याची वाट लावतात, मोठे मोठे स्पीकर लावून सिनेसंगीतच्या चालीवर आरत्या लावतात. संगीत मैफिलीची जागा कॉन्सर्टने घेतली. कला ही सेवा म्हणून अर्पण करण्यात धन्यता मानत तेच आता उत्पन्नाचे साधन झाले आहे. खरंतर भक्तीभाव सोडून सगळं काही असतं आजच्या गणपती उत्सवात ! देव सगळा एकच आहे ना? तरी सुद्धा जाहिरात करतात अमका नवसाला पावतो की निघाले सगळे त्याच्या मागे! समाज सुधारणा राहिली बाजूला उलट तो आंधळा ,बहिरा आणि मनाने पांगळा झाला आहे.
मातीच्या मूर्तीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आली. देखाव्यातील लाकडाची जागा थर्माकोलने घेतली. विनाकारणच मूर्तीचा आकार आणि उंची वाढली. त्यामुळे विसर्जन ही एक नवीन समस्या निर्माण झाली. सुधारणा म्हणत नैसर्गिक संपत्तीचा नाश झाला. पूर्वी सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी दुर्मिळ झाल्या आणि त्याचे भाव गगनाला भिडले..... युगायुगाची आपली संस्कृती, परंपरा आपण कोठे नेऊन ठेवली आहे?
विसर्जन मिरवणूक तर इतकी लांबते की अनंतचतुर्दशीला करायचे विसर्जन पौर्णिमेला किंवा त्याही नंतर होते. मिरवणुकीनंतर परिसर म्हणजे कचराकुंडी झालेला असतो. काही दिवसांनी मूर्तीचे भग्नावशेष दिसू लागतात. असे वाटते की हल्ली देव आणि भाव सोडून सगळे असते गणेशोत्सवात. सगळ्याचा नुसता देखावा!
मनांत एक खंत वाटत राहते की खरचं देवाला आवडत असेल का हे सारे? टिळकांना काय वाटत असेल?
राहून राहून विचार येतो ...समृद्ध परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी कणभर तरी प्रयत्न करतो आहे का?
आहे का मी पाईक? की सगळे प्रतिज्ञेपुरतेच उरले आहे?
#smitanubhav74
Comments
Post a Comment