स्मितानुभव #72      महाराष्ट्र मंडळ.... व पु लं

मागे मी एकदा म्हटले होते की ज्या गोष्टी तुमच्या नशिबात असतात त्या तुम्हाला मिळतातच......

अचानक मिस्टरांना लक्षात आले की सलग तीन दिवस सुट्टी आहे 21,22,आणि 23 सप्टेंबर......
आणि बँकेत विशेष काम नाही, त्यातून लेकीने भरीला घातले की बाबा आईला घेऊन कुठेतरी जाऊन या. मिस्टरांनी लगेच मनांवर घेतले आणि म्हैसूरचे बुकिंग केले.
शुक्रवारी सकाळी 11 ची शताब्दी एक्सप्रेस!

बंगलोरला येऊन आता आठ वर्षे झाली पण आम्ही अजून बंगलोरसुद्धा पाहिले नाही, त्यामुळे आजूबाजूचे बघण्याचा प्रश्नच नाही.

गुरुवारी रात्री 9.30 पर्यंत जाणे पक्के होते. अचानक अहोंचा फोन आला," अग, असे झाले आहे....."
" की आपले उद्याचे कॅन्सल झाले आहे"...इति मी.

" तुला कसे कळले? अग आत्ताच मेल आली आहे. अर्जंट डेटा द्यायचा आहे. जास्त काम आहे. "  खरं सांगायचं तर ठरणे आणि रद्द होणे हे आम्हा दोघांनाही नवीन नाही.

तर ह्या सगळ्यामुळे काय झाले की "महाराष्ट्र मंडळ बंगलोर".....आयोजित विविध कार्यक्रमांचा मला आनंद लुटता आला. हे सुद्धा मी बंगलोरला आल्यापासून पहिल्यांदाच केले.
येथील स्थायिक लोकांनी सादर केलेले विविध
गुणदर्शन, एकांकिका, नृत्यनाटिका "चित्रांगदा" बघता आले.
रविवार अनंत चतुर्दशी...बाप्पाच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस. मंडळात सकाळपासूनच कार्यक्रम होते. मी पण उत्साहाने लवकरच गेले. आजचे मुख्य आकर्षण होते " व पु लं "
गायक कलाकार होते, मुग्धा वैशंपायन आणि नचिकेत लेले. रसिक म्हणून मला सगळेच आवडते त्यात वपु आणि पु लं अत्यंत आवडते लेखक. त्यामुळे कार्यक्रम नक्की काय असेल ह्याची खूप उत्सुकता होती.
सगळे कलाकार अगदी तरुण वीस बावीस च्या आसपास असावेत. इतका सुंदर कार्यक्रम लिहिला, सादर केला की दोन्ही लेखकांची पात्रे जिवंत होऊन आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास झाला. ऐकतांना, पाहतांना किती वेळा अंगावर काटा आला, कितीवेळा डोळे पाणावले काही सांगूच शकत नाही. आईवडिलांच्या जन्माच्याही आधीचे साहित्य आणि संगीत पोरं जीव ओतून सादर करत होते. खूपच सुंदर आणि आगळीवेगळी संकल्पना आहे.
एव्हढीशी पोरं काय गायली! " करू देत शृंगार, कबीराचे विणीतो शेले, नाच रे मोरा, ही कुणी छेडली तार, इंद्रायणी काठी, जोहार माय बाप जोहार, माझे जीवन गाणे " खरंच! काही संपूच नये असे वाटतं होते ......

संगीत आणि  मराठी साहित्य अमर आहे ह्याची खात्री पटली.

ज्यांना संधी मिळेल त्यांनी आवर्जून ऐका.
                      " व पु लं "

#smitanubhav72

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण