#स्मितानुभव 71 पु लं
सहज म्हणून लिहिले.... प्रोत्साहन मिळाले म्हणून लिहीत गेले. बघता बघता परीघ वाढत गेला. नवीन नवीन ओळखी होत गेल्या....आणि एक नवीन संधी चालून आली. ज्या वाटेचा कधी विचारही केला नव्हता किंवा मुद्दामहून चार हात लांब राहीले होते, त्या वाटेवर पहिले पाऊल टाकायला मिळाले.
पहिल्या पासूनच मी भित्री ! इतर वेळी कितीही बडबडत असले तरी लोकांसमोर उभे राहून बोलायची वेळ आली की माझी बोलती बंद.
28 वर्षांच्या नोकरीच्या दरम्यान कितीतरी निरोप समारंभ झाले, त्यात मला दिलेलेही निरोप होते....पण मी क्वचितच बोलले. इतकेच काय घरगुती समारंभात सुद्धा कधी मला बोलायला जमले नाही.
महाराष्ट्र मंडळ बेंगलोर येथील गणेशोत्सवात आजी आजोबा क्लबतर्फे मी भाग घेतला.
1961 ते 1970 हे दशक अशी थीम होती.
मी पु. ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकाबद्दल थोडे बोलले. तयारीला वेळ कमी होता. मिस्टरांनी आणि लेकाने मदत केली आणि मी धीटपणे स्टेजवर उभी राहिले. न थरथरता सात आठ मिनिटे बोलले. खूप सुधारणा हवी आहे ह्याची मला कल्पना आहे. सुरुवात तर झाली.....
लिखाण मीच केले अर्थात पुस्तकाचा आधार घेऊन
बघा कसे वाटते ते!
थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे ह्यांचे सुप्रसिद्ध पुस्तक व्यक्ती आणि वल्ली हे ह्याच दशकात प्रकाशित झाले. त्या पुस्तकासंबंधी थोडेसे.....
प्र के अत्रे, शामराव ओक, चि.वि. जोशी, यांच्यासारखे विनोदाचे बादशहा जनतेला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत असताना 1943 साली 'अभिरुचीच्या' अंकात पुरुषोत्तम देशपांडे नावाच्या नवख्या लेखकाचे.......... "अण्णा वडगावकर " हे व्यक्तिचित्र प्रसिध्द झाले. तेव्हा त्या मासिकाचा मर्यादित पण जाणकार वाचक वर्ग चमकून उठला. मराठी विनोदाची पेठ तेजीत असूनही पु. लं चे न्यारे कसब सगळ्यांच्या लक्षात आले. ते कसब तेथेच न थबकता, पुढे अनेक अंगांनी फुलून आले. साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार चोखंदळ रसिकांना थक्क करणारा आणि भारून टाकणारा ठरला. आज इतक्या प्रदीर्घ कालावधी नंतरही पु लं च्या साहित्याचे गारुड मराठी माणसावर कायम आहे. अशी आपुलकी मिळविणारा कलावंत एखादाच.
पुलंनी रुळलेली वाट सोडून जीवनाच्या तऱ्हा तऱ्हा धुंडाळल्या आणि आपल्या वेचक दृष्टीने माणसातील वैविध्य हेरले,विसंगती टिपली आणि ती अश्या तऱ्हेने पेश केली की अवघा महाराष्ट्र खळखळून हसला. करुणेची किनार असलेला जातिवंत विनोद. विसंगती हे मनुष्य स्वभावाचे मर्म आहे हे जाणल्यामुळे त्यांच्या विनोदात गहिरेपण आहे आणि नाट्यही. प्रत्येकात कोठेतरी वल्ली दडलेली असते आणि दोषांच्या राशीत गुणांची खसखस. पु लंनी ह्या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीतून. या वल्लींना व्यक्तित्व आहे.
अश्या या अठरा वल्लीचा संग्रह प्रथम 1962 साली प्रकाशित झाला. त्यापैकी काहींचा हा धावता आढावा!
अण्णा वडगावकर....
पु लं नी टिपलेली पहिली व्यक्ती!
कॉलेज मध्ये संस्कृत शिक्षक असलेल्या अण्णांचे अगदी मार्मिक वर्णन पु लं नी केले आहे. त्यांच्या देहयष्टी पासून ते त्यांच्या चालण्या बोलण्याच्या लकबी पर्यंत आणि शिकविण्याच्या शैलीपासून ते त्यांना वाटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आपुलकी पर्यंत अगदी समर्पक वर्णन नेमक्या शब्दांत केले आहे. "माय गुड फेलोज "असे ते विद्यार्थ्यांना संबोधत. मधून मधून चांगले इंग्रजी शब्द वापरत आणि मुलांना ते लिहून घ्यायला लावत. संस्कृत बरोबर जीवनाचे धडे ही देत असत.
अण्णा शिकविताना अतिशय कडक...पण परीक्षेच्यावेळी पित्याच्या काळजीने प्रत्येक मुलाजवळ जाऊन सांगत की काहीतरी लिही बाबा! काहीच येत नसेल तर रामरक्षेचे चार श्लोक तरी लिहून ठेव. मला निदान तीस मार्क तरी देता आले पाहिजेत.
हेच रागीट मास्तर शाकुंतल शिकविताना शकुंतलेच्या पाठवणीच्या प्रवेशात हळवे होत असत. वडगावकरांचे अर्ध्या चष्म्याखाली लुकलूकणारे डोळे भरून आलेले असत. पु ल ज्युनियरला असताना अण्णा वडगावकर सेवानिवृत्त झाले. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप दिला. खूप विद्यार्थी जमले होते. मास्तर भाषणासाठी उभे राहिले पण गहिवरून आल्यामुळे "माय गुड फेलोज " एव्हढे बोलून ते खाली बसले.
इतकी वर्षे सतत बोलणारा माणूस निःशब्द होतो हे वाचून नकळत आपलेही डोळे पाणावतात.
ह्या वल्लीला रसिकांची पसंती मिळाल्यावर,
पु लं नी सखाराम गटणे, चितळे मास्तर, अंतू बरवा, पेस्तनजी,नामु परीट, अश्या व्यक्ती रेखाटल्या. शाळकरी मुला पासून ते अगदी वयस्क व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि आपल्यासाठी मनोरंजनाचा खजिना तयार केला. ह्या व्यक्ती वाचताना असे वाटते की ह्या इथेच आपल्या आसपास कुठे वावरत आहेत. पु लं नी जरी ह्या व्यक्तिरेखा विनोदी अंगांनी लिहिलेल्या असल्यातरी त्यातील कारुण्य ही टिपले आहे त्यामुळे ह्या सगळ्या वल्ली मनाला भिडल्या आणि आपल्याच होऊन गेल्या.
सखाराम गटणे
एक साहित्य वेडा नवयुवक. त्याची साहित्यिक ओढ, साहित्यिकांविषयी वाटणारी आत्मीयता, लेखकांशी भेट व्हावी म्हणून केलेले प्रयत्न, स्वाक्षरी मिळविण्यासाठी केलेला आटापिटा ह्याचे वर्णन पु लं नी इतके हुबेहूब केले आहे की वाचताना, आपणही कधी तरी हे सगळे केले आहे ह्याचा भास होतो. तर असा एखादा सखाराम जवळपास वावरताना दिसतो. आता सुद्धा गटण्याचे साहित्य प्रेम ऐकता ऐकता पुस्तकांनी भरलेली कपाटे, पु लं चा फोटो आणि त्यांनी दिलेला संदेश "साहित्याशी एकनिष्ठ रहा" सहज डोळ्यासमोर येतो.
अंतू बरवा वाचताना फक्त रत्नागिरीच नाही तर संपूर्ण कोकणच डोळ्यासमोर येते. त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती समजते. आपलेपणा, निस्वार्थी प्रेम ह्याची अनुभूती येते.
नामु परीट वाचताना वाटते अरे आपला धोबी पु लं ना कुठे भेटला? परोपकारी गंपू तर आपल्या आजूबाजूलाच वावरताना दिसतो.
पण सगळ्यात भाव खाऊन गेली ती व्यक्ती आणि वल्ली म्हणजे नारायण.
आजच्या काळात सुद्धा नारायण अस्तित्वात आहे. पूर्वी लग्न करण्याची पद्धत आणि हल्लीची पद्धत ह्यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. सगळे बदललेले आहे, बदललेली नाही ती नारायणाची जागा आणि भूमिका. आजही प्रत्येक लग्नात नारायण असतोसच. कार्य योग्य रीतीने, वाजवी खर्चात उत्तम पार पडावे म्हणून नारायण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटत असतो. अगदी लग्न ठरल्या पासून ते वरात निघेपर्यंत... त्याला उसंत नसते. त्याचा वक्तशीरपणा, हजर जबाबीवृत्ती,प्रसंगानुरूप वागणे,त्याची लगबग,धडपड ह्याचे वर्णन पु लं नी विनोदी शैलीत पण मनाला भावणारे, भिडणारे केले आहे......पण ह्या व्यक्तीरेखेचा शेवट तर काळजाचा ठाव घेणारा.... ऐकू या त्यांच्याच आवाजात.
यु ट्यूब वरील नारायण कथा कथनाचा शेवटचा भाग पु लं च्या आवाजात ऐकविला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
#Smitanubhav 71
Comments
Post a Comment