स्मितानुभव #75 लाल बहादूर शास्त्री

आज 2 ऑक्टोबर! गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती. 🙏🙏🙏

आज मी लहानपणी वाचलेली.... लालबहादूर शास्त्रींच्या बालपणातील गोष्ट सांगावीशी वाटते आहे. ती गोष्ट माझ्या मनात खोलवर रुतली आहे की इतक्या वर्षांनी मी विसरलेली नाही. गोष्ट कितपत खरी आहे ते मला माहीत नाही,पण शास्त्रींजी बद्दलच्या ज्या गोष्टी इतिहासात शिकल्या आहेत, ऐकल्या आहेत त्या वरून ही घटना खरी असावी असे वाटते.

लाल बहादूर दीड वर्षांचे असतानाच ते पोरके झाले. एकदा मित्रांसोबत बागेत खेळत असताना मुलांची मस्ती सुरू झाली. तेवढ्यात रखवालदार तेथे आला. सगळी मुले पळून गेली पण दोन मुलांना रखवालदाराने पकडले. त्यापैकी एक होते लाल बहादूर! दुसरा मुलगा गयावया करून म्हणू लागला,"आम्हाला जाऊ दे. ह्याला तर वडीलही नाही आहेत. घरचे खूप रागावतील."
त्यावर रखवालदार म्हणाला,"मग ह्या मुलाने तर जास्त जबाबदारीने वागले पाहिजे."

आणि तेव्हा पासूनच जबाबदारीने वागणे सुरू झाले. त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. त्याचे बीज ह्या घटनेत रुजले असावे असे मला वाटते. रेल्वेने प्रवास, प्रवासात देखील काम करत रहाणे आणि रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणे ह्या सगळ्या घटनांवरून त्यांच्या उच्च विचारसरणीची साक्ष पटते.
माझ्या एका सहकाऱ्याकडून असे समजले की लाल बहादूर शास्त्रींच्या आवाहनामुळे आठवड्यातील एक दिवस रात्री कोणीही भात शिजवत नसतं अगदी हॉटेल आणि खानावळीत सुद्धा. बहुदा युद्धाच्या वेळी असावे. अन्न बचत व्हावी म्हणून त्यांनी असे आवाहन केले होते.

आपले दुर्दैव की असा लोकोत्तर नेता आपल्याला फार कमी काळ लाभला.
"जय जवान जय किसान" हा त्यांचा नारा आज खरा होतांना दिसत आहे.

            "मूर्ती लहान पण कीर्ती महान"
                   🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस