स्मितानुभव#9 अंगठ्याचे नख

माझा एक प्रॉब्लेम आहे, मी खूप दमले असेल किंवा एकावेळी अनेक कामे असतील आणि मी त्यांना क्रमवारी देऊ शकले नाही तर माझ्या हातून वस्तू पडू लागतात. डोक्यात खूप गोंधळ होतो आणि मग काहीतरी गडबड होते.
तेव्हा मी वाशीला (नवी मुंबई) रहात होते. मी रोज वाशी ते पनवेल (22 कि.मी)असा प्रवास करायचे.

एके दिवशी संध्याकाळी घरी परत आल्यावर लक्षात आले की बरीच  कामे पेंडिंग आहेत. झाला गोंधळ, त्या नादात सोफ्याची खुर्ची सरकवायला गेले आणि ती आली माझ्या पायाच्या अंगठ्यावर!
मरणप्राय कळ गेली डोक्यात आणि नख निघाल्याची जाणीव झाली. ह्या आधी दोन तीनदा माझ्या अंगठ्याचे नख दुखावलेले होते, त्यामुळे काय झाले असेल ह्याची कल्पना येऊन मी गच्च डोळे मिटून घेतले आणि स्नेहाला हाक मारली.
माझा अंगठा बघून ती म्हणाली की डॉक्टरकडे जाऊ या. मी अजून काय झाले ते बघितलेच नव्हते मी तिला  म्हणाले की नको तूच डेटॉल लाव. ती म्हणाली की आई घरी काहीही करणं अशक्य आहे आपण डॉक्टर कडे जाऊया. म्हणून मी जरा डोळे किलकिले करून बघितले, प्रकरण जरा गंभीरच वाटले. हर्षद घरी नव्हता त्याला फोन करून डॉक्टर कडेच यायला सांगितले.

कसेबसे चालत डॉक्टर कडे पोहचले. दवाखान्यात गर्दी होती, पाय पण ठणकत होता. माझी अवस्था पाहून सगळे म्हणाले तुम्ही आधी आत जा. तितक्यात हर्षद पण आला.
आम्ही आत गेलो. डॉक्टर डोळे फाडून अंगठयाकडे बघत राहीले.
डॉक्टर म्हणाले की नख इतके निघाले आहे की मी हाताने काढू शकतो, जरा अजून सहन करा.
मी म्हटले की आधीच खूप दुखले आहे तुम्ही इंजेक्शनच द्या. आमचे बोलणे ऐकून हर्षदला चक्कर यायला लागली. त्याच्या मानाने स्नेहा जरा धीट आहे.
उपचार करता करता डॉक्टरांनी माझी माहिती विचारायला सुरुवात केली (हे नेहमीचे डॉ नव्हते)
" तुम्ही नक्की असे काय केले की इतके नख निघाले, मुळापासून निघाले आहे. घरीच असता की working आहात?"
मी सांगितले की मी पनवेलला बँकेत आहे येऊन जाऊन करते.
डॉक्टर म्हणाले "तात्पुरती बदली मिळेल का?रोज जाऊन येऊन करणे शक्य नाही."
मनातल्या मनात मी हसत होते, नख तर निघाले आहे इतके काय डॉक्टर टेन्शन घेताहेत, फारतर एक दोन दिवस रजा घेऊ.
बँडेज करून औषधे घेऊन घरी आलो. पाय बधिर असल्यामुळे विशेष काही त्रास वाटला नाही. जसा जसा इंजेक्शनचा इफेक्ट कमी होऊ लागला तसा दुःख वाटू लागले. तरी ओके होते. सकाळी उठून उभे राहिल्यावर डॉक्टर का असे म्हणाले ते कळले.
प्रचंड वेदना होत होत्या, उभे राहणे अशक्य होते. मी मटकन खाली बसले. तसे सारेच अवयव म्हत्वाचेच आहेत, पण दुखापत झाली की त्याचे महत्त्व लक्षात येते. त्या दिवशी मला नखांची किंमत कळली.

"नखांची सुध्दा सर नाही" हा वाक्प्रचार का पडला असेल तेही कळले.

जखम भरायला दोन तीन आठवडे लागले आणि पूर्ण नख यायला सहा महिने लागले.

मी प्रवास ST बसने करत असे. बस मध्ये गर्दीतून चढणे खूप त्रासदायक होते. साडे नऊ च्या सुमारास परेल भोर बस यायची, बहुतेक दिवस मी त्याने जायची कारण त्या बसला गर्दी जरा कमी असायची. रोज बघून बघून कंडक्टरची तोंड ओळख झाली होती. माझी अवस्था बघून म्हणाला की रोज ह्याच बस साठी थांबा,
गर्दीत चढू नका, शेवटी चढा. पाय ठीक होईपर्यंत तो माझी सीट राखून ठेवत होता त्यामुळे मी आरामात बसून जाऊ शकले.
मी तर लाकडी सोफ्याची खुर्ची हलवायला जात नाहीच पण इतर कोणी हालवत असेल तरी कल्पनेनेच माझ्या डोक्यात कळ जाते. इतके ते भयंकर होते प्रकरण......

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस