स्मितानुभव #70 मी आणि उकडीचे मोदक
माहेरी आमचे एकत्र कुटुंब! आई आणि आजी दोघीही सुगरण आणि निगुतिने स्वयंपाक करणाऱ्या! त्यामुळे हाताखाली थोडीफार लुडबुड चालायची... पण जास्त लक्ष बाहेर, केलं केलं नाही नाही. पंधरा सोळा वर्षांची झाल्यावर मात्र आई जरा कडक झाली.... मुलीच्या जातीला वगैरे वगैरे
तरी मी विशेष लक्ष देत नसे. जात्याच हुशार(?) असल्याने थिअरी सगळी चटकन लक्षात यायची.. ..प्रॅक्टिकल करे पर्यंत उत्साह संपायचा आणि......आई आता पुढच्यावेळी.... असे म्हणून मी बाहेर पळ काढायची. ह्यामुळे झाले असे की लग्न होईपर्यंत मी एकदाही एकही उकडीचा मोदक केला नाही. कधी कोणी विचारले की उकडीचा मोदक येतो का? की मी जोरात हो SSS म्हणायची पुढे हळूच ...."खाता "....विचारणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने समजून घ्यावे.
लग्न झाल्यावर सासरी सासूबाई, आजे सासूबाई शिवाय मोठया जाऊबाई सुद्धा होत्या. त्यातून तिकडे कडक सोवळे. नैवेद्यासाठीचा स्वयंपाक सासूबाई करायच्या. मला सोवळे माहीतही नव्हते आणि जमतही नव्हते.
पहिल्यावर्षी सगळेच नवीन असल्याने मला न येणारे मोदक कोणी विचारात घेतले नाहीत. पुढच्या वर्षी मुले खूपच लहान होती म्हणून अजून माहेरीच होते. दोन वर्षे अशीच निभावली. मोदक येत नाहीत ह्यांचे मला काहीही वाटत नसे. खायला मिळताहेत ना ? बस्स! आणखी दोन तीन वर्षांनी सासूबाई म्हणाल्या की अग करून तरी बघ, जमेल हळूहळू. मग मी पहिल्यांदा उकडीला हात लावला.....आणि मोदक सदृश्य लाडू बनविला. मला पक्के माहीत होते की हा माझा प्रांत नाही....तरी मी ठरविले की आता शिकायचेच....
त्या दिशेने वाटचाल सुरू केली. थिअरी माहीत होती, त्यामुळे प्रॅक्टिकल सोपे झाले. आई,सासूबाई कसे मोदक करतात त्याचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्याकडून क्लुप्ती शिकून घेतली आणि अथक परिश्रमानंतर.......
लाडू मोदकाकडे वाटचाल करू लागला आणि आता मी बरे मोदक करू लागले आहे.
स्पष्ट सांगायचे तर स्वयंपाकघर आणि मी ह्यात फार सख्य नाही. पण पारंपरिक पदार्थ मुलांना कळावेत, त्यांना सगळे खायला मिळावेत म्हणून आवर्जून करते. आवडीने खातात म्हणजे जमतात बहुतेक🤣🤣🤣
#smitanubhav70
Comments
Post a Comment