स्मितानुभव#7 हरवलेली स्नेहा

मे 1994 ची गोष्ट आहे.

सुट्टीत मुले पुण्याला आईकडेच असायची. मी आणि माझी धाकटी बहीण नीता दोघीही माहेरी आलो होतो. सुट्टीत आईकडे गोकुळच असायचे. मावस भावंडं पण आलेली होती.
एक दिवस संध्याकाळी, आम्ही दोघी बहिणी मुलांना घेऊन फिरायला बाहेर पडलो. छोटी मोठी खरेदी करायची होती म्हणून बाजीराव रोडवर निघालो होतो. वाटेत माझे भाऊ (तिघे)भेटले, ते पण आमच्या बरोबर निघाले. इतकावेळ माझा हात धरून चालणारी हर्षद स्नेहा खेळ करू लागली, कधी माझा तर कधी भावाचा हात असे चालले होते.
बाजीराव रोडवर " खेळीया " नावाचे दुकान आहे, पत्ते घ्यायला म्हणून त्या दुकानात शिरलो.
दुकानातून बाहेर पडताना स्नेहा म्हणाली " मला काहीतरी पाहिजे " मी म्हटले की नंतर बघू आता जाऊ या. खाऊवाले पाटणकर दुकानातून काहीतरी घेऊन आम्ही माघारी फिरलो.
नवा विष्णू पाशी आल्यावर मी भावांना म्हटले की पाकिटावर लक्ष ठेवा. इथे पाकीटमार असतात.
तेवढ्यात हर्षद ओरडला "स्नेहा कुठे आहे?"
बाप रे ! प्रत्येकाला वाटले तिने दुसऱ्याचा हात धरला आहे आणि स्नेहा आमच्या जवळ नव्हती.
हर्षद खूप चिडला होता, म्हणाला" पाकिटे सांभाळायला सांगते, माझ्या बहिणीला कोण बघणार?" आम्हाला तर ब्रह्मांड आठवले होते.
एक क्षण काहीच सुचेना.
नीट विचार केल्यावर लक्षात आले खेळण्याच्या दुकाना पर्यंत ती आमच्या बरोबर नक्की होती. त्या दोन्ही दुकानांत 150 फुटाचे अंतर होते आणि आम्ही साधारण 300 फूट मागे परत आलो होतो.
तेव्हढ्या भागात शोधायला हवे होते. नीताच्या कडेवर तिची छोटी लेक होती म्हणून तिला आणि हर्षदला मध्ये उभे केले. मी घराच्या दिशेला आणि भाऊ लक्ष्मीरोडच्या दिशेला शोधत निघालो.
अंतर जेमतेम 500 मीटर असेल, पण जगातले सगळे वाईटच विचार मनात येत होते, लेकीच्या काळजीने जीव व्याकुळ झाला होता.
कशीबशी घराशी पोहचले. आजी गॅलरीत होती आणि रडताना दिसत होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ओरडूनच विचारले की स्नेहा आली आहे का? तिने कसेबसे "हो" म्हटले आणि परत रडायला लागली.
झाले होते असे की खेळण्याच्या दुकानांतून ती बाहेर आलीच नाही, तिथेच रेंगाळली. जरावेळाने तिच्या लक्ष्यात आले की आम्ही आसपास नाही. ती दुकानाबाहेर येऊन इकडे तिकडे बघू लागली. एका बाईने काय झाले म्हणून विचारले. ही त्यांना म्हणाली की माझी आई आणि बाकीचे सगळे हरवले आहेत. बाई चांगल्या होत्या त्यांनी विचारले की तुला घराचा पत्ता माहीत आहे का? स्नेहाने सांगितले "पत्ता माहीत नाही घर माहीत आहे, चला दाखविते."
"ती " हरवली आहे हे त्या बालजीवाच्या गावीच नव्हते.
त्या माऊलीने  स्नेहाला सुखरूप घरी सोडले, माझ्या आईला नीट सांगितले काय झाले ते. भांभावलेल्या आईला म्हणाली की आधी जा आणि तिच्या आईला सांगा की तिची लेक सुखरूप आहे म्हणून.

सगळे कुटूंब आनंदाश्रुत चिंब भिजले होते.

जर.....तर ची कल्पना आज सुद्धा करवत नाही.

          || दिव्यत्वाची जेथ प्रचिती ||
          || तेथे कर माझे जुळती ||
          🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#स्मितानुभव 7 पुरवणी

खरं तर मी  प्रत्येकाच्या प्रतिक्रिया खूप संक्षिप्त स्वरूपात दिल्या आहेत. पोस्ट वरच्या प्रतिक्रिया वाचून त्याही सांगव्याश्या वाटतात.

हर्षद :"स्नेहा मिळेपर्यंत मी पोलीस स्टेशन मधून घरी येणार नाही,तिथेच रहाणार."

माझे भाऊ उलट दिशेला गेल्यामुळे स्नेहा सापडलेली त्यांना नंतर कळले,ते कळे पर्यंत
" ताईला कुठल्या तोंडाने सांगायचे,स्नेहा मिळाली नाही म्हणून😢"

माझी आजी स्नेहा सापडल्यावर रडत होती,मी विचारले की तू का रडते आहेस? ती हरवलेली सुद्धा तुला माहीत नाही.
आजी: " सापडली म्हणून काय झाले? सापडली नसती तर ".... म्हणून परत रडायला लागली.

माझे आणि माझ्या बहिणीचे विचार शब्दबद्ध करणे  अशक्यच

माझी आई नेहमीच समतोल ....भावाला पाठवून पेढे आणले आणि देवापुढे ठेवले आणि आभार मानले.

हे सगळे झाले तेव्हा माझे वडील घरी नव्हते,घरी आल्यावर आईने त्यांना पेढा दिला आणि झाला प्रसंग त्यांना सांगितला.
वडील डोक्याला हात लावून: "तोच विचार करतो आहे,सगळे रडलेले दिसत आहेत आणि तरीही तू पेढे देते आहेस!"

स्नेहा : "इतके मोठे झाले तरी हरवतात आणि वर रडतात "🤣🤣🤣

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस