स्मितानुभव #69 संकेश्वर गणपती
गणपतीचे दिवस आले की मला आमची दरवर्षीची संकेश्वर ट्रिप आठवते. संकेश्वर हे मुंबई बेंगलोर हायवे वर निपाणी आणि बेळगावच्या मध्ये आहे. तिकडे जायचे यायचे ते ST बसनेच! ही गोष्ट आहे 1987 पासूनची.....
सगळ्यांचीच टंचाई होती तेव्हा. पैसे, रजा, सोयी, सुविधा सगळेच लिमिटेड. सासू सासरे संकेश्वरला रहात असल्याने तसे वर्षांत तीनदा तरी जाणे व्हायचे. बाकीवेळी सुट्टी बघून सोयीने, त्यातल्यात्यात कमी गर्दीचा दिवस बघून जात असू. पण गणपतीत पर्याय नसायचा. सगळेच आपापल्या गावी जायचे त्यामुळे गाड्यांना खूप गर्दी असायची. पुणे संकेश्वर प्रवास तेव्हा आठ नऊ तासांचा होता. रिझर्वेशन शिवाय जाणे शक्यच नसायचे. संकेश्वरचे तिकीट फक्त दोन गाड्यांचे मिळायचे. रात्री 10 ची हुबळी किंवा 11 वाजताची बेळगाव, बरोबर एक महिना आधी जावे लागायचे. मिस्टर तेव्हा लोणावळ्याला बँकेत होते. रिझर्वेशनसाठी पुणे रेल्वेस्टेशनला जावे लागायचे. इतके करून सुद्धा बऱ्याचदा 11 च्या गाडीचे तिकीट मिळायचे.
मुले खूपच लहान असल्याने मला सकाळी साडेचारला उठायला लागायचे. त्यांचे सगळे आवरून, त्यांना पाळणाघरात सोडून, आमचे डबे बनवून, घरातील बाकी कामे आटपून मला साडे आठला घरातून निघावे लागायचे. बऱ्याचदा हरतालिकेच्या दिवशी रात्रीच्या गाडीने आम्ही निघायचो. पावसाळ्याचे दिवस, दोन दोन लहान मुले असल्याने सामान भरपूर ....आणि गाडीला गर्दीही भरपूर. रिझर्वेशन असूनही गाडीत चढताना नाकात दम यायचा. मुले चेंगरली जायची. मुलांना तिकीट लागत नसूनसुद्धा आम्ही तीन तिकिटे काढायचो, म्हणजे पूर्ण बाक मिळेल आणि जाणे सुसह्य होईल. पण असे कधीही झाले नाही, कोणीतरी गरजू समोर यायचे आणि आम्हाला सीट द्यावी लागायची. झोपेत मुले खाली घसरायची, ब्रेक लागल्यावर आपटायची, घरी गेल्यावर काळे निळे झालेले दिसायचे, मधे जागी झाली की
बास आता! उतरू या! म्हणायची. दिवसभर ऑफिस मध्ये बसून.... परत बसमध्ये बसून पाठ भरून यायची. बरं थोडावेळ मुलांना दुसऱ्याकडे द्यावे तर दोघांच्याही जवळ एक पिलू असायचे.
बस वेळेत पोहचली तर आठ साडे आठ पर्यंत घरी पोहचत असू.
मग दिवस कसा संपायचा ते कळायचे नाही. गणपती आणणे, पूजा ,आरती, नैवेद्य, सोवळ्यातला स्वयंपाक, सगळ्यांनी मिळून जेवणे, उकडीचे मोदक, साजूक तुपाची धार, एकमेकांना आग्रह ...मस्त मज्जा यायची. प्रवासाचा क्षीण जाणवायचा नाही. परत संध्याकाळी आरती नैवेद्य आणि रात्रीसाठी वेगळा मेनू. रात्री साडेदहाला पाठ जमिनीला टेकायची ! तेव्हा जाणवायचे की जवळजवळ 40 तासांनी आपण आडवे झालो आहोत.
दरवर्षी घरी सहस्रावर्तनाचा कार्यक्रम असायचा, अजूनही असतो. जवळपास 50/ 60माणसं जेवायला असायची. आधी गुरुजी, मग पाहुणे, मग घरातले पुरुष आणि शेवटी बायका अशी जेवणे व्हायची. संकेश्वर तसे खेडेगाव असल्याने पंगत वाढायला लागायची. शेणाने सारवायला लागायचे.( जे मी एकदाही केले नाही.) मीच एकटी शहरातील, ह्या गोष्टी विशेष माहिती नसलेली. जाम त्रेधातिरपीट उडायची. पण सगळे झाल्यावर खूप समाधान वाटायचे.
वार्षिक कार्यक्रम छान पार पडला म्हणून सासू सासरे ही खूष व्हायचे.
हा कार्यक्रम झाला की आम्हाला परतीचे वेध लागायचे. येणे परवडले पण जाणे नको....
संकेश्वरहून कुठलीच बस सुटत नसे, त्यामुळे कोल्हापूरला जाऊन रिझर्वेशन करावे लागायचे. कोल्हापूर-पुणे खूप बस होत्या, प्रश्न असायचा तो संकेश्वरहून कोल्हापूरला जाण्याचा. बेळगांवहूनच बस भरून यायच्या. सामान, मुले आणि आम्ही दोघे सुखरूप बस मध्ये चढणे गड सर करण्यासारखे असायचे.
एकदा सामान आणि हर्षदला घेऊन यजमान चढले, इतकी गर्दी होती की कंडक्टरने दरवाजा कसाबसा बंद केला आणि डबल बेल मारली. बस सुटली. माझ्याकडेवर असलेल्या स्नेहाने रडायला सुरवात केली. हर्षद...बाबा असे ती ओरडत होती. 'आता काय करायचे' ह्या संभ्रमात मी आणि सासरे पडलो. इतक्यात कंडक्टर बोलवायला आला. माझ्याजवळचे सामान उचलून बसकडे चालू लागला.
आम्ही खाली राहिलेले पाहून हर्षद "स्नेहाSSS" म्हणून इतक्या जोरात ओरडला की ड्रायव्हरने बस क्षणांत थांबविली. सगळे काय झाले? काय झाले ? म्हणून विचारू लागले. यजमानांनी सांगितले की ह्याची बहीण आणि आई खाली राहिले आहेत म्हणून हा रडतो आहे.
कोल्हापूर पर्यंतचा प्रवास मी दोन्ही मुलांना मांडीवर घेऊन, कंडक्टर सीटवर बसून केला. अशी बस सोडली म्हणून कंडक्टरला वाईट वाटत होते आणि मी त्यांच्या जागेवर बसल्यामुळे मला!
हळूहळू सगळेच बदलले. मुले मोठी झाली. आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. प्रायव्हेट आराम गाड्या सुरू झाल्या....आणि तो थ्रिलिंग प्रवास संपला!
#smitanubhav69
Comments
Post a Comment