स्मितानुभव #68 शिक्षक दिन
आज शिक्षक दिन! आई वडील,शाळेतील गुरुजन, घरातील जेष्ठ व्यक्ती, ऑफिसमधील वरिष्ठ, सहकारी ह्या सगळ्यांना मनापासून अभिवादन.
ह्या व्यतिरिक्त सभोवताली वावरणाऱ्या माणसांकडूनही आपण काही ना काही शिकतच असतो. आज अशा काही मित्र मैत्रिणींबद्दल लिहावेसे वाटत आहे. यादी तशी खूप मोठी आहे....पण आज सुरवात करते. प्रसंग येईल त्याप्रमाणे पुढे लिहितच राहीन.
मेधा कुलकर्णी माझी शाळेपासूनची मैत्रीण! अतिशय जिद्दी! दैवीलीला मान्य करून जिद्दीने स्वतःच्या पायावर उभी राहिली. बँकेतून स्वेच्छा- निवृत्ती घेऊन आता ' मेक माय ड्रीम फौंडेशन' ही संस्था स्थापन करून अनेक दिव्यांग मुलांची आधारस्तंभ झाली आहे. तिची तळमळ पाहून ऊर भरून येतो. जिद्दीने माणूस काहीही करू शकतो हेच मी तिच्याकडून शिकले.
बँकेतील एक सहकारी. मुंबईला लोकलमध्ये चढताना पडले. ते मुंबईला एकटेच रहात होते. सहकाऱ्यांनी मदत केली. ऑपरेशन झाले. गावाहून त्यांची बायको मुले आली. थोडयावेळाने त्यांना समजले की सरांनी दोन्ही पाय गमावले आहेत. पण कोणीच धीर सोडला नाही. त्रागा केला नाही. परिस्थितीचा स्वीकार केला. जयपूर फूट लावून काही महिन्यांतच, पहिल्या उत्साहाने सर रुजू झाले. धीरोदात्तपणा शिकले त्यांच्याकडून.
मानसी बापट...नवीन नवीन ओळख झाली आहे. बाकीचे पैलू अजून उलगडायचे आहेत. तिचे नेटवर्क जबरदस्त आहे, तसेच तिची स्मरणशक्ती. छोट्याशा कृतीने दुसऱ्याला मोठा आनंद देते. साहित्य स्नेहची मिटिंग होती. ही सगळ्यांसाठी कॅडबरी घेऊन आली आणि म्हणाली "कुछ मिठा हो जाय, नुकताच फ्रेंडशिप डे झाला आहे ना!"
आमच्या ग्रुपमध्ये एक निवृत्त शिक्षिका आहेत. आज त्यांना फोन करून म्हणाली ," शिक्षक दिनाच्या शुभेच्छा" भरूनच आले त्यांना! समोरच्याला पट्कन आपलेसे करायची कला मी तिच्याकडून शिकत आहे.
गुरु बद्दल लिहू तितके थोडेच आहे. सगळ्यांना शतशः प्रणाम!
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥
देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥
🙏🙏🙏🙏🙏🙏
#smitanubhav 68
Comments
Post a Comment