स्मितानुभव #67   भुवनेश्वरी मॅडम

कधी ऋणानुबंध कधी पूर्व पुण्याई
सहज जुळतात भावबंध होते मैत्री
अभिमानाने मिरवावी अशी ही श्रीमंती
भुवनेश्वरीमॅम माझी गुरू माझी सखी

माझी आणि भुवनेश्वरी मॅडमची ओळख 1991 पासूनची. त्यांच्या कर्तृत्वाची,तडजोडीची,जिद्दीची मी जवळची साक्षीदार आहे. ऑफिसर म्हणून तर त्या उत्तम आहेतच पण तितक्याच उत्तम त्या पत्नी आणि आई म्हणून आहेत. त्यांचा स्केल वन ऑफिसर ते DGM  पर्यंतचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

मॅडम तामिळनाडूच्या. लग्न करून पुण्यात आल्या.
मराठीचा गंध नाही. सगळेच  नवीन. त्यात पोस्टिंग झाले चिंचवडला. वाहतुकीची सोय नाही. संपर्काचे साधन नाही. देवनागरी वाचता येत नाही. मराठी आणि हिंदी बोलता येत नाही. सासरी सगळे नवीन. घरी आणि बाहेर विशेष कोणाशी ओळख नाही.( ह्या आम्हाला वाटलेल्या अडचणी आहेत. त्यांच्या त्या गावीच नव्हत्या.) अश्या परिस्थितीत हसतमुखाने त्यांनी चिंचवड शाखेत प्रवेश केला आणि बघता बघता शाखेच्या आधारस्तंभ झाल्या. तोडके मोडके हिंदी आणि मराठी बोलू लागल्या.

मॅडम खूपच हुशार ! MSc. In Maths  Gold Medalist. बुद्धिमत्तेचे तेज त्यांच्या चेहऱ्यावरच दिसते. पण वागण्यात, बोलण्यात किंवा शिकविण्यात कुठेही शिष्ठपणा नाही. काम करण्यात आणि करून घेण्यातही तरबेज.
1991 साली त्या पौड रोड ते चिंचवड असा 19 किलोमीटर प्रवास करत होत्या. बस, रिक्षा, ट्रेन कसे काय मिळेल ते. कधी कुरकुर नाही की त्रागा नाही आणि ऑफिसच्या कामात तडजोड नाही. अगदी प्रेग्नंट असताना सुद्धा ह्यात काही फरक पडला नव्हता. उत्साहाचा खळखळता झरा.

बदली हा तर बँकिंग जॉबचा आत्माच ! जेमतेम दोन वर्षे त्यांनी पुण्यात काम केले. स्केल 2 चे प्रमोशन मिळाले आणि रूरल टर्म पूर्ण करण्यासाठी त्यांची बदली चिखलीला झाली. पौडरोड ते चिखली असा प्रवास सुरु झाला. फरक इतकाच होता की 10 किलोमीटर प्रवास वाढला होता आणि घरी दोन बाळे होती... स्मृती आणि अनिश. उत्साहात काहीही कमी नव्हते. शाखेची पूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत होत्या. घरी गेल्यावर घरच्या जबाबदाऱ्या. त्यांच्या यजमानांना कामासाठी सकाळी लवकर जावे लागत असे. ह्या पहाटे चार साडेचार वाजता उठून सडा रांगोळी करत असत. नोकरी करते, लांब जाते म्हणून कुठलीच परंपरा त्यांनी कधी मोडली नाही. सगळ्याच गोष्टी मनापासून करत. त्यांच्या घरच्या उत्तम पाहुणचाराचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. घरातील कामात आणि स्वयंपाकात पण तरबेज.

त्यांची आधीची सगळी सर्व्हिस मोठ्या शहरांमध्ये झाली होती. शहरी शाखा आणि खेड्यातील शाखा ह्यातील कामात खूप फरक असतो. मॅडम चिखलीला जॉईन झाल्या तेव्हा त्यांना कामाचा काहीही अंदाज नव्हता आणि साधरण महिन्यानंतर त्यांना माहीत नाही असे काही नव्हते. ह्या नंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख चढतच गेला.

घरातील पुरुषाला बदली झाल्यावर बाहेर पडणे सहज शक्य असते, पण बाईला दहा वेळा विचार करावा लागतो. हे ही आव्हान मॅडमनी सहज पेलले. मुले आणि यजमान पुण्यात राहीले आणि मॅडम मुंबईला. Up- down करत होत्या. शनिवारी अर्धा दिवस काम करून पुण्याला जायचे आणि सोमवारी पहाटे एशियाडने मुंबईला जायचे. तीन वर्षे त्यांनी अशी काढली. मॅडम तर ग्रेट आहेतच त्याच बरोबर त्यांचे यजमान मि. व्यंकटरमण आणि मुले स्मृती अनिश सुद्धा. त्याच्या सक्रिय पाठींब्यामुळेच हे सगळे शक्य झाले. Made for each other. स्मृती आता डॉक्टर आहे आणि अनिश उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी आहे.

ऑफिसर आणि मैत्री ह्याची गल्लत त्यांनी कधीही
होऊ दिली नाही. जेव्हा ऑफिसर म्हणून खुर्चीवर बसायच्या तेव्हा कुठलीही तडजोड नाही. काम म्हणजे काम. कोणत्याही स्टाफला अडचण आली, काम खूप जास्त आले की ह्या सरसावून पुढे येणार, फटाफट मदत करून मोकळ्या. कोणालाही कामाचे टेन्शन येऊच द्यायच्या नाहीत. Perfect officer आणि सध्या  Perfect Executive . त्यांच्या बरोबर काम करण्यात खूप समाधान मिळायचे. मी ऑफिसर झाल्यावर त्यांचाच आदर्श ठेवला होता.
ऑफिस संपले की मैत्री. काहीही करायला तयार.
मधला काही काळ आम्ही दोघीही मुंबईत होतो. माझी आई पुण्याला सिरीयस होती. मला तिला सोडून मुंबईला जाणे शक्य नव्हते आणि मुलांचा पेपर होता. मी हक्काने फोन करून मॅडमना त्यांच्याबरोबर मुलांना मुंबईला घेऊन जायला सांगितले. क्षणात उत्तर आले ,Oh..., yes... sure.

घरातीलअडचणी, मुलांचे आजारपण, नोकरीतील अडथळे, खडतर प्रवास ह्या सगळ्याला मॅडमनी धीराने तोंड दिले. आज मला मुलांना सांभाळणाऱ्या आजींचा पण आदराने उल्लेख करावासा वाटतो. आजी मराठी... मॅडमच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या घरच्याच होऊन गेल्या.

एकमेकांच्या साथीने आयुष्य समृद्ध , यशस्वी आणि समाधानी करता येते हा आदर्श त्यांनी पुढील पिढीला घालून दिला आहेत.

आज 35 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त होत आहेत. आरोग्यपूर्ण आणि निवांत दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

I am very lucky to have you in my life. You are my mentor, guide and very good friend. I also take this opportunity to appreciate Mr.Venkataraman,Smruti and Anish for their active support. On the occasion of your retirement I pray God to shower blessings, good health and let all your remaining dreams come true. Thank you very much for everything.

#smitanubhav 67

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस