स्मितानुभव #66 पहिला विमान प्रवास
तसं बघायला गेले तर माझा स्वभाव अल्पसंतुष्ट. फार मोठ्या गोष्टी कधी हव्यात किंवा कराव्यात हे माझ्या ध्यानीमनी नसते. वडील सेन्ट्रल गव्हर्नमेंट मध्ये असल्याने आम्ही चार वर्षात एकदा LFC घेऊन फिरून यायचो. सगळे मिळून जात होतो त्यामुळे तो आनंद अवर्णनीयच. तेव्हा दादा ते कसे काय सगळे मॅनेज करत होते देवच जाणे. काहीच सोयी सुविधा नव्हत्या. रेल्वेच्या प्रथम वर्ग विश्रामगृहात राहिल्याचे आठवते. मला रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. त्यातून तो प्रथम श्रेणीतून.... मस्त खिडकीतून बाहेर बघत बसायचे. मध्ये मध्ये ये जा नाही की दुसरा कुठलाही त्रास नाही. अगदी राजा असल्याचे फिलिंग यायचे.
बँकेत नोकरी लागली आणि LFC चालू राहिली.
मुले लहान असल्याने फार लांब कुठे जाऊ शकत नव्हतो. मग मिस्टरांनी टुम काढली की तसेही आपण दिवाळीला घरी संकेश्वरला जातोच तेच क्लेम करू, परत येताना विमानाने येऊ. ही गोष्ट 1989 ची. एक तर संकेश्वरला बसने जाणेच मोठे कठीण काम होते.....आणि आता हे विमानाचे.... एकदा डोक्यात यायचा अवकाश की शोधाशोध सुरू ! कसे आणि कुठून जाऊ शकतो?
तेव्हा भारतातल्या भारतात इंडीयन एअरलाईनस् ची "वायूदूत" ही सेवा सुरू होती. मुंबई...कोल्हापूर....बेळगाव...मुंबई असे दिवसाला एक उड्डाण होते.आम्हाला संकेश्वरहून कोल्हापूरला तरी जायला पाहिजे होते नाहीतर बेळगावला! तिकिटांची चौकशी केली तेव्हा असे लक्षात आले की कोल्हापूर ते मुंबई हे तिकीट बेळगाव ते मुंबई पेक्षा कमी आहे. म्हणजे आम्ही कोल्हापूरहुन निघालो तर कमी पैशात जास्त वेळ विमानात बसणार होतो आणि एक जास्तीचे उड्डाण आणि लँडिंग मिळणार होते. लगेच मध्यम वर्गीय विचार केला आणि कोल्हापूर ते मुंबई तिकीट काढले. माझ्या मोठ्या आत्याचे यजमान एअर इंडिया मध्ये उच्च पदस्थ होते, त्यांच्याकडून बरेच काही ऐकले होते त्यामुळे एकदा जायचे ठरल्यावर उत्सुकता वाटू लागली.
प्रवासाच्या दहा पंधरा दिवस आधी पेपर मध्ये बातमी आली की वायूदूत विमानाचे दार आकाशात असताना अचानक उघडले! हवाईसुंदरीच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
याच्या आधीही अश्या बातम्या आल्या होत्या... पण ...ज्या गावाला जायचेच नाही....त्याची उठाठेव कशाला? म्हणून कधी लक्ष दिले नव्हते.
ही बातमी वाचून मात्र धस्स झाले.
योजल्याप्रमाणे सकाळी लवकर कोल्हापूरला जायला निघालो. कोणी काही बोलले नाही,परंतु घरातले सगळेजण पण मनातून घाबरलेले होते. बुकिंग ऑफिस पर्यंत आम्ही जायचे होते, मग त्यांच्या बसने विमानतळावर नेणार होते. हे सगळे अनुभवायची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे खूप मज्जा येत होती. प्रवासात सहसा न मिळणारी सौजन्याची वागणूक मिळत होती. विमानात बसण्याआधीच आकाशात उडल्यासारखे वाटत होते. विमान चुकेल ह्या भीतीने आम्ही खूप लवकर पोहचलो होतो. कोल्हापूर एअरपोर्ट लांब कुठेतरी होता, अगदी वेळेत तिकडे पोहचलो. आता कळतं आहे की तो किती लहान एअरपोर्ट होता ते. गर्दी काही नव्हतीच कारण त्या विमानाची क्षमताच कमी होती. ( गुगलवर पाहिले 21 सीट्स होत्या, असे लिहिले आहे). उत्सुकतेने सगळे पहात होतो.....आणि बघता बघता विमान येण्याची वेळ झाली. अगदी समोरच विमान land झाले आणि समोर येऊन थांबले.
उत्सुकता शिगेला पोहचली होती. विमानात चढायची वेळ आली तसे हातपाय लटपटू लागले. मुलांना उचलून घट्ट धरून ठेवले. एक एक बातम्या आठवू लागल्या. राम राम म्हणत चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न करत विमानात चढलो. सीट वर स्थानापन्न झालो. हवाई सुंदरीच्या सूचना कान देऊन ऐकल्या. ( वर्गात सुद्धा इतके लक्ष कधी दिले नव्हते.) विमानाची घरघर सुरू झाली. आम्ही श्वास रोखून बसलो. मुलांना पण मुश्किलीने
खुर्चीवर गप्प बसविले....आणि विमानाने आकाशात झेप घेतली. मला काहीच त्रास झाला नाही, मुले तर खूपच मजेत होती. मिस्टरांना मात्र मळमळू लागले.
थोडयावेळाने तर मुले मधल्या जागेत खेळू लागली. वाटले होते तेव्हढे उड्डाण पण आकर्षक नव्हते आणि लँडिंग सुद्धा. मिस्टरांना तर इतका त्रास होऊ लागला की म्हणाले," पैसे देऊन त्रास विकत घेतला. बसच बरी आपली."
सुखरूप सांताक्रूझ विमानतळावर उतरलो. ट्रिप मधील अजून एक साहस बाकी होते. आम्ही एअरपोर्टहून बोरीवलीला मामांकडे लोकलने जाणार होतो. पुणेकरांना लोकलची वाटणारी भीती सर्वश्रुतच आहे. विमानतळावरून टॅक्सीने अंधेरीला आलो. तिकीट काढून प्लॅटफॉर्म वर आलो. समोर एक लोकल उभी होती. लोकलमध्ये पोलीस मामा दारातच उभे होते, त्यांना विचारले की ही लोकल बोरीवलीला जाते का ? ते हो म्हणाले दोन्ही मुले आणि सामान घेऊन आम्ही पट्कन चढलो आणि लोकल सुटली. मनात म्हटले इतके सोपे असते उगाचच घाबरत होतो आपण! लोकल वाटेत कुठेच थांबली नाही. सरळ बोरीवलीलाच उतरलो. आम्हीच शेवटी चढलो होतो त्यामुळे आम्हीच पहिले उतरलो आणि रिक्षाने घरी गेलो.
घरी जाऊन सगळ्यांना हकीगत सांगितली. मामा तर डोके धरूनच बसले आणि म्हणाले " अरे सामान दोन दोन मुले घेऊन तुम्ही विरार फास्ट नी आलात?? " मग त्यांनी त्या बद्दल सांगितले. अज्ञात सुख म्हणतात ना...तसेच आमचे झाले होते. पुढे मुंबईला राहिल्या गेल्यावर विरार फास्टची दाहकता समजली.
अश्या तऱ्हेने एका दिवशी दोन थरारक अनुभव गाठीशी बांधले.....ही विमान प्रवासाची पहिली पायरी होती. नंतरच्या काळात भरपूर विमान प्रवास झाला........आता तर काय विमानतळ म्हणजे सुधारीत चकचकीत S T स्टँडच वाटतो!🤣🤣🤣
( संकेश्वर मुंबई बेंगलोर हायवे वर कर्नाटक महाराष्ट सीमेजवळ आहे.
वायुदूत ही सेवा 1 एप्रिल 1997 रोजी बंद झाली.)
#smitanubhav 66
Comments
Post a Comment