स्मितानुभव #65 नाण्याची दुसरी बाजू

मिस्टरांची कनिगिरी- वेलींगडला HARDSHIP सुरू होती आणि इकडे माझी तारेवरची कसरत!
तसं बघायला गेले तर नोकरी, घर आणि मुलांचे संगोपन ह्या तीनही आघाड्या दोघांनी सांभाळणे हीच मुळात तारेवरची कसरत असते त्यामुळे एकटीने सगळे सांभाळायचे मोठे आव्हान होते.
मुलांना घेऊन चिंचवडलाच राहण्याचा निर्णय घेतल्यावर मानसिक तयारी झाली होती. पण थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये खूपच फरक होता.

बावीस तेवीस वर्षा पूर्वीचा हा काळ सगळ्यांसाठीच कठीण होता. ना आधीच्या पिढीसारखे घरी राहून फक्त चुलमूल करू शकत होतो ना आत्ताच्या सारख्या सोयीसुविधा आणि सुबत्ता होती. स्त्रीचे बाहेर पडणे तितकेसे समाज मान्य झाले नव्हते. " ती तिच्या चैनीसाठी नोकरी करते"  किंवा " तिच्या संसारासाठीच नोकरी करते, त्यात काय इतके" अश्या तऱ्हेचे टोमणे येता जाता ऐकावे लागत. खरं तर टपून बसलेले असतं की कामाला जाणाऱ्या स्त्रिया कुठे चुकतात आणि आम्ही त्याचे भांडवल करतो. ह्या सगळ्याचे मला पण खूप टेन्शन आले होते. घरातल्या मीठ मिरची पासून ते मुलाचा अभ्यास आणि सर्वांगीण विकास हे सर्व मला नोकरीतील ताण सांभाळून करायचे होते. भाग्याची गोष्ट म्हणजे माझी मुले खूप समजूतदार आहेत आणि बाकी कुटुंबही अडचणीला धावून येणारे आहे. त्यामुळेच मी काळ व्यवस्थित निभावू शकले.

मुले पाचवीत असल्यामुळे हिंदी आणि मराठी हे दोन नवीन विषय सुरू झाले होते. देवनागरी लिपी शिकण्यापासून सुरवात होती. त्यातून पाचवी पासून शाळा पण दुपारची होती. मला नऊ वाजता घरातून निघावे लागायचे. ह्यावर उपाय म्हणून सकाळची शिकवणी लावली. पण हा उपाय तिमाही परीक्षेपर्यंतच चालला. दोघांचेही मार्क कमी झाले. शाळेचा आणि शिकवणीतला घरचा अभ्यास असे दोन्ही करायला वेळ मिळेना! शेवटी शिकवणी बंद केली. मीच अभ्यास घ्यायला सुरवात केली आणि अभ्यासाची गाडी रुळावर आणली.

मुले नीट जेवली की नाही, डबा दप्तर घेतले की नाही आणि घराला कुलूप लावून शाळेच्या बस पर्यंत वेळेत जातात की नाही हे सगळे माझी मानस कन्या सुचिता भोईर हीने मनापासून आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता सलग तीन वर्षे केले.

दुसरे अत्यंत अवघड काम होते ते वीज बिल आणि टेलिफोन बिल भरणे. तेव्हा बिल वेळेवर यायची नाहीत. खूपच मागे पुढे व्हायची. शेवटच्या तारखेच्या दोन तीन दिवस आधी यायची. तेव्हा काही ऑनलाइन पेमेंट नव्हते. बिल भरण्याची वेळ आणि ऑफिसची वेळ एकच यायची. मी 9 वाजता उघडणारी, अत्यंत कमी गर्दीची पण दूरची बँक शोधून काढली. तिथे वीजबिल चेकने घेत असत. त्यामुळे माझे काम झटपट होई आणि मला उशीर पण होत नसे. टेलिफोन बिल भरण्यासाठी शनिवार दुपार आणि पोस्ट ऑफिस निवडले. जायचा यायचा त्रास होता, पण कामं वेळेत व्हायची.
भाजीपाला आणि किराणा बँकेतून येताना होऊन जायचे. मी सगळ्यावर विचारपूर्वक मार्ग काढला होता आणि परिस्थिती accept केली होती. त्यामुळे इतरांना वाटायचे की मिस्टर इकडे नसल्याने हिला काही कामच नाही. मागे तर बोलायचेच पण तोंडावर पण म्हणायचे," मज्जा आहे बाई तुझी, स्वयंपाक केला नाही तरी चालेल,मिस्टर नाहीत ना इकडे?" काय बोलणार ह्यावर ? सगळा डोलारा सांभाळताना माझी दमछाक होत होती. हळूहळू रुटीन बसले.

रजा घेण्यावर बंधन असल्यामुळे मिस्टर दोन तीन महिन्यांनी चार पाच दिवसांसाठी यायचे. मुले कधी कधी बाबांच्या आठवणीने कावरी बावरी व्हायची. समजूत घालताना नाकीनऊ यायचे, पण विसरायचीही. मिस्टर पण नियमितपणे मुलांना पत्र लिहायचे. कधी कार्टून काढून पाठवायचे आणि शक्य होईल तेव्हा फोनही करायचे. अडचणी येत होत्या पण उपायही सापडत होते.
बघता बघता वर्ष संपत आले. मुलांची वार्षिक परीक्षा आली.
उद्या पेपर आणि स्नेहाने पोट खूप दुखते आहे म्हणून रडायला सुरवात केली. घरगुती सगळे उपाय केले. रविवार असल्याने डॉक्टर उपलब्ध नव्हते.  मग रात्री म्हणाली आताच्या आता आजी पुण्याहून आली तर माझे पोट दुखायचे थांबेल.
रात्री नऊ वाजता माझा भाऊ आईला घेऊन आला. आईने काय केले ते आता आठवत नाही पण स्नेहा शांत झोपली. पहिला पेपरपण लिहून आली. संध्याकाळी पुन्हा पोट दुखते म्हणून रडू लागली. लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. विशेष काही वाटत नाही पण सोनोग्राफी करू या म्हणाले. लगेच नणंदेचे यजमान तिला घेऊन गेले. त्यातही काही प्रॉब्लेम नव्हता. पण ही पोट दुखतं म्हणून रडत होती. शेवटी ऍडमिट केले आणि सलाईन लावले. पुढचे सगळे पेपर रात्री हॉस्पिटलमध्ये आणि दुपारी परीक्षा असे पार पडले. घरी हर्षदजवळ भाची थांबत होती. खूप टेन्शन आले होते. तिचा पेपर लिहून होईपर्यंत मी वर्गाबाहेर बसत होते. ह्यातले काहीही मिस्टरांना कळवले नाही आणि फोनची सुविधा नसल्यामुळे कळविता पण आले नाही.
परीक्षा संपल्यावर चिरंजीव म्हणाले, "आई बरे झाले ना, स्नेहाने आजी पाहिजे म्हटले, बाबा पाहिजे म्हटले असते तर आपण काय केले असते?"🤦
सांगायचे विशेष म्हणजे अशी परीक्षा देऊन सुध्दा स्नेहा तिच्या वर्गात आणि सर्व तुकड्यात पहिली आली. काहीही परिस्थिती येऊ शकते आपण कधीही तयार पाहिजे असा मोठ्ठा धडा दोघांनाही मिळाला.
ह्या तीन वर्षांच्या कालावधीत माझे चिखली शाखेतील सहकारी अत्यंत खंबीरपणे माझ्या मागे उभे होते. अजूनही अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा धावून येतील ह्याची मला खात्री आहे. बँकेतील कामात आणि घरगुती अडचणीत सुद्धा त्यांनी मला मनापासून मदत केली. असे सहकारी लाभणे हे माझे भाग्यच!
#smitanubhav 65

स्मितानुभव 63 आणि 64 पण जरूर वाचा.

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस