स्मितानुभव #64 वेलींगडला 2

#स्मितानुभव 64     वेलींगडला 2

आज मागे वळून बघताना वाटते की किती मोठा धोका आम्ही पत्करला होता. पण ती त्यावेळची गरज होती आणि पुढच्या प्रगतीचा पाया होता. महाराष्ट्रीयन माणूस उत्तर भारतात सहज रुळू शकतो एकतर भाषेचा विशेष प्रश्न येत नाही आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण मिळत्या जुळत्या असतात. पण दक्षिण भारतात पोळी खाणाऱ्यांचे खूपच हाल होतात. आंध्रप्रदेशातील जेवण एकूणच खूप तिखट असते. मिस्टरांनी सांगितले कि त्यांची अवस्था बघून मेसवाल्या काकू साय आणि दूध बाजूला काढून ठेवायच्या शेवटच्या भाताबरोबर खायला. मिस्टरांना अजिबातच स्वयंपाक येत नव्हता आणि अजूनही येत नाही त्यामुळे सर्वस्वी बाहेर मिळणाऱ्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागले. महाराष्ट्रात राहून बदल म्हणून इडली खाणे वेगळे आणि बाकी काही नाही म्हणून इडली खावी लागणे वेगळे! आज सुद्धा इडली हा शेवटचा पर्याय असतो आमच्याकडे. नाही म्हणायला तिकडे राहण्याचा एक फायदा झाला ..... चहा करायला शिकले आणि अजून सुद्धा करतात.

एकदा शेजारच्या आजी रगड्यावर भरपूर लाल मिरच्या वाटताना दिसल्या. मी उत्सुकतेने विचारले की हे तुम्ही काय करत आहात? त्यांनी सांगितले की हे तोंडीलावणे आहे. भाताबरोबर खायचे. आजचा नाष्टा आहे हा ! आणि खरोखरच मोठ्ठा कुंडाभरून भात आणि वाटलेली लाल मिरची त्यांनी माझ्या समोर खाल्ली. बघूनच माझे तोंड भाजले.  

गाव इतके छोटे होते कि एकदा दोन मित्र गावांत घर शोधत आले. त्यांनी हिंदी समजणाऱ्या सायकलवाल्याकडे चौकशी केली की बँकेतील साहेब कोठे राहतात माहीत आहे का ? त्याने दुसऱ्या एका मुलाला सांगितले की जा आणि इन शर्ट करतात त्या साहेबांचे घर दाखव.....

मी दोनदा,तीन आठवड्यासाठी मुलांना घेऊन कनिगिरीला गेले होते. जाताना कणिक,विळी ,मिक्सर असे साहित्य घेऊन गेले होते. तिथे मुलांना घेऊन राहणे मोठे आव्हानात्मक होते. एकतर पूर्णवेळ घरी राहण्याची सवय नाही. करमणुकीसाठी काहीही साधन नाही. स्वयंपाकपण वातीच्या स्टोव्ह वर ..... सगळी उलटी गंगा ......

मी ह्यावरचा उपाय असा काढला होता. मुलांसाठी बरोबर भरपूर गोष्टीची पुस्तके ,गणिताची पुस्तके घेऊन गेले होते. माझे विणकाम माझ्याबरोबर होते. सकाळचा थोडा वेळ अभ्यास आणि थोडा वेळ स्वयंपाकात. दोघेही कणिक भिजवायला आणि भाजी चिरायला शिकली. दुपारी गणित …. दोघांच्याही आवडीचा विषय. मग त्यांना उदाहरणे सोडवायला सांगून माझे विणकाम. कंटाळा आला की वाचन किंवा गाण्याच्या भेंड्या. मस्त मजेत वेळ गेला. मुलांनाही आहे त्यात आनंद शोधण्याची सवय झाली.

एका रविवारी आमचे मित्र जीवन दळवी यांच्याकडे गेलो. एकमेकांना भेटून अत्यानंद झाला. त्याची छोटी मुलगी केतकी पण खूप खूष झाली. किती बोलू आणि किती नको असे झाले होते. अक्षरशः घसा बसेपर्यंत बोलत बसलो होतो. निघताना पाय आणि मन दोन्ही जड झाले होते पण…

आणखी एका रविवारी “श्रीशैल्यम्” इकडे गेलो होतो. अप्रतिमच आहे. हे एकमेव ठिकाण आहे जे शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग दोन्हीही आहे. उंच डोंगरावर मंदिर आहे. जुनी देवळे मला खूप आवडतात. तिथे जाऊन एक अनामिक शांती मिळते. देवदर्शन यथासांग झाले. संध्याकाळी देवळाच्या परिसरात फिरत असताना एक गाय समोर आली. नमस्कार करून दुसरीकडे जायला लागलो तर ती आमच्या मागे मागे येऊ लागली. काय करावे ते सुचेना. मुले पण घाबरली. मला वाटले भूक लागली असेल, तिथे काय देणार ?..... मग डझनभर केळी विकत घेऊन तिला खाऊ घातली. तरी ती मागे यायचे काही थांबेना. मला काय बुद्धी झाली कोणास ठाऊक …. मी माझ्याजवळचा प्रसाद तिला भरवला आणि ती गोमाता नतमस्तक होऊन निघून गेली.

इथेच कृष्णा नदीवरील “श्रीशैलम्” जलविद्युत प्रकल्प आहे. भारतातील हा दोन नंबरचा प्रकल्प आहे. ती मानवी गंगा पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

“केल्याने देशाटन” …. हे खरंच आहे. ही अडीच वर्षे खूप कठीण होती, पण खूप काही शिकवून गेली.

आयुष्य समृद्ध झाले हे नक्की!
#smitanubhav 64

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस